भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि क्रीडाविश्वात सर्वांत प्रचलित असलेल्या खेळांपैकी एक क्रिकेटचा तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. २०२८मध्ये अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून यात क्रिकेटला समाविष्ट करण्याची शिफारस संयोजन समितीने केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १४१व्या परिषदेत घेतला जाईल.
क्रिकेटचा समावेश होण्याची कितपत शक्यता?
क्रिकेट हा खेळ दक्षिण आशियात सर्वाधिक प्रचलित आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांचे नागरिक कामानिमित्त आता जगभरातील विविध देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. अमेरिका आणि शेजारी कॅनडा येथे दक्षिण आशियाई, प्रामुख्याने भारतीय वंशाच्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशात लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास तेथे सामन्यांसाठी मोठा चाहतावर्ग लाभू शकेल. त्यातच अमेरिका २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचेही सह-यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे ‘एलए२८’ म्हणजेच लॉस एंजलिस ऑलिम्पिक २०२८मध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आशावादी आहे.
हेही वाचा : विश्लेषण : मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमधून खरेच सूट मिळणार का?
यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट कधी खेळले गेले?
अथेन्स येथे झालेल्या १८९६च्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला जाणार होता. परंतु पुरेशा संघांअभावी क्रिकेटचे ऑलिम्पिक पदार्पण १९००च्या स्पर्धेपर्यंत लांबले. पॅरिस येथे झालेल्या १९००च्या स्पर्धेत क्रिकेटचा केवळ एक सामना खेळला गेला. थेट सुवर्णपदकासाठी झालेल्या या सामन्यात यजमान फ्रान्स आणि ब्रिटन हे संघ एकमेकांविरुद्ध खेळले. फ्रान्सच्या संघातील बहुतांश खेळाडू हे ब्रिटिश होते. ते कामाच्या निमित्ताने फ्रान्समध्ये स्थायिक झालेले होते. दुसरीकडे ब्रिटन संघाचे प्रतिनिधित्व डेव्हॉन आणि समरसेट वॉन्डरर्स या क्लबने केले होते. त्यामुळे हा राष्ट्रीय पातळीवर निवडण्यात आलेला संघ नव्हता. सुवर्णपदकासाठीचा सामना दोन दिवस चालला. यात १२ सदस्यीय संघांना प्रत्येकी दोन डाव खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंडने १५८ धावांनी विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. पुढे १९०४च्या सेंट लुईस ऑलिम्पिकमध्येही सुरुवातीला क्रिकेटचा समावेश होता. परंतु अखेर क्रिकेटला वगळण्यात आले. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आलेले नाही.
क्रिकेटचा पुन्हा समावेश करण्यास इतका विलंब का?
‘आयओसी’कडून क्रिकेटचा फारसा विरोध सहन करावा लागलेला नाही. त्यापेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) ही जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वांत शक्तिशाली मंडळांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशास अनेकदा विरोध दर्शवला आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन आठवडे क्रिकेट खेळले जाईल आणि याचा फटका आमच्या स्थानिक क्रिकेट वेळापत्रकाला बसेल, असे ‘ईसीबी’चे माजी अध्यक्ष जाईल्स क्लार्क काही वर्षांपूर्वी म्हणाले होते. वेळापत्रक बदलामुळे क्रिकेट मंडळांना काही प्रमाणात आर्थिक फटकाही सहन करावा लागेल. हा फटका सहन करण्याची तयारी नसल्याचे ‘ईसीबी’ने स्पष्ट केले होते. दुसरीकडे ‘बीसीसीआय’ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आधिपत्याखाली खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याच कारणास्तव इतका दीर्घकाळ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले नाही.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराला चीनने तीन वर्षे तुरुंगात का ठेवले? नेमके प्रकरण काय आहे?
अलीकडच्या काळात कोणत्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळले गेले? भारताची कामगिरी कशी होती?
गेल्या वर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला संघांचे ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळले गेले. यात भारतीय संघाने रौप्यपदक कमावले. भारताला अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला आणि पुरुष या दोनही संघांचे ट्वेन्टी-२० क्रिकेट सामने झाले. दोन्ही विभागांत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.
हेही वाचा : विश्लेषण : उपग्रह स्पेक्ट्रमचा लिलाव की वाटप?
अन्य कोणत्या खेळांचा समावेश होण्याची शक्यता?
लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मूळ २८ क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. याशिवाय क्रिकेट, बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लक्रॉस आणि स्क्वॉश या खेळांच्या समावेशाचा प्रस्ताव संयोजन समितीकडून ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॉश हे क्रीडा प्रकार ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळवले जातील.