scorecardresearch

Premium

विश्लेषण : गुजरात टायटन्सचा विजयाध्याय नेतृत्वक्षम हार्दिकने कसा लिहिला?

भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या हार्दिकच्या या एकंदर कामगिरीचा घेतलेला वेध.

hardik pandya Gujarat Titans IPL champion for the first time
(फोटो सौजन्य – PTI)

प्रशांत केणी
दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर गेलेल्या हार्दिक पंड्याच्या गतवर्षी झालेल्या पुनरागमनात तंदुरुस्तीच्या समस्येने पिच्छा पुरवला. ट्वेन्टी-२० विश्वचषकात गोलंदाजी करू न शकल्यामुळे त्याच्या अष्टपैलू या वैशिष्ट्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. परंतु राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे हार्दिकने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये कात टाकली. फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या त्रिसूत्रीच्या बळावर यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा विजयाध्याय लिहिला. भारतीय संघात पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या हार्दिकच्या या एकंदर कामगिरीचा घेतलेला वेध.

हार्दिक गेली तीन वर्षे कोणत्या समस्येचा सामना करीत होता?

hardeep singh nijjar photoes canada gurudwar
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे सूत्रधार कोण?
union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य
Hardeep Singh Nijjar, canada, Sikh separatist leader, Khalistan movement
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे सूत्रधार कोण?
Slovakia
विश्लेषण : स्लोव्हाकियामध्ये पुतिनधार्जिण्या पक्षाचा विजय का गाजतोय? त्यातून युरोपीय महासंघाच्या विघटनाची चर्चा का?

२०१९मध्ये हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गोलंदाजीचा भार सांभाळण्यात त्याला अडचणी येत असल्याचे बऱ्याच सामन्यांत जाणवले. गतवर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या लढतीत त्याने अखेरचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो सामना भारताने नऊ गडी राखून आरामात जिंकला. मात्र त्या सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. या संपूर्ण स्पर्धेत फक्त दोनच सामन्यांत त्याने गोलंदाजी केली. त्यामुळे हार्दिकच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकला अष्टपैलू म्हणावे का, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीका केली होती.

हार्दिकने आपल्या अष्टपैलू कामगिरीने गुजरातच्या यशात कसे योगदान दिले?

तंदुरुस्तीच्या समस्येवर मात करत हार्दिकने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आत्मविश्वासाने कामगिरी करत गुजरातच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे. फलंदाजीत त्याने १५ सामन्यांत गुजरातकडून सर्वाधिक ४८७ धावा काढल्या आहेत. ४४.२७ धावांची सरासरी आणि १३१.२६चा स्ट्राइक रेट ही त्याची आकडेवारी बोलकी असून, यात चार अर्धशतकांचाही समावेश आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या साखळी लढतीत त्याने नाबाद ८७ धावांची उभारलेली खेळी ही त्याची यंदाच्या ‘आयपीएल’मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याशिवाय गोलंदाजीत हार्दिकने ८ बळी घेत मधल्या षटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बऱ्याचशा सामन्यांत त्याने गोलंदाजीचा पूर्ण कोटा म्हणजे चार षटके गोलंदाजी केली आहे. याचप्रमाणे अंतिम सामन्यातही त्याने फलंदाजीत ३४ धावा आणि गोलंदाजीत १७ धावांत ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला.

हार्दिकमधील नेतृत्वगुण कशा रीतीने सिद्ध झाले?

‘आयपीएल’चा महालिलाव होण्याआधीच हार्दिकला गुजरातने करारबद्ध केले. याचे कारण त्यांना नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपवायचे होती. आतापर्यंत कधीच कर्णधारपद सांभाळले नव्हते, अशा हार्दिकला संघाच्या पदार्पणीय हंगामात कर्णधारपद दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र प्रत्यक्षात हार्दिकच्या नेतृत्वाने कमाल केली. साखळीत १४ सामन्यांपैकी १० सामने जिंकत एकूण २० गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थान मिळवणाऱ्या गुजरातने नंतर बाद फेरीत क्वालिफायर-१ आणि अंतिम सामन्यातही राजस्थान रॉयल्सला धूळ चारत विजेतेपद पटकावले. आघाडीवर राहून नेतृत्व करण्याच्या हार्दिकच्या क्षमतेला गुजरातच्या यशाचे श्रेय जाते. निवड समितीने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये नेतृत्वाच्या पर्यायांची चाचपणी करणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी हार्दिक हा एक नेतृत्वपर्याय उपलब्ध झाला आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या चार जेतेपदांमध्ये (२०१५, २०१७, २०१९, २०२०) खेळाडू म्हणून योगदान देणाऱ्या हार्दिकने पाचव्या खेपेस कर्णधार म्हणून ‘आयपीएल’ चषक उंचावला.

हार्दिकने कर्णधार म्हणून गुजरात संघाची मोट कशी बांधली?

हार्दिकने नवख्या गुजरातच्या यशाची उत्तम मोट बांधली. युवा शुभमन गिल आणि अनुभवी वृद्धिमान साहा यांची दिमाखदार सलामी हीच गुजरातच्या यशाची पायाभरणी ठरायची. हार्दिकनेसुद्धा आक्रमक फलंदाजी करीत धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. डावखुऱ्या डेव्हिड मिलरने आपल्या फलंदाजीच्या तंत्रात आमूलाग्र बदल करत विजयवीराची (फिनिशर) भूमिका बजावली. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनीसुद्धा वेळोवेळी सामन्याचे चित्र अनपेक्षितपणे पालटून संघाला जिंकून दिले. गुजरातच्या यशात गोलंदाजांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अफगाणिस्तानचा तारांकित लेग-स्पिनर रशीद खान यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली. तसेच सातत्याने ताशी १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या लॉकी फर्ग्युसननेही छाप पाडली.

हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज…

दुखापतीनंतर उद्भवलेल्या तंदुरुस्तीच्या समस्येवर मात करत हार्दिकने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले आहे. येत्या ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी हार्दिकचे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे कर्णधारपदाच्या पर्यायांची जेव्हा निवड समितीने चर्चा केली. तेव्हा त्यात हार्दिकचे नावही ऐरणीवर होते. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिकपुढे आता भारतीय संघातील स्थान पक्के करण्याचे आव्हान असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained hardik pandya gujarat titans ipl champion for the first time print exp 0522 abn

First published on: 30-05-2022 at 11:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×