राज्यावर सध्या वीजेचं संकट निर्माण झालं असल्याने चिंता वाढली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान सध्या निर्माण झालेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही भागांमध्ये लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोडशेडिंग करण्यामागची नेमकं कारण काय आहेत ते समजून घेऊयात.

महाराष्ट्रात वीजेची मागणी किती आहे आणि तिच्यात अचानक इतकी वाढ का झालीये?

सरकारी अधिकारी आणि या क्षेत्रातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरातील घडामोडींमध्ये झालेली वाढ विजेच्या मागणीत वाढ होण्यास कारणीभूत ठरली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे (MSEDCL) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यभरातील घडामोडी वाढल्याने मागणीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत आहे.

यावेळी त्यांनी MSEDCL ने अतिरिक्त वीज खरेदी केली असली तरी सध्या महाराष्ट्राला दिवसाला १५०० मेगावॅटचा तुटवडा जाणवेल असं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला मागणी दिवसाला १३ हजार मेगावॅटच्या पुढे गेली आहे. गेल्यावर्षी यात कालावधीशी तुलना केली असता ही मागणी १६ टक्क्यांनी वाढली आहे.

सध्या किती तुटवडा जाणवत आहे आणि काय पावलं उचलली जात आहेत?

दिवसाला जवळपास ४००० मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहेत. काही ठिकाणी खासगी वीज निर्मिती कंपन्या प्रति युनिट २० रुपयांची मागणी करत होत्या. पण भारत सरकारने हा दर १२ रुपये प्रति युनिट इतका मर्यादित केला आहे.

टंचाई जाणवत असल्याने पहिल्यांदाच जलसिंचन विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्पातून १० टीएमसी अतिरिक्त पाणी दिलं आहे, ज्यामुळे राज्याला अतिरिक्त १००० मेगावॅट वीज निर्मिती होण्यास मदत मिळेल.

दुसरीकडे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने गेल्या १० दिवसात जवळपास ७०० मेगावॅट वीज निर्मिती केली आहे. MahaDiscom नेही कोस्टल गुजरात पॉवरकडून ७६९ मेगावॅटची मागणी केली असून त्यातून राज्याला ४१५ मेगावॅट वीज मिळू लागली आहे. ही पावलं उचललेली असतानाही जवळपास १५०० मेगावॅटचा तुटवडा अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोडशेडिंगचा फटका कोणत्या ठिकाणांना बसणार आहे?

MahaDiscom नवी मुंबई, वसई, विरार, भांडूप, मुलुंड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल आणि इतर शहरं तसंच महाराष्ट्रातील काही अंतर्गत ठिकाणांना वीज पुरवठा करतं. शहरी भागांना याचा फटका बसणार नाही, मात्र ग्रामीण भागावर विपरित परिणाम होईल. MahaDiscom ने वापरकर्त्यांना वीजेचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे तसंच महत्वाच्या वेळांमध्ये नेटवर्कवर अचानक ताण आणू नये असंही सांगितलं आहे.