मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात सत्तारूढ भाजपविरोधात काँग्रेस असा चुरशीचा सामना होईल. यातच आता राज्यात तिसरा भिडू येऊ पाहात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही माजी प्रचारकांनी जनहित पार्टी स्थापन करून भाजपच्या अडचणी वाढवल्यात. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवरच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडे पक्षाची रीतसर नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात हिंदुत्ववादी विचारांच्या नव्या पक्षाची भर पडणार आहे.
सत्ताधाऱ्यांना इशारा…
राजधानी भोपाळनजीक मिरसोद येथे संघाचे माजी प्रचारक अभय जैन (वय ६०) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बैठक घेतली. प्रचलित पक्ष लोकशाहीच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे आम्ही नवा पक्ष स्थापन करत असल्याचे जैन यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीत पक्ष उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आमच्या पक्षामुळे भाजपला फटका बसेल असे म्हणता येणार नाही. गेल्या म्हणजेच २०१८ मध्ये आम्ही नसतानाही भाजप पराभूत झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. जैन हे २००७ पर्यंत संघ प्रचारक होते. त्यांनी सिक्कीममध्येही काम केल्याचे नमूद केले. रविवारी झालेल्या बैठकीला जवळपास २०० जण उपस्थित होते. यामध्ये झारखंडमधील पाच जणांचा समावेश आहे. ग्वाल्हेर तसेच रिवा येथे काम केलेले एक माजी प्रचारक मनीष काळे (वय ५५) हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. १९९१ ते २००७ या कालावधीत ते प्रचारक होते. याच विचारधारेवर देशाच्या प्रगतीसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. संघ परिवारातील भारतीय किसान संघाशी पूर्वी संबंधित असलेले रवि दत्त सिंहदेखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश जणांचा २००७-०८ पर्यंत संघाशी संबंध होता.
नव्या पक्षाची धोरणे
शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक धोरण याबाबतही या नव्या पक्षाच्या बैठकीत मंथन करण्यात आले. पैसे देऊन शिक्षण घेतल्याने व्यक्तिकेंद्री वृत्ती निर्माण होते, असे मत या बैठकीत मांडण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणासाठी शुल्क घेतले जात नव्हते याची आठवण करून देण्यात आली आहे. जनकेंद्रित धोरणे आखून हिंदुत्व हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली जाईल, असे जैन यांनी स्पष्ट केले. मूळचे इंदूरचे असलेले जैन हे चौथीत असताना संघशाखेत पहिल्यांदा गेले. अभियांत्रिकी शाखेचे ते पदवीधर असून, राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाविरोधातही आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. संघातून २००७ मध्ये बाजूला झालो, मला चाकोरीबाहेर जाऊन काम करायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्य एक स्वयंसेवक विशाल यांनी भाजपची विचारधारा चांगली आहे, मात्र आता ते त्या मार्गावरून जात नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली. किती जागा लढणार हे आम्ही निश्चित केले नाही. मात्र दोन पक्षांशिवाय आणखी एक पर्याय जनतेला उपलब्ध झाल्याचे मनीष काळे यांनी स्पष्ट केले.
आरोप-प्रत्यारोप
संघाच्या माजी स्वयंसेवकांकडून नवा पक्ष स्थापन होणे म्हणजेच भाजपवरील वाढत्या नाराजीचे हे द्योतक आहे. भाजप आता भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते पीयूष बबले यांनी केला आहे. त्याला भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येकाला आपली विचारधारा जनतेपर्यंत नेण्याचे स्वातंत्र्य आहे. भाजप कल्याणकारी मार्गावरून पुढे जाईल, असे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. तुम्ही कुठेही गेलात तरी, तरी विचारांशी बांधील आहात हेच या घडामोडींमधून दिसते, अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. काही महिन्यांपूर्वी बजरंग दलाच्या माजी सदस्याने बजरंग सेना स्थापन केली होती. नंतर ही व्यक्ती काँग्रेसमध्ये सामील झाली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाला काँग्रेसही सौम्य हिंदुत्वाने उत्तर देत आहे. त्यात एका नव्या पक्षाची भर पडली आहे.
भाजपसाठी चिंता?
राज्यात भाजप व काँग्रेस यांच्या मतांमध्ये विधानसभेला जेमतेम एक टक्क्याचे अंतर आहे. गेल्या म्हणजेच २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१.०२ टक्के, तर काँग्रेसला ४०.८९ टक्के मते मिळाली होती. मात्र काँग्रेसला ११४ तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. ही आकडेवारी राज्यातील चुरस स्पष्ट करते. अशा वेळी संघाच्या माजी प्रचारकांनी नवा पक्ष स्थापन केल्यास भाजपसाठी ही चिंतेची बाब होऊ शकते. भाजपला सत्ताविरोधी नाराजीची भीती आहे. काँग्रेसकडे कमलनाथ यांच्यासारखा नेता आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी पक्ष पुढे नेण्याचे जनहित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. थोडक्यात, भाजपच्या मतांमध्येच फूट पडणार हे स्पष्ट आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व २३० जागांवर नव्या पक्षाला प्रबळ उमेदवार देणे अल्पावधीत कठीण आहे. मात्र संघाच्या माजी प्रचारकांनी राज्यभर दौरे केल्यास भाजपसाठी मध्य प्रदेश अवघड जाऊ शकते हे नक्की.