काही दिवसांपासून दिल्लीला वायु प्रदूषणाने वेढल्याचे चित्र दिसत होते. धुक्यामध्ये राजधानी दिल्ली हरवून गेली होती. मात्र, गुरुवारी (९ नोव्हेंबर) रात्री हलक्या सरी कोसळल्यामुळे शुक्रवारी निरभ्र आकाश दिसून आले आणि हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी झाल्याचे दिसले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४७१ च्या वर धोकादायक स्थितीमध्ये गेलेला दिसला. हवेचा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी वातावरणातील आठ प्रदूषकांचे प्रमाण मोजले जाते आणि लोकांना सहजरीत्या कळण्यासाठी त्याला संख्येचे स्वरूप दिले जाते. गुरुवारी रात्री हवेचा निर्देशांक २४ तासांच्या सरासरीनुसार ४३७ वर होता; मात्र शुक्रवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत तो २७९ पर्यंत खाली घसरला. मुंबईतही नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक्यूआय वाईट श्रेणीत पोहोचला होता; पण अचानक पाऊस पडल्यामुळे मुंबईतही हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

पावसामुळे खाली बसली धूळ; पण फार कमी काळ

हवा गुणवत्ता निर्देशांकात मोजले जाणारे प्रदूषक घटक जसे की, ओझोन, सल्फर डाय-ऑक्साइड आणि इतर प्रदूषक इतक्या सहज रीतीने हवेतून नष्ट होत नाहीत. पीएम २.५ व पीएम १० यांसारखे धूलिकण जर बराच काळ पाऊस पडला, तर लक्षणीय प्रमाणात त्यांच्या संख्येत घट होते.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीने (MIT) याआधी एकदा लिहिलेल्या लेखात याचे स्पष्टीकरण दिलेले होते. त्यानुसार “पावसाचा थेंब आकाशातील ढगातून जमिनीच्या दिशेने येत असताना स्वतःसह शेकडो एरोसोल कण (धूलिकण, धुके) जमिनीच्या पृष्ठभागावर आणतो. पावसाचा थेंब आणि एरोसोल कण एकमेकांमध्ये साकळण्याच्या प्रक्रियेद्वारे एकत्र येतात. या प्रक्रियेला कोग्युलेशन प्रोसेस म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याद्वारे वातावरणात असलेली काजळी (आग लावून निर्माण झालेला धूर), सल्फेट व सेंद्रीय कण हवेतून स्वच्छ केले जातात.” त्यामुळे पाऊस जर दीर्घ काळ चालला, तर वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होते.

पावसामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट

गुरुवारी झालेल्या पावसामुळे मुंबईतही हवेची गुणवत्ता चांगली सुधारली असल्याचे शुक्रवारी व शनिवारी (११ नोव्हेंबर) दिसली, असे अनुमान हवामान विभाग आणि सफर या संस्थेने नोंदविले. मरीन ड्राइव्ह येथील शनिवारचा सकाळचा व्हिडीओ पीटीआय या वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे; ज्यामध्ये निरभ्र आकाश दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, शनिवारी मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल; तर १२ नोव्हेंबरपासून १६ नोव्हेंबरपर्यंत निरभ्र वातावरण असेल.

पीएम २.५ व पीएम १० म्हणजे काय?

दिल्लीमध्ये झालेल्या पावसानंतर हवेतील पीएम २.५ व पीएम १० या धूलिकणांची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली. हे अत्यंत सूक्ष्म कण (Particulate Matter – PM) असून, पीएमपुढे लिहिलेला अंक त्याचा व्यास किती आहे हे दर्शवितो. पीएम १० व पीएम २.५ हे अनुक्रमे १० व २.५ मायक्रॉनपेक्षा लहान आहेत. एक मायक्रॉन म्हणजे मिलिमीटरचा हजारावा भाग.

वाहनांचे प्रदूषण, कारखान्यांमधून निघणारा धूर, बांधकामाच्या ठिकाणी उडणारी आणि रस्त्यावरील धूळ हे या प्रदूषकांचे स्रोत आहेत. हे प्रदूषक कण हवेत विखुरले जात नाहीत (म्हणजे वाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत). हे कण हवेतच राहिल्यामुळे आपल्या श्वासावाटे ते शरीरात जातात.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या आकडेवारीनुसार पीएम २.५ ची पातळी ऑक्टोबरच्या अखेरीस सुमारे १५५ वरून ५ नोव्हेंबर रोजी ३१० पर्यंत वाढली. पावसामुळे शुक्रवारी दुपारी ही पातळी १७४ पर्यंत घसरली. पीएम १० च्या पातळीतही अशाच प्रकारची घट दिसून आली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ४००-४८० असलेली पातळी शुक्रवारी २९१ पर्यंत घसरली.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज’चे प्राध्यापक आणि ‘सफर’ संस्थेचे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना प्रदूषणावर उपाय म्हणून पावसाच्या भूमिकेवर चर्चा केली. प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस किंवा क्लाउड सीडिंगच्या कल्पनेवर त्यांनी अधिक माहिती दिली. “मोठा पाऊस पडल्यास तो हवेतील प्रदूषण कमी करण्यास कारणीभूत ठरतो. हा उपाय तात्पुरता असला तरी प्रदूषकांचा प्रवाह खंडित करण्यासाठी हा उपाय लाभदायक ठरतो”, असे बेग यांनी सांगितले.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) म्हणजे काय?

दिल्ली आणि मुंबई या दोन महानगरांमध्ये काही दिवसांपासून वायुप्रदूषणाने उच्चांक गाठला असल्याच्या बातम्या येत आहेत. वायुप्रदूषणाची पातळी दर्शविण्यासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) सांगितला जातो. त्यावरून त्या त्या दिवसाची वायुप्रदूषण पातळी किती आहे, याचा अंदाज घेतला जातो. हल्ली तर आपल्या स्मार्टफोनमध्येही तुम्ही ज्या ठिकाणी नियमित जात असाल, त्या ठिकाणचा एक्यूआय काय आहे, हे सांगणारे नोटिफिकेशन व्हेदर विजेटद्वारे (स्मार्टफोनमध्ये हवामानाबाबत अपडेट देणारी सुविधा) पाठविली जाते. अधिक एक्यूआयचा अर्थ अधिक प्रदूषण. शुक्रवारी दिल्लीमधील हवेचा एक्यूआय ४७१ एवढा होता. मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १६० च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. मात्र, उपनगरात वेगवेगळा निर्देशांक असू शकतो. एक्यूआय डॉट इन या वेबसाइटवर तुम्ही भारतातील सर्व शहरांचा रिअल टाइम एक्यूआय तपासू शकता.

एक्यूआय दाखविण्याची सुरुवात कधी झाली?

२०१४ साली भारतात रंगांच्या साह्याने एक्यूआय निर्देशांक दाखविण्यास सुरुवात झाली. या निर्देशांकामुळे सरकार आणि सामान्य नागरिकांनाही हवेच्या गुणवत्तेचा अचूक अंदाज घेणे शक्य होत आहे. वैद्यकीय क्षेत्र, वायुप्रदूषण अभ्यासक, शिक्षण क्षेत्र, विविध संस्था अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र करून, तांत्रिक अभ्यासाद्वारे आयआयटी -कानपूर यांच्यातर्फे एक्यूआय निर्देशांक दाखविण्यास सुरुवात करण्यात आली.

या निर्देशांकाच्या ० ते ५० चांगली, ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम प्रदूषित, २०० ते ३०० खराब, ३०० ते ४०० अतिशय खराब व ४०० ते ५०० गंभीर परिस्थिती, अशा सहा श्रेणी आहेत. या श्रेणींनुसार दिल्लीतील परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते; तर मुंबई मध्य प्रदूषित आणि काही उपनगरांमध्ये खराब हवामान असल्याचे दिसते.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एक्यूआय’मुळे विविध प्रदूषकांचे हवेतील जटिल प्रमाण एकच संख्या (निर्देशांक), नाव व रंग यांद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ‘एक्यूआय’द्वारे पीएम १०, पीएम २.५ या सूक्ष्म कणांची आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड, ओझोन, कार्बन आदी प्रदूषकांची मोजदाद केली जाते.