दत्ता जाधव
जून-जुलै हा देशातील मोसमी पावसाचा पहिला टप्पा समजला जातो. या पहिल्या टप्प्यात देशभरात समाधानकारक पाऊस झाला का, तसेच हा पाऊस खरीप हंगामासाठी पुरेसा आहे का, त्या विषयी…
मोसमी पावसाचे आगमन, वाटचाल कशी राहिली?
देशात यंदा मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. दरवर्षी एक जूनला मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतात. यंदा मोसमी वारे केरळमध्ये आठ जून रोजी दाखल झाले. तळ कोकणात मोसमी वारे अकरा जून रोजी दाखल झाले. पण, त्यानंतर मोसमी वारे तळ कोकणात रेंगाळले. मात्र, मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने वेगाने वाटचाल करीत २३ जून रोजी विदर्भापर्यंत मुसंडी मारली. २५ जून रोजी मोसमी वाऱ्याने वेगाने वाटचाल करीत पुणे, मुंबईसह थेट दिल्लीपर्यंत धडक दिली. दोन जुलैपर्यंत मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला होता. सरासरी आठ जुलैपर्यंत मोसमी पाऊस देश व्यापतो. पण, केरळमध्ये आठ दिवस उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाने सहा दिवस अगोदरच संपूर्ण देश व्यापला. मोसमी पाऊस मुंबई, पुण्याला हुलकावणी देऊन थेट विदर्भात दाखल होण्याची घटना यंदा घडली. या पूर्वी २३ जून २०१९, २०१८ आणि २०१६मध्येही मोसमी पाऊस मुंबई, पुण्यात दाखल होण्यापूर्वी विदर्भात दाखल झाला होता. ज्या वर्षी अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा कमजोर होते आणि बंगालच्या उपसागरातील शाखा मजबूत असते, त्या वर्षी मुंबई, पुण्याच्या अगोदर मोसमी पाऊस विदर्भात दाखल झालेला दिसून येतो.
राज्यात पावसाची स्थिती काय राहिली?
राज्यात जून महिन्यात मोसमी पाऊस सरासरीच्या अवघा ५४ टक्केच पाऊस पडला आहे. मराठवड्यात अत्यल्प म्हणजे सरासरीच्या केवळ ४१ टक्केच पाऊस झाला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, अशा राज्याच्या सर्वच विभागात पावसाची तूट होती. जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पावसाची तूट भरून निघाली. १ जून ते ३१ जुलै या काळात राज्यात ६०६.३ मिमी म्हणजे सरासरीच्या १४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. या काळात कोकण- गोव्यात सरासरी १७५५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २३२६.४ म्हणजे ३३ टक्के जास्त पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात सरासरी ३८७.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३८१.५ मिमी म्हणजे एक टक्का कमी पाऊस पडला. मराठवाड्यात ३०५.१ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३३२.२ मिमी म्हणजे प्रत्यक्षात नऊ टक्के जास्त पाऊस पडला आहे. विदर्भात ४८४.७ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५३१.९ मिमी म्हणजे सरासरीच्या दहा टक्के अधिक पाऊस पडला आहे.
विश्लेषण : बीजिंग आणि उत्तर चीनमध्ये विक्रमी पर्जन्यमानाचे कारण काय?
देशात पावसाची स्थिती काय राहिली?
देशात एक जून ते ३१ जुलै या काळात ४४५.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४६७ मिमी म्हणजे पाच टक्के जास्त पाऊस झाला. उत्तर भारतात २८७.८ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३७६.५ मिमी म्हणजे ३१ टक्के जास्त पाऊस झाला. ईशान्य भारतात ७५२.५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २५ टक्के कमी पडला. मध्य भारतात सरासरी ४९१.६ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५५१.८ मिमी म्हणजे १२ टक्के अधिक पाऊस पडला. दक्षिण भारतात सरासरी ३६५.५ पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३८३.९ मिमी म्हणजे पाच टक्के अधिक पाऊस पडला.
देशभरात अतिवृष्टीच्या घटना वाढल्या?
मागील काही वर्षांपासून देशभरात अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. यंदाही तशीच स्थिती दिसून आली. २०१९मध्ये जून-जुलै महिन्यांत अति मुसळधार पाऊस (११५.६ ते २०४.५ मिमी) पडण्याच्या घटनांची नोंद देशात ७५३ ठिकाणी झाली होती. अतिवृष्टीची (२०४.५ मिमी पेक्षा जास्त) नोंद १६१ ठिकाणी झाली होती. २०२२मध्ये अति मुसळधार पावसाची नोंद ७२३ ठिकाणी तर अतिवृष्टीच्या घटनांची नोंद १२७ ठिकाणी झाली होती. यंदाच्या जून-जुलैमध्ये अति मुसळधार पावसाच्या घटनांची नोंद १११३ ठिकाणी झाली आहे, तर अतिवृष्टीची नोंद २०५ ठिकाणी झाली आहे. २०१९ ते २०२३ या काळात अति मुसळधार, अतिवृष्टी किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
मोसमी पाऊस आणि पेरण्याचा मेळ बसला?
देशात साधारण पंधरा जूनपासून जुलैअखेरपर्यंत खरिपाच्या पेरण्या होत असत. मागील काही वर्षांपासून जून महिन्यात अपेक्षित पाऊस होत नाही, जुलै महिन्यातील पावसानंतर पेरण्या सुरू होतात, त्या ऑगस्ट अखेरपर्यंत चालतात. प्रामुख्याने महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मागील दोन वर्षांपासून ऑगस्टअखेरपर्यंत भातलावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यंदा राज्यात जुलैअखेर १ कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे, जी सरासरी पेरणी क्षेत्राच्या ८८.९८ टक्के आहे. देशाचा विचार करता २८ जुलैअखेर ८३० लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात भात २३७.५८, सोयाबीन ११९.९१, कापूस ११६.७५, मका ६९.३६, बाजरी ६० आणि उसाची लागवड ५६ हेक्टरवर झाली आहे. या आकड्यांनी सरासरी गाठली असली तरीही उशिराने पेरण्या झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. काढणीच्या वेळी माघारी मोसमी पावसात नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय पेरणी-काढणीचे वेळापत्रक बदलल्यामुळे रब्बी हंगामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही बळावली आहे.
dattatray.jadjav@expressindia.com