JJ Hospital Shootout 1992 काही सेकंदात झाडल्या ३३ गोळ्या, भरदिवसा घडलेलं जेजे हत्यांकाड; मुंबईला हादरवणाऱ्या ‘त्या’ गोळीबाराची कहाणी! १२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र होते, नर्सेस अर्थात परिचारिकाही रुग्णसेवेत गढलेल्या होत्या… एरवीही दिसणारे हे चित्र…. त्या सकाळी मात्र काही क्षणांतच पार बदलून गेले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने हादरली.

हळदणकरच्या हत्येसाठी…

पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. हल्ल्याच्या काही दिवस आधीच एका चकमकीत तो जखमी झाला होता आणि पोलीस बंदोबस्तात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळदणकरच्या शेजारच्या खाटेवर गवळीचा आणखी एक साथीदार बिपीन शेरे हाही जखमी अवस्थेत दाखल होता. हळदणकरच्या जवळ दोन सशस्त्र पोलीस तैनात होते.

…आणि गोळीबार सुरू झाला

पोलिसांनी या प्रकरणी त्यावेळेस न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काहीजण ‘हळदणकरला भेटायचंय’ असं सांगून वॉर्डमध्ये आत घुसले आणि क्षणभरातच त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढून गोळीबार सुरू केला… हळदणकर आणि संरक्षणार्थ असलेले दोन्ही पोलीस या हल्ल्यात ठार झाले. हे जेजे हत्याकांड नेमकं का घडलं, जाणून घेऊया.

jj Hospital
जे.जे. रुग्णालय file photo

गुन्हेगारी जगतातील टोळीयुद्ध

पोलीस रेकॉर्डनुसार, गुन्हेगारी जगताचा इतिहास असे सांगतो की दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी पूर्वी एकत्रच काम करत होते. मात्र नंतर त्यांच्या टोळीमध्ये फूट पडली. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ही फूट वाढत दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. एका बाजूस दगडी चाळ हे सत्ताबाह्य केंद्र उभे राहिले तर दुसरीकडे दाऊद दुबईतून मुंबईवर नियंत्रण ठेवून होता. संघर्षाची ठिणगी पडली ती, दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरच्या हत्येमुळे. पारकरच्या हत्येमागे गवळी टोळीच असल्याची दाऊदची शंका होती. त्याचा सूड उगवण्यासाठीच जेजे हत्याकांड घडवण्यात आलं, अशी माहिती तत्कालीन खटल्यामध्ये मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केली होती.

त्यानंतर सुरू झाले चकमक पर्व

एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने या घटनेचे वर्णन करताना सांगितले होते की, वॉर्डमध्ये अचानक गोळीबार सुरू झाल्याने… जो तो आपापला जीव वाचविण्यासाठी, लपण्यासाठी जागा शोधू लागला, रुग्णांनी तर किंचाळ्या फोडायला सुरुवात केली. त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तींनी जिन्याच्या दिशेने धाव घेतली… आणि एकच गोंधळ उडाला. पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल अनेक प्रश्न जाहीररित्या विचारण्यास त्यावेळेस सुरुवात झाली आणि त्यानंतर ९० च्या दशकात सुरू झाले ते चकमक पर्व. गुन्हेगारी टोळ्यांतील म्होरक्यांचा पोलीस चकमकीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.

३२ वर्षांनंतर पुन्हा तपास, पुन्हा पुरावे

या खटल्यामध्ये काही जणांना शिक्षाही झाली. पण तरीही हे प्रकरण मुंबई पोलिसांची पाठ सोडत नाही, अशीच अवस्था आहे. गेल्याच वर्षी २०२४ साली ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणात त्रिभुवन रामपती सिंग ऊर्फ श्रीकांत राय उर्फ प्रधान याला उत्तर प्रदेशात अटक झाली. या प्रकरणात तब्बल ३२ वर्षांनंतर झालेली ही अटक होती. मुंबई पोलिसांसाठी हे यश आणि आव्हान दोन्हीही आहे. मूळचे तपास अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. १९९० च्या सुमारास डिजिटल डेटाबेस अस्तित्त्वात नव्हता. त्यामुळे फारशी माहिती पोलिसांहाती नाही. मात्र मुंबई पोलिसांनी संयमाने तपास करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सध्या करणाऱ्यांपैकी काहींचा तर जन्मही झालेला नव्हता, त्यावेळेस ही घटना घडलेली होती. …अशा वेळेस या घटनेचा तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा तपास करून, पुरावे गोळा करत आरोपीला शिक्षा होईल, अशा पद्धतीने खटला पुन्हा उभा करणे हे मुंबई पोलिसांसाठी आव्हानच असणार आहे.