उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत आदरणीय धार्मिक मेळ्यापैकी एक असणाऱ्या या मेळ्यात सरस्वती, यमुना व गंगा या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर लाखो भक्त जमले आहेत. जगभरातून येणाऱ्या भाविकांसह या मेळ्याचे आकर्षण म्हणजे नागा साधू. हा मेळा म्हणजे नागा साधूंच्या गूढ जगाचा अनुभव घेण्याची एक संधी आहे. राखेने माखलेले शरीर, लांब केस आणि कमीत कमी कपडे म्हणजे केवळ मणी, हार घालणारे आणि अनेकदा धूम्रपान करणारे नागा साधू या मेळ्याला हजेरी लावणाऱ्या जगभरातील भक्तांचे लक्ष वेधून घेतात. परंतु, विशेष बाब म्हणजे या नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात; तर त्यांच्यामध्ये महिला नागा साधू किंवा नागा साध्वींचाही समावेश असतो. या महाकुंभ मेळ्यात महिला नागा साधूंचीदेखील उपस्थिती दिसत आहे. त्या कसे जीवन जगतात? त्यांचा पेहराव कसा असतो? एकूणच महिला नागा साधूंच्या जीवनाविषयी जाणून घेऊ.

नागा साधूचे जीवन

नागा साधू हे पुरुष तपस्वी आहेत; ज्यांनी आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात सर्व सांसारिक आसक्तींचा त्याग केला आहे. त्यांचे मूळ प्राचीन भारतामध्ये शोधले जाऊ शकते. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा मोहेंजोदारोच्या नाण्यांच्या रूपात आणि ते भगवान शिवाच्या पशुपतीनाथ अवताराची प्रार्थना करताना दर्शविलेल्या कलाकृतींच्या रूपात उघड झाला आहे. असे म्हणतात की, जेव्हा शंकराचार्यांनी चार मठांची स्थापना केली तेव्हा त्यांना या मठांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी निर्भय जीवन जगणाऱ्या, अलिप्त राहणाऱ्या व्यक्तींचे सात गट तयार केले, जे सनातन धर्माचे रक्षण करतील. योद्धा-तपस्वींचा हा गट कालांतराने नागा साधू म्हणून ओळखला जाऊ लागला. संस्कृतमधील ‘नागा’ या शब्दाचा अर्थ ‘पर्वत’ असा होतो. हे नागा साधू एक तर पर्वतावर किंवा त्याच्या आसपास राहतात. बहुतेक वेळा ते संपूर्ण एकांतात आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात राहतात.

नागा साधू हे पुरुष तपस्वी आहेत; ज्यांनी आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात सर्व सांसारिक आसक्तींचा त्याग केला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : Infosys Vs Cognizant: नामांकित आयटी कंपन्यांनी एकमेकांविरुद्ध खटले का दाखल केले? नेमका वाद काय?

नागा साधू तलवार, त्रिशूळ, गदा, बाण व धनुष्य यांसारख्या शस्त्रांसह सज्ज असतात आणि मंदिरे व पवित्र स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे असतात. खरे तर, मुघल सैन्य आणि इतर आक्रमणकर्त्यांपासून शिव मंदिरांचे रक्षण करण्यात नागा साधूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. ज्ञानवापीच्या लढाईत त्यांच्या भूमिकेविषयीचे मत नोंदवले गेले आहे आणि असे सांगण्यात आले आहे की, नागा साधूंनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या विशेष सैन्याचा पराभव केला. जेम्स जी. लॉचटेफेल्ड यांनी त्यांच्या ‘द इलस्ट्रेटेड एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम, व्हॉल्यूम वन’ या पुस्तकात सांगितल्यानुसार, “ज्ञानवापीची लढाई १६६४ मध्ये महानिर्वाणी आखाड्याच्या नागा तपस्वी योद्ध्यांनी लढली होती, ज्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याचा पराभव केला होता.

औरंगजेबाच्या वाराणसीवरील दुसऱ्या हल्ल्याचे वर्णन करणाऱ्या स्थानिक लोककथेनुसार, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्यासाठी सुमारे ४०,००० नागा साधूंनी प्राणांचे बलिदान दिले होते. नागा साधू ध्यान, योग व नामजप, अशी कठोर तपस्या करतात आणि भौतिक संपत्तीशिवाय जगतात. त्यांची जीवनशैली केवळ आध्यात्मिकतेवर केंद्रित असते. अनेकदा ते गुहा किंवा आश्रमांसारख्या ठिकाणी राहतात.

महिला नागा साधूचे जीवन कसे असते?

नागा साधू हे फक्त पुरुष नसतात. नागा साधू किंवा तपस्वी महिलादेखील आहेत, ज्या आपले जीवन आध्यात्मिक साधना आणि सांसारिक अस्तित्वाचा पूर्ण त्याग करण्यासाठी समर्पित करतात. महिला नागा साधू वा साध्वीही पुरुष नागा साधूंप्रमाणेच कुटुंब आणि भौतिक संपत्तीचा त्याग करतात. ते त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यातील सर्व काही मागे सोडून त्यांच्या आध्यात्मिक मार्गात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात. ‘आउटलूक’च्या वृत्तानुसार, महिला नागा साधूंची दीक्षा प्रक्रिया पुरुषांप्रमाणेच कठोर आहे. त्यांना त्यांच्या गुरुंप्रति अतुलनीय बांधिलकी दाखवणे आवश्यक असते. महिलांना नागा साधू होण्यापूर्वी तीव्र आध्यात्मिक चाचण्या आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. महिला नागा साधूंना दीक्षा घेण्यापूर्वी सहा ते १२ वर्षे कठोर ब्रह्मचर्य पाळावे लागते. त्यांच्या साधनेदरम्यान किंवा कठोर तपश्चर्येदरम्यान त्या अनेकदा गुहा, जंगले किंवा पर्वत यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करतात.

नागा साधू किंवा तपस्वी महिलादेखील आहेत, ज्या आपले जीवन आध्यात्मिक साधना आणि सांसारिक अस्तित्वाचा पूर्ण त्याग करण्यासाठी समर्पित करतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पुरुष नागा साधूंप्रमाणे महिला तपस्वी विवस्त्र राहत नाहीत. त्याऐवजी त्या ‘गंटी’ नावाचे न शिवलेले केशरी कापड परिधान करतात आणि त्यांच्या कपाळावरच्या टिळ्यामुळे त्यांची ओळख पटते. त्यांच्या त्यागाचा एक भाग म्हणून महिला नागा साधू त्यांचे स्वतःचे ‘पिंड दान’ करतात. हा एक पारंपरिक विधी आहे, जो सामान्यतः एखाद्याच्या मृत्यूनंतर केला जातो. हा विधी म्हणजे त्यांच्या भूतकाळातील जीवनाचा अंत आणि तपस्वी म्हणून त्यांच्या पुनर्जन्माचे प्रतीक असतो. महिला नागा साधूंना समाजात आदराचे स्थान आहे. त्यांना ‘माता’ (आई) म्हणून संबोधले जाते. ही पदवी त्यांच्या आदरणीय भूमिकेचे प्रतिबिंबित करते आणि त्यांनाही पुरुष नागा साधूंप्रमाणेच आदर मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभमेळ्यात नागा साधूंची भूमिका काय?

नागा साधूंचा महाकुंभ मेळ्याशी विशेष आणि सखोल प्रतीकात्मक संबंध आहे. ‘द टेलीग्राफ’च्या मते, भारतात अंदाजे चार लाख नागा साधू राहतात आणि त्यांना महाकुंभ मेळ्यात प्रथम स्नान करण्याचा अधिकार दिला जातो. नागा साधूंची एक भव्य मिरवणूक नदीकिनाऱ्यावरून निघते. या भव्य मिरवणुकीत ते त्यांचे युद्धकौशल्य प्रदर्शित करतात. हे साधू पवित्र मंत्रांचा उच्चार करतात; ज्यातून आध्यात्मिक वातावरण तयार होते. नदीकाठावर नागा साधू पवित्र पाण्यात स्नान करतात, हा विधी पापांना शुद्ध करतो आणि आध्यात्मिक वाढीस चालना देतो, असे मानले जाते. नागा साधूच्या स्नानानंतरच इतर भक्त पवित्र स्नान करू शकतात. नागा साधू त्यांच्या विलक्षण आध्यात्मिक शक्ती व अटल भक्तीसाठी ओळखले जातात आणि लाखो भक्तांना ते प्रेरणा देतात. महाकुंभ मेळ्यात त्यांची उपस्थिती एक आशीर्वाद मानला जातो.