सिद्धार्थ खांडेकर

मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या तेज ऑस्ट्रेलियन जोडगोळीवर इंडियन प्रिमियर लीगच्या लघुलिलावात अनुक्रमे २४.७५ कोटी आणि २०.५० कोटी रुपयांच्या विक्रमी बोली लागल्या. गतवर्षी इंग्लंडच्या सॅम करनसाठी मोजलेल्या १८.५० कोटी रुपयांचा विक्रम मंगळवारी दुबईत हाहा म्हणता मागे पडला. आजवर सहसा अस्सल अष्टपैलूंसाठीच कोटीच्या कोटी मोजले जाण्याची परंपराही यानिमित्ताने मोडीत निघाली. स्टार्क आणि कमिन्स हे दोघेही तेज गोलंदाज आहेत आणि गरजेनुरूप उपयुक्त फलंदाजी करू शकतात. स्टार्क ३४ वर्षांचा असून, तब्बल आठ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. पण विविध प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळूनही तंदुरुस्ती आणि वेग यांत बोथटपणा आलेला नाही, हे स्टार्कच्या उच्चमूल्याचे एक कारण असू शकते. कोलकाता नाइटरायडर्सनी त्याच्यासाठी २४.७५ कोटी रुपये मोजले. पॅट कमिन्स हा आजवरच्या बहुतेक ऑस्ट्रेलियन कर्णधारांपेक्षा पूर्णपणे भिन्न ठरतो. तो आक्रमक नाही आणि मैदानावर खेळताना ‘ऑस्ट्रेलियन’ असल्याचा त्याला दंभही नाही. सहसा फलंदाजांकडेच नेतृत्व सोपविले जाण्याच्या ऑस्ट्रेलियन परंपरेलाही तो सणसणीत अपवाद ठरतो. आक्रमक स्वभावाच्या अभावामुळे तो ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व यशस्वीरीत्या करेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केली गेली. पण जागतिक कसोटी अजिंक्यपद, अॅशेस आणि एकदिवसीय जगज्जेतेपद अशी तीन मोलाची जेतेपदे कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्षी पटकावली. त्यामुळे मुळातच उंचपुऱ्या कमिन्सची उंची क्रिकेट विश्वात अधिकच वाढली. आता यंदाच्या आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी २०.५० कोटी रुपयांची बोली लावली.

Gautam's reaction to Virat's strike rate
IPL 2024 : विराटच्या स्ट्राईक रेटवर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘जे मॅक्सवेल करू शकतो ते कोहली करू शकत नाही अन्…’
With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

स्टार्कचे मूल्य २४.७५ कोटी रुपये कसे?

खरे म्हणजे स्टार्क तब्बल आठ वर्षांनी आयपीएल खेळण्यासाठी येत आहे. तो पूर्वी बंगळूरुकडून खेळला. पण सततच्या दौऱ्यांमुळे त्याला आयपीएलसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाची कोणतीही महत्त्वाची मालिका आयपीएलपूर्वी नाही. डावखुरा वेगवान भेदक मारा हे स्टार्कचे प्रमुख वैशिष्ट्य. दोन वेळचा एकदिवसीय विश्वविजेता आणि एक वेळचा टी-२० विश्वविजेता असलेल्या स्टार्ककडे भरपूर अनुभव आहे. डावाच्या सुरुवातीस आणि अखेरच्या टप्प्यात तेज मारा करून बळी मिळवण्याचा प्रयत्न स्टार्क करतो, त्यासाठी धावा द्याव्या लागल्या तरी प्रयत्न सोडत नाही.

हेही वाचा… IPL 2024: आयपीएलचा पुढचा हंगाम २२ मार्चपासून सुरू होऊ शकतो, कोणत्या देशाचे किती खेळाडू उपलब्ध असतील? जाणून घ्या

कमिन्ससाठी २०.५० कोटी का मोजले गेले?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्धता ही बाब नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहे. सहसा मार्च-एप्रिल-मे-जून या काळात आयपीएल खेळवली जाते. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट हंगाम तोपर्यंत संपलेला असतो. यंदा पॅट कमिन्स आयपीएलसाठी संपूर्ण हंगाम उपलब्ध राहील. तसेच आयपीएलच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या फार महत्त्वाच्या वा मोठ्या मालिका नाहीत. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक आयपीएलनंतर जूनमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे मोठी दुखापत टाळल्यास कमिन्स आयपीएलसाठी ताजातवाना राहील. आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सनी त्याच्यासाठी २०२० मधील लिलावात १७.५० कोटी रुपये मोजले होते. कमिन्स एक उत्तम तेज गोलंदाज आहे. सीम, स्विंग आणि वेग या तिन्ही अस्त्रांचा खुबीने वापर करतो. सुरुवातीच्या षटकांमध्ये विध्वंसक ठरू शकतो. तो गोलंदाज-अष्टपैलू क्रिकेटपटू गणला जातो. खालच्या क्रमांकावर आवश्यकतेनुसार उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. गेल्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या १४ चेंडूंमध्ये ५० धावा चोपल्या होत्या. त्यामुळे फलंदाज म्हणूनही गरज पडेल तेव्हा विध्वंसक ठरू शकतो. त्याच्यातील नेतृत्वगुणांचाही विचार सनरायझर्सनी केला असेलच.

हेही वाचा… IPL २००८ च्या लिलाव पत्रकाचा फोटो चर्चेत; धोनीसाठी सीएसकेने किती खर्च केला? यादीत शोएब अख्तरचेही नाव

आजवरचे सर्वांत महागडे क्रिकेटपटू कोणते?

स्टार्क आणि कमिन्सपाठोपाठ महागड्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये इंग्लंडचा सॅम करन (१८.५० कोटी, पंजाब किंग्ज – २०२३), ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन (१७.५० कोटी, मुंबई इंडियन्स – २०२३), इंग्लंडचा बेन स्टोक्स (१६.२५ कोटी, चेन्नई सुपरकिंग्ज – २०२३), दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी, राजस्थान रॉयल्स – २०२१), भारताचा युवराज सिंग (१६ कोटी, डेली डेअरडेव्हिल्स – २०१५), वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन (१६ कोटी, लखनऊ सुपरजायंट्स – २०२३), पॅट कमिन्स (१५.५० कोटी, कोलकाता नाइटरायडर्स – २०२०), भारताचा ईशान किशन (१५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स – २०२२) आणि काइल जेमिसन (१५ कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु – २०२१) यांचा समावेश होतो.

हेही वाचा… IPL 2024 Auction: आयपीएल लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरले जाईल का? जाणून घ्या सर्व नियम

महागडे खेळाडू खरोखरच तितका परतावा देतात का?

त्याविषयी निश्चित पुरावा सापडत नाही. किमान २०२०नंतर तरी सर्वाधिक बोली मोजलेल्या संघाने आयपीएल जिंकली असे घडलेले नाही. सहसा ही किंमत चढत जाते, कारण लिलावाच्या टेबलवर फ्रँचायझी परस्परांवर कुरघोडी करू लागतात, म्हणून. प्रत्येक वेळी या चढ्या किमतीचा गुणवत्तेशी किंवा कामगिरीशी संबंध असतोच असे नाही. आजवर सहसा अष्टपैलूंसाठी तगड्या बोली लावल्या गेल्याचे सूत्र दिसून येत होते. यंदा स्टार्क आणि कमिन्स यास अपवाद ठरले, कारण दोघेही प्राधान्याने तेज गोलंदाज आहेत, अष्टपैलू म्हणून ते ओळखले जात नाहीत.

siddharth.khandekar@expressindia.com