Operation Sindoor मोहिमेमध्ये पाकिस्तानी हवाई दलाची भारतीय सैन्यदलांची कशी आणि किती धूळधाण उडवली, याची सविस्तर माहितीच हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी ३ ऑक्टोबर रोजी दिली. पाकिस्तानी बाजूकडून भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचे दावे वरचेवर होत असतात. हारिस रौफसारखे त्यांचे क्रिकेटपटूही या दाव्यांचा वापर क्रिकेटच्या मैदानावर भारतीयांना चिथावण्यासाठी केविलवाण्या प्रकारे करत असतात. त्यांना या असत्य रम्य कहाण्यांमध्ये मश्गुल व्हायचे तर होऊ देत, त्याने वास्तव बदलत नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या माऱ्यात किमान दहा F-16 लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाली आणि आणखी किमान दोन मोठी विमानेही नष्ट झाली, हे या मोहिमेचे खरे वास्तव आहे. याचे पुरावेही आम्ही जगासमोर सादर केले, असे हवाईदल प्रमुखांनी ठासून सांगितले. याशिवाय पाकिस्तानी हवाई तळ, रडार यंत्रणा आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी एक क्षेपणास्त्र प्रणाली यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान पंजाबमधील पाच आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये चार दहशतवादी तळांवर भारताने प्रथम हल्ले केले. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या नृशंस हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी असल्यामुळे भारताकडून ही कारवाई झाली. ६-७ मे च्या मध्यरात्री अवघ्या अर्ध्या तासाच्या कारवाईमध्ये भारताने कित्येक दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयस्थानांच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हल्ल्यांच्या वेळी भारताने सीमा ओलांडून कारवाई केली होती. यावेळी मात्र भारतीय हवाईदल आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना लक्ष्य केले. भारतासाठी ही कारवाई तेथेच संपली होती.
पाच F-16 विमाने जमिनीवरच गारद!
पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर लगेचच भारतावर – विशेषतः भारताच्या नागरी आणि संरक्षण आस्थापनांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस या हल्ल्यांची तीव्रता अधिक होती. पण S-400 ही रशियन क्षेपणास्त्र बचाव प्रणाली, तसेच भारताच्या स्वदेशी बनावटीच्या बचाव प्रणालींनी हे हल्ले मोडून काढलेच, पण ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानकडून हल्ले न थांबल्याने भारताने नेमके आणि भेदक प्रतिहल्ले सुरू केले. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासमोर पाकिस्तानकडील चिनी बनावटीची क्षेपणास्त्र बचाव प्रणाली पूर्णपणे कुचकामी ठरली. भारताच्या तीव्र हल्ल्यांमध्ये चार रडार यंत्रणा, दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन धावपट्ट्या, तीन हँगर किंवा विमानांची आश्रयस्थाने आणि एक क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. जाकोबाबाद येथील तळाचा भारताच्या क्षेपणास्त्राने ३०० किलोमीटरचा पल्ला पार करून वेध घेतला. यात तेथे दुरुस्तीसाठी उभी असलेली किमान पाच F-16 लढाऊ विमाने नष्ट झाली.
आणखी पाच लढाऊ विमाने हवेत नष्ट!
हवाईदलाच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये एक टेहळणी विमान आणि चार ते पाच F-16, JF-17 ही लढाऊ विमाने नष्ट झाल्याचे हवाईदल प्रमुखांनी जाहीर केले. अशा प्रकारे एकूण १२-१३ विमाने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने गमावली. याशिवाय हवाईतळ, रडार यंत्रणा, कमांड अँड कंट्रोल सेंटर यांचीही अतोनात हानी झाली. F-16 लढाऊ विमाने ही पाकिस्तानी हवाईदलाचा कणा मानली जातात. एके काळी अमेरिकेकडून मिळालेल्या या अत्याधुनिक लढाऊ विमानांवरून पाकिस्तानने भारतासमोर अनेकदा वल्गना केल्या होत्या. पण बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारताच्या जुन्या पिढीतील मिग-२१ विमानाने पाकिस्तानी विमानांचा सहज मुकाबला करून त्यांतील एक पाडलेही होते. मिग-२१ विमानांचा उल्लेख त्यानंतर एफ-१६ विनाशक असा गौरवाने केला जातो.
‘त्यांना कल्पनाविलास रंगवू द्या!’
आमची १५ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून होतो. पण त्यासाठी पुरावे सादर करावे लागतात, असा टोला हवाईदलप्रमुखांनी लगावला. आम्ही पुरावे सादर केले, त्यांनी ते केलेले नाहीत. पण कपोलकल्पितामध्ये रममाण होणे ही पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची गरज आहे. त्यांना जनतेसमोर काहीतरी सांगावे लागेल. पण आम्हाला त्यांची फिकीर नाही, असे सांगत हवाईदल प्रमुखांनी भारताच्या नुकसानीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.