scorecardresearch

नव्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या ‘सेंगोल’ राजदंडाला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय संबंध? जाणून घ्या ऐतिहासिक संदर्भ

उपलब्ध कागदपत्रांनुसार भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे शेवटचे व्हॉइसराॅय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सत्तेचे हस्तांतर दर्शवणारा एखादा प्रतीकात्मक कार्यक्रम असावा का? अशी विचारणा नेहरू यांच्याकडे केली.

PARLIAMENT NEW BUILDING AND SENGOL INFORMATION
पंडित जवाहरलाल नेहरू, संसदेची नवी इमारत, सेंगोल (फोटो-एएनआय, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

येत्या २८ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याला काँग्रेससह इतर २० विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. मोदी यांच्याऐवजी लोकसभेचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, एकीकडे हा वाद रंगलेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत ऐतिहासिक राजदंड (सेंगोल) लोकसभाध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला जाणार असल्याची माहिती दिली. या राजदंडाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या राजदंडाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे? त्याला सेंगोल का म्हणतात? तो पंडित नेहरू यांच्याकडे कसा हस्तांतरित करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

हेही वाचा >> विश्लेषण: सूरजागड लोहखाणीविषयी स्थानिकांमध्ये असंतोष का वाढतोय?

राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित करण्यात येणार!

अमित शाह यांनी २४ मे रोजी पत्रकार परिषद घेत २८ मे रोजी आयोजित केलेल्या संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. या वेळी त्यांनी तमिळनाडू येथून आणलेल्या सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजदंडाविषयी माहिती दिली. संसदेच्या उद्घाटनासह मोदी हा राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित करतील, असे शाह यांनी सांगितले. सेंगोल या शब्दाची व्युत्पत्ती तामिळ भाषेतील सेम्माई या शब्दापासून झालेली आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता, अशी माहिती शाह यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता..

हेही वाचा >> विश्लेषण: मध्य प्रदेशात सत्तेसाठी काँग्रेसची हमी; कर्नाटकचा कित्ता गिरविल्याचा फायदा होईल?

ब्रिटिशांनी नेहरूंना राजदंड (सेंगोल) का दिला?

उपलब्ध कागदपत्रांनुसार भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सत्तेचे हस्तांतर दर्शवणारा एखादा प्रतीकात्मक कार्यक्रम असावा का? अशी विचारणा नेहरू यांच्याकडे केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता देण्यात आली, तसेच या कार्यक्रमाकडे प्रतीकात्मकतेने सत्ता हस्तांतरण म्हणून पाहिले जावे, असे माऊंटबॅटन यांना वाटत होते. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सी. राजगोपालचारी यांच्याशी याबाबत बातचीत केली. राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे जनरल-गव्हर्नर होते. त्यानंतर राजगोपालचारी यांनी दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या काळातील सत्ता हस्तांतरणाबद्दल सांगितले. त्या काळात चोल साम्राज्याची राजवट एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे हस्तांतरित करायची असेल, तर खास कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. या कार्यक्रमात राजवटीच्या हस्तांतरानंतर लोक नव्या राजाला आशीर्वाद द्यायचे.

हेही वाचा >> संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन अन् काँग्रेस-भाजपा वाद! नेमके प्रकरण काय? जाणून घ्या इंदिरा गांधी, राजीव गांधींचा संदर्भ 

चोल साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सोपवताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोलचा वापर केला जायचा. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई.

सेंगोलची निर्मिती कशी करण्यात आली?

राजगोपालचारी यांनी सुचवल्याप्रमाणे राजदंडाच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा समारंभ आयोजित करण्यास पंडित नेहरू यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर रोजगोपालचारी यांच्यावरच सेंगोलची तजवीज करण्याची जबाबदारी देण्यात आली. ठरल्याप्रमाणे त्यांनी तामिळनाडू राज्यातील तंजोर जिल्ह्यामधील ‘थिरुवादुथुराई अथिनाम’ मठात जाऊन याबाबत विचारणा केली. त्यानंतर या मठातील प्रमुखाने एका उच्च प्रतीच्या सेंगोल म्हणजेच राजदंडाची निर्मिती करण्याचे सुचवले. या राजदंडाची निर्मिती करण्याची जबाबदारी ‘वुम्मीदी बंगारू चेट्टी ज्वेलर्स’वर सोपवण्यात आली. वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर या दोन व्यक्तींनी या राजदंडाची निर्मिती केली. या दोन्ही व्यक्ती अजूनही हयात आहेत. त्यांना या राजदंडाच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आठवते. या राजदंडाची लांबी पाच फूट आहे. तसेच त्यावर एक नंदी आहे. नंदी हे न्यायाचे प्रतीक आहे.

हेही वाचा >> केंद्रीय लोकसेवा आयोगाचा इतिहास काय? स्थापना कशी झाली? जाणून घ्या…

सेंगोल नेहरू यांच्याकडे कसा सोपवण्यात आला?

उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार अथिनाम मठातील दुसऱ्या क्रमांकाचे पुजारी, नादस्वरम वादक राजारथिनाम पिल्लाई, तसेच ओदूवर (गायक) अशा तीन व्यक्तींनी तामिळनाडूमधून हा राजदंड आणला. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पुजाऱ्यांनी हा राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांना दिला. त्यानंतर तो त्यांच्याकडून परत घेतला. पुढे मोठी मिरवणूक काढून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. त्यानंतर हा राजदंड नेहरूंकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी तेथील पुजाऱ्यांनी खास गाणे सादर केले होते. तशी उपलब्ध कागदपत्रांमध्ये नोंद आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: कर्नाटकच्या निकालानंतर भाजपविरोधात एकजुटीची चर्चा, नितीशकुमारांच्या प्रयत्नांना यश येईल? 

पुजाऱ्यांनी सादर केलेले विशेष गाणे हे ७ व्या शतकातील तिरुग्नाना या संतांनी रचले होते. ते फक्त १६ वर्षे जगले. या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ते देशाचे पहिले राष्ट्रपती झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या