scorecardresearch

विश्लेषण: नवा बर्ड फ्लू विषाणू मानवांसाठी धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांना का वाटते?

स्पॅनिश मिंक फार्मवर बर्ड फ्लूच्या उद्रेकाने शास्त्रज्ञांना घाबरवले आहे. हा विषाणू प्रथमच सस्तन प्राण्यापासून सस्तन प्राण्यांमध्ये पसरत आहे. मानवांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते, अशी शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.

bird flu outbreak
प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो – REUTERS)

उत्तर पश्चिम स्पेनमधील गॅलिसिया येथील एका पशू फार्ममध्ये अनेक मिंक प्राणी (तपकिरी रंगाचे मुंगूस) मृतावस्थेत आढळले. पशुवैद्यांनी सुरुवातीला करोना व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत असा कयास बांधला होता. मात्र चाचण्या झाल्यानंतर असे दिसून आले की हे मृत्यू एव्हियन फ्लू विषाणू H5N1 मुळे झाले आहेत. हा धोकादायक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या फार्ममधील ५० हजारांहून अधिक मिंक मारण्यात आले. या फार्ममध्ये काम करणाऱ्या शेतमजूरांना अद्याप कोणताही संसर्ग झाला नसला तरी हे प्रकरण शास्त्रज्ञांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. Deutsche Welle या संकेतस्थळाने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

पक्ष्यांकडून इतर प्रजातींमध्ये विषाणूचा प्रसार आता नवीन राहिलेला नाही. कोल्हे, सील, रॅकून (एकप्रकारचे अस्वल) यांच्यामध्ये बर्ड फ्लू आणि एव्हीएन इन्फ्लूएन्झा आढळलेले आहे. मात्र यावेळचे प्रकरण वेगळे आहे. मानवांना H5N1 चा संसर्ग झाल्याचे काही प्रकरणे समोर आली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, आतापर्यंत मानवाकडून मानवामध्ये या विषाणूचा संक्रमण झाल्याचे समोर आलेले आहे. जर्मनीतली फ्रेडरिक लोफ्लर इन्स्टिट्यूटच्या डायग्नोस्टिक व्हायरॉलॉजी विभागातील तज्ज्ञ टिम हार्डर यांनी सांगितले की, हा विषाणू पक्षी किंवा त्यांच्या शवांच्या मलमूत्राच्या संपर्काद्वारे मानवांमध्ये किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये संक्रमित झाला होता.

मात्र यावेळी शास्त्रज्ञांना एक वेगळीच चिंता सतावत आहे. कारण आपल्याकडे जशा कोंबड्या दाटीवाटीने पोल्ट्री फार्ममध्ये ठेवल्या जातात, त्याचप्रकारे मिंक फार्ममध्ये मिंक मर्यादीत जागेत मोठ्या संख्येने ठेवले जातात. त्यामुळे या सस्तन प्राण्यामध्ये वेगाने संसर्ग पसरतो, असे हार्डर म्हणाले. शास्त्रज्ञांना अशी भिती वाटत आहे की, जागतिक स्तरावर अनेक पक्ष्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा विषाणू मिंक फार्मद्वारे वेगाने पसरू शकतो आणि अधिक संक्रमणशील होऊ शकतो. लंडनमधील इम्पिरियल कॉलेजचे विषाणूशास्त्रज्ञ टॉम पिकॉक एका विज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकाला मुलाखतीत म्हणाले की, “H5 महामारीची ही सुरुवात होत असल्याची परिस्थिती दिसत आहे.”

एव्हियन इन्फ्लूएंझा मानवी साथीच्या रोगास कारणीभूत ठरू शकतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जानवारी २००३ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जगभरात मानवांमध्ये H5N1 संसर्गाच्या ८६८ प्रकरणांपैकी ४५७ प्रकरणे प्राणघातक होती. तर आतापर्यंत मानवापासून ते मानवापर्यंत विषाणूचा संसर्ग होत नसल्यामुळे एव्हियन फ्लूपासून मानवला कमी दोका होता, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. टिम हार्डर म्हणाले की, मिंकमध्ये आढळलेल्या विषाणूच्या उत्परिवर्तनांचा अभ्यास आणि त्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.

निरुपद्रवी व्हायरस धोकादायक कसा बनला?

जलपर्णीमुळे इन्फ्लूएन्झा विषाणूंची वाढ होण्यास मदत होते. सुरुवातीच्या काळात या विषाणूमध्ये रोग पसरविण्याची क्षमता कमी होती, असे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे पक्षीशास्त्रज्ञ वोल्फगँग फिडलर यांनी सांगितले. मात्र फिडलर यांनी असेही सांगितले की, हा विषाणू जरी निरुपद्रवी असला तरी पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी दाटीवाटीने असल्यामुळे तो वेगात पसरला. यावेळी विषाणूमध्ये उत्परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

वन्य पक्षांकडून पोल्ट्री फार्ममधील बदकांना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. जसे की, काही फार्ममध्ये डुकरांसोबतच बदकांनाही एकत्र ठेवले जाते. ज्यामुळे विषाणूच्या म्युटेशन अर्थात उत्परिवर्तन प्रक्रियेस चालना मिळते. अशी परिस्थिती विषाणूसाठी अत्यंत सोयीची असते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बर्ड फ्लू टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, अत्यंत रोगजनक स्ट्रेनचा उद्रेक विशेषतः घरगुती आणि व्यापारी पोल्ट्री फार्ममधून झाला. दूषित पोल्ट्री, पोल्ट्री उत्पादनांमुळे याचा धोका आणखी वाढला. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या H5N1 आणि H5N8 विषाणूचा संसर्ग शेतातील फार्ममधून वन्य पक्षांमध्ये झाला. त्यामुळे वन्य पक्षांच्या स्थलांतराच्या माध्यमातून हा विषाणू दूरवर पसरू शकतो, असे विषाणूशास्त्रज्ञ टिम हार्डर यांनी सांगितले.

या बर्ड फ्लू मुळे किती नुकसान झाले?

युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार एव्हिएन फ्लूचा सर्वाधिक उद्रेक युरोपमध्ये पाहायला मिळाला आहे. ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान ३७ देशांमध्ये ५० दशलक्ष पक्षी यामुळे मारले गेले आहेत. तर ३,८०० हून अधिक उच्च रोगजनक बर्ड फ्लू प्रकरणे वन्य पक्षांमध्ये आढळून आली आहेत. आतापर्यंत हा विषाणू हिवाळ्यात पसरताना दिसून यायचा. पण अलीकडे उन्हाळ्याच्या महिन्यात देखील वन्य पक्षांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला दिसत आहे. एव्हियन इन्फ्लूएंझाची लाट यावेळी पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकेत पोहोचली. पेरू, व्हेनेझुएला, इक्वेडोर आणि कोलंबियामध्ये याचा प्रसार झालेला पाहायला मिळाला.

हार्डर यांना चिंता वाटते की, हा विषाणू दक्षिण अमेरिकेपासून अंटार्क्टिकापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे पेंग्विनची लोकसंख्या धोक्यात येऊ शकते. अंटार्क्टिका व्यतिरिक्त केवळ ऑस्ट्रेलिया या विषाणूपासून वाचलेला आहे. विषाणूचा तीव्र प्रसार होत असला तरी हार्डर यांना एक आशेचा किरण दिसतो. विषाणूचा वन्य पक्षांमध्ये झालेला असल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:37 IST
ताज्या बातम्या