scorecardresearch

विश्लेषण : शिवजयंती तारखेने की तिथीने… काय आहे हा वाद?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते.

shivjayanti date wise and tithi wise
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला यावरून इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद होता

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला यावरून इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद होता. सन १६२७ की १६३० असे त्या वादाचे प्रमुख स्वरूप होते. अखेर जेधे शकावली आणि विविध इतर पुराव्यांच्या आधारे फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० यावर २००० साली तत्कालीन राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते. विशेष म्हणजे शिवजंयती साजरी करण्यावरून नवीन मागणी करत आधी मुंबई काँग्रेसने व आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे.

शिवजयंतीचा नेमका वाद काय होता व निर्णय काय झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म  वैशाख शुद्ध द्वितिया शके १५४९ ला म्हणजेच ६ एप्रिल १६२७ ला झाल्याचे मानले जात होते. पण त्यावरून इतिहासतज्ज्ञांमध्ये वाद होता. काहींच्या मते शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९६६ मध्ये इतिहासतज्ज्ञांची समिती नेमली. पण त्यांच्यात एकमत झाले नाही. राज्यात १९९९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर व मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना आणि रामकृष्ण मोरे शिक्षणमंत्री असताना पुन्हा हा विषय चर्चेला आला. अखेर विविध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आधुनिक काळात सर्वच राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या या इंग्रजी तारखेनुसार साजऱ्या केल्या जात असल्याने, राज्य सरकारने १९ फेब्रुवारीला शिवजयंती जाहीर करत त्या दिवशी सरकारी सुटीही जाहीर केली. 

तिथीचा वाद मिटला तरी तारखेचा सुरू…

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फाल्गुन वद्य तृतिया ही ठरल्यानंतर, तरीही ती १९ फेब्रुवारी १६३० या त्या दिवशीच्या इंग्रजी कालगणनेप्रमाणे साजरी करायची की तिथीनुसार (म्हणजे फाल्गुन वद्य तृतिया, जी यंदा २१ मार्च रोजी आली) हा वाद सुरू झाला. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते. कालांतराने शिवसेना फुटली आणि राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सणांचा संदर्भ दिला. आपण गणपती, दिवाळी हे सण दरवर्षी विशिष्ट तारखेला साजरे करत नाही तर तिथीनुसार साजरे करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे दैवत असल्याने त्यांची जयंती ही सणासारखीच साजरी व्हायला हवी. त्यामुळेच शिवजंयती तारखेनुसार नव्हे तर तिथीनुसार अशी भूमिका राज ठाकरे यांनी ‘कालनिर्णय’कार जयंत साळगावकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा दाखला देत घेतली आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवर शिवजयंती साजरी केली. 

भाजप व काँग्रेसची उडी

शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर शिवसेना शिवजयंतीबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकृत निर्णयानुसार मुख्यमंत्री या नात्याने १९ फेब्रुवारी शिवजंयती साजरी केली. तर तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेनुसार शिवसेनाप्रमुख या नात्याने त्यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत शिवजयंती साजरी केली. शिवजंयतीच्या या राजकीय वादात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उडी घेतली. शिवजयंतीच्या तिथीला  घराघरात साजरी करण्याचे आवाहन करावे अशी मागणी जगताप यांनी या पत्रात ठाकरे यांना केली. मुख्यमंत्री या नात्याने राज्य सरकारच्या १९ फेब्रुवारी या सरकारी शिवजयंतीला ते बांधील असताना, अशी मागणी करून जगताप यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर त्याच वेळी विधानसभेत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तिथीनुसार शिवजंयती असल्याने त्यांची प्रतिमा विधिमंडळात ठेवून आदरांजली वाहण्याचा विषय उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला गेले असा मु्द्दा मांडला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली आणि आज ते शिवसेनापक्षप्रमुख या नात्याने शिवजयंती साजरी करायला गेले असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपची सत्ता असताना २०१४ ते २०१९ या काळात विधिमंडळात तिथीनुसार राज्य सरकारने कधी शिवजयंती साजरी केली नव्हती याची आठवण करून दिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivjayanti date wise and tithi wise what is the exact issue print exp 0322 scsg

ताज्या बातम्या