-आसिफ बागवान

ॲपलने आयफोनची नवी आवृत्ती अर्थात आयफोन १४ ची घोषणा करताना त्यातून सिम कार्ड हद्दपार केल्याचे जाहीर केले. अमेरिकेत निर्माण केल्या जाणाऱ्या आयफोन १४मध्ये सिम कार्डसाठी स्लॉट (जागा) ठेवण्यात आला नसल्याचे ॲपलने जाहीर केले. त्याऐवजी या आयफोनमध्ये आठ ‘ई सिम’ चालू ठेवण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आल्याचेही ॲपलने जाहीर केले. ॲपलच्या या घोषणेनंतर ‘ई सिम’बद्दल भारतीयांचेही कुतूहल जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘ई-सिम’ म्हणजे काय, ते कसे काम करते आणि त्यामुळे सिम कार्ड पूर्णपणे हद्दपार होणार का, याचा घेतलेला वेध.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

‘ई-सिम’ म्हणजे काय?

‘ई-सिम’ हा ‘एम्बेडेड सिम’ या शब्दाचा संक्षेप आहे. प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी डिजिटली जतन करून मोबाइल सेवा वापरण्याची सुविधा ई-सिम देते. यात प्लास्टिकचे सिम कार्ड बसवण्यासाठी जागा दिलेली नसते. मोबाइलच्या हार्डवेअरमध्येच सिम कार्डच्या चिपचा अंतर्भाव करण्यात आलेला असतो. कोणत्याही मोबाइल सेवापुरवठादाराची सेवा घेऊन या चिपद्वारे ई-सिम कार्यान्वित करण्यात येतो. तसेच मोबाइल सेवा बदलायची झाल्यास नवीन सिम कार्ड बसवण्याच्या खटपटीत न पडता चिप ‘रिप्रोग्राम’ करून सेवा सक्रिय करता येते.

आयफोनमधील ई-सिम सेवेचे काय?

ॲपलने आयफोन १४च्या अमेरिकेतील आवृत्तीतून सिम कार्डची जागा हद्दपार करण्याचे जाहीर केले आहे. त्याऐवजी आयफोन १४मध्ये आठ ई-सिम प्रोफाइल कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ वापरकर्त्याला एका आयफोनवरून आठ क्रमांक हाताळण्याची सोय असेल. अर्थात एका वेळी केवळ दोनच ई-सिम त्याला सक्रिय ठेवता येतील.

ई-सिमचे फायदे काय?

ई-सिमचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, यात प्रत्यक्ष सिम कार्डची गरज नसते. त्यामुळे एकाच फोनवर अधिक ई-सिम क्रमांक घेऊन त्यांचा वापर करणे सहज शक्य आहे. ई-सिम मोबाइल सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. मोबाइल चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास अन्य व्यक्ती त्यातील सिम कार्ड काढून दुसरे सिमकार्ड टाकून मोबाइलचा वापर करू शकतात. मात्र, ई-सिम कार्यान्वित असलेल्या मोबाइलवर हे करणे शक्य नाही. शिवाय त्याद्वारे हरवलेल्या मोबाइलचा थांगपत्ता काढणेही शक्य हाेऊ शकते.

पण, धोके आहेतच…

ई-सिम ही आकर्षक संकल्पना असली तरी, तिचे काही धोके आहेत. यातील पहिला धोका म्हणजे, अचानक मोबाइल खराब झाल्यास किंवा त्यातील डिस्प्ले चालेनासा झाल्यास मोबाइल पूर्णपणे संपर्कहीन होऊ शकतो. प्लास्टिकचे सिम कार्ड असल्यास ते काढून अन्य मोबाइलमध्ये टाकून त्याचा वापर करता येऊ शकतो. मात्र, ई-सिमची सेवा कार्यान्वित असल्यास हे करणे शक्य नाही. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक देशांत अजूनही ई-सिमला मान्यता नाही किंवा त्याची सुरुवात झालेली नाही.

सिम कार्ड पूर्णपणे हद्दपार होतील का?

ई-सिम सुविधा ही तशी दहा वर्षे जुनी आहे. मात्र, अजूनही ती प्रचलित झालेली नाही. अद्याप ही सुविधा काही निवडक आणि उच्च किंमत श्रेणीतील स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे. सिमकार्डसाठीचा ‘स्लॉट’ कमी झाल्यास मोबाइल निर्मात्या कंपन्या आणि मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांचा निर्मितीखर्च कमी होणार आहे. मात्र, हे तंत्रज्ञान अद्याप कमी किमतीतील स्मार्टफोनच्या मदरबोर्डशी संलग्न करण्यात आलेले नाही. परिणामी सिमकार्ड पूर्णपणे हद्दपार होऊन ई-सिम पूर्णपणे त्याची जागा घेण्याची परिस्थिती येण्यास आणखी काही वर्षे जावी लागतील.