संजय जाधव
मागील काही वर्षांपासून ब्रिटनमधील मोटार उद्योगाला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षी देशातील मोटार उत्पादनाने मागील ६६ वर्षांतील नीचांक गाठला. कारण तेथील दोन मोटार निर्मिती प्रकल्पांना टाळे लागले. यामागे जागतिक पातळीवरील सेमिकंडक्टरची टंचाई आणि बिघडलेली पुरवठा साखळी ही कारणे होती. याचबरोबर अनेक प्रतिस्प्रर्धी देशांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात सवलती दिल्याने ब्रिटनच्या वाहन उद्योगासमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. यातच आता टाटा समूहाने ब्रिटनमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यामुळे ब्रिटनमधील मोटार उद्योगाचे चित्र पालटणार का?
टाटांची नेमकी गुंतवणूक काय?
गिगाफॅक्टरी उभारण्यासाठी ४ अब्ज पौंडांची गुंतवणूक करण्याची घोषणा टाटा समूहाने केली आहे. इलेक्ट्रिक मोटारींसाठीच्या बॅटरीचे उत्पादन यातून होणार आहे. भारतातील वाहन उद्योगाकडून परदेशात झालेली ही लक्षणीय गुंतवणूक ठरली आहे. या प्रकल्पातून ४० गिगावॉट तास क्षमतेच्या बॅटरींचा पुरवठा केला जाईल. समूहाने इलेक्ट्रिक वाहने आणि अपारंपरिक ऊर्जेकडे वळण्याचे धोरण स्वीकारले आहे. या प्रकल्पातून ब्रिटन आणि युरोपमधील ग्राहकांना इलेक्ट्रिक आणि अपारंपरिक ऊर्जा पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टाटा समूहातील जग्वार लँड रोव्हर आणि टाटा मोटर्स या कंपन्या सुरुवातीला या प्रकल्पाच्या प्रमुख ग्राहक असतील. या प्रकल्पातून बॅटरींचा पुरवठा २०२६ पासून सुरू होणार आहे.
प्रकल्पाचा आवाका किती?
गिगाफॅक्टरीमधून वर्षाला सुमारे पाच लाख वाहनांना बॅटरीचा पुरवठा केला जाणार आहे. त्यातून चार हजार रोजगारनिर्मिती होणार असून, पुरवठा साखळीचा विस्तार होणार आहे. त्यामुळे पुरवठा साखळीतही आणखी रोजगार निर्मिती होईल. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपमधील सर्वांत मोठ्या बॅटरी उत्पादन प्रकल्पांपैकी हा एक असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाहन निर्मिती क्षेत्राला इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळविण्याचे काम या माध्यमातून केले जाईल. याची सुरुवात जग्वार लँड रोव्हरपासून सुरू होईल.
ब्रिटनसाठी निर्णय महत्त्वाचा का?
टाटा समूहाचा ब्रिटनमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या सरकारसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ब्रिटन सरकारने शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले असून, २०३० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल मोटारींवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे. ब्रिटनच्या वाहन उद्योगात आतापर्यंत झालेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. ब्रिटनमध्ये या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होतील. याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आमचा देश जागतिक पातळीवर आघाडीवर जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
स्पेन अन् ब्रिटनमध्ये स्पर्धा?
टाटा समूहाकडून बॅटरी उत्पादन प्रकल्पासाठी ब्रिटनऐवजी स्पेनच्या पर्यायावर विचार सुरू होता. कारण नऊ महिन्यांपूर्वी ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. तत्कालीन पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्याने वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरतेचे वारे निर्माण झाले होते. त्यावेळी देशाने दोन महिन्यांत तिसऱ्या पंतप्रधानाचे स्वागत केले. टाटा समूहाने ब्रिटनवर फुली मारली. याबाबत अधिकृतरित्या कळविण्यात आले. त्यानंतर ब्रिटन सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या. ब्रिटनमधील मंत्री आणि टाटा समूहाच्या अध्यक्षांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. याचबरोबर ब्रिटनचे मंत्री ग्रँट शॅप्स मुंबईत आले. त्यांनी चंद्रशेखरन यांची भेट घेतली. त्यानंतर गुंतवणूक मंत्री डॉमनिक जॉन्सन मुंबई दौऱ्यावर आले. अखेर टाटा समूहातील अधिकाऱी आणि ब्रिटनचे मंत्री यांच्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब झाले.
वाहन उद्योगाला ऊर्जितावस्था?
ब्रेग्झिटनंतर ब्रिटनमधील मोटार उद्योग आणि युरोपीय समुदाय यांचे संबंध गुंतागुतीचे बनले आहेत. ब्रिटनममधील मोटार उत्पादकांसाठी युरोपीय सुमदाय ही मोठी बाजारपेठ आहे. देशातील एकूण मोटार निर्यातीपैकी ५८ टक्के युरोपीय समुदायात होते. ब्रिटनमधील वाहन उद्योगाला लागलेली घसरण या प्रकल्पामुळे थांबण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटनमधील वाहन उद्योग पुन्हा एकदा मानाचे स्थान पटकावेल, अशी चर्चा सुरू आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या वाहन उद्योगाला टाटा समूहाच्या या प्रकल्पामुळे उभारी मिळणार आहे. ब्रिटनला अनेक बॅटरी प्रकल्पांची आवश्यकता आहे. यातून वाहन उद्योगाला पुन्हा गती मिळणार आहे. टाटा समूहाच्या या गुंतवणुकीमुळे इतर कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ आगामी काळात वाढणार आहे.
sanjay.jadhav@expressindia.com