scorecardresearch

Premium

अमेरिकेचे सरकार १ ऑक्टोबर रोजी ‘शटडाऊन’? सरकार शटडाऊन होणे म्हणजे काय, ते कसे होते?

अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगावर ३० सप्टेंबरपर्यंत मार्ग निघाला नाही तर १ ऑक्टोबरपासून सरकारला ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे अमेरिकन सरकारचे कामकाज विस्कळीत होण्याबरोबरच हजारो कर्मचाऱ्यांना विनावेतन काम करावे लागू शकते.

America Government Shutdown
अमेरिकन सरकार शटडाऊन होण्याच्या मार्गावर. (Photo – Financial Express)

जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक अमेरिकन काँग्रेसने वेळेत मंजूर केले नाही तर अमेरिका सरकारचे “शटडाऊन” १ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते. अमेरिकेच्या राजकारणात, सरकारी खर्चाला मंजुरी देणारे विधेयक संसदेत संमत झाले नाही किंवा अध्यक्षांनी अशा खर्चाला परवानगी देणाऱ्या अध्यादेशावर सही करण्यास नकार दिल्यास “शटडाऊन’ होते. अशा परिस्थितीत, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाते किंवा विनावेतन काम करायला सांगितले जाते.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाकडे अद्याप सात दिवसांचा कालावधी असून या काळात त्यांना सरकारी खर्चाचे विधेयक तयार करून दोन्ही सभागृहात त्यावर एकमत मिळवावे लागणार आहे. हे विधेयक ३० सप्टेंबरपर्यंत मंजूर न झाल्यास १ ऑक्टोबरपासून सरकारला ‘शटडाऊन’ला सामोरे जावे लागू शकते. जर शटडाऊन लागू झाले तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर कायम राहू शकतात. मात्र, शटडाऊन असेपर्यंतच्या काळाचे वेतन त्यांना मिळणार नाही. अमेरिकन खासदारांच्या खर्चाच्या विधेयकावर एकमत होण्यासाठी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंतचा वेळ आहे. सरकारचा याआधी मंजूर झालेला निधी संपण्याआधी नवीन खर्चाच्या विधेयकावर स्वाक्षरी होणे आवश्यक आहे.

Disappointment with small savers
छोट्या बचतदारांच्या पदरी निराशाच
Refugees from Myanmar
म्यानमारच्या निर्वासितांची बायोमेट्रिक तपासणी करणार नाही; मिझोरामच्या सरकारने केंद्राचे आदेश धुडकावले
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
the beast jo biden
बंपरमध्ये शॉटगन, बॉम्ब हल्ल्यातूनही वाचवते, जो बायडेन यांच्या ‘द बीस्ट’ कारची किंमत तुम्हाला माहिती का? वाचा…

विद्यमान स्थितीत जर अमेरिकेत शटडाऊनची परिस्थिती उद्भवली तर त्याचे संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्थेवर अनेक अंगांनी प्रतिकूल परिणाम पाहायला मिळू शकतात. पुन्हा मंदी सुरू होण्याच्या भीतीने व्यापारीवर्ग आणि ग्राहकांच्या आत्मविश्वासावर त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीररित्या शटडाऊनचे समर्थन केलेले आहे. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तीन वेळा शटडाऊन जाहीर करण्यात आले होते.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी (२३ ऑक्टोबर) आपली भूमिका मांडत असताना, रिपब्लिकन खासदारांचा एक छोटा गट खूपच आक्रमक झाल्याचे सांगत त्यांच्यावर प्रस्तावित शटडाऊनचे खापर फोडले. अर्थसंकल्पाशी निगडित गोंधळ सावरण्यासाठी अमेरिकन सरकारकडे एक आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे खासदारांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बायडेन यांनी केले.

काँग्रेशनल ब्लॅक कॉकस पुरस्कार सोहळ्याच्या स्नेहभोजनाप्रसंगी बोलत असताना बायडेन म्हणाले, “सरकारी खर्चाला मंजुरी देण्याच्या बाबीवर मी आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे (House of Representatives) अध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते केव्हिन मॅककार्थी यांनी याआधी सहमती केली होती. आता रिपब्लिकन खासदारांमधील एक छोटा गट आक्रमक झाला असून त्यांना ही सहमती मंजूर नाही. यासाठी आता ते संपूर्ण अमेरिकेला वेठीस धरून सामान्य अमेरिकन्सना याची किंमत मोजायला भाग पाडत आहेत.” बायडेन यांच्या या प्रतिक्रियेची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली.

शटडाऊन म्हणजे काय?

सरकारी खर्चाची तरतूद असणाऱ्या विधेयकावर राष्ट्राध्यक्षांची निहित वेळेत स्वाक्षरी झाली नाही, तर सरकारवर शटडाऊनची वेळ येते. अमेरिकन सरकारमधील विविध यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला १२ प्रकारच्या वित्तपुरवठा करणाऱ्या विधेयकांना वेळोवेळी मंजुरी द्यावी लागते. सरकारवर शटडाऊन होण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारकडून अनेकदा खर्चाला तात्पुरती मुदतवाढ देण्यासाठी अध्यादेश काढला जातो. जेणेकरून सरकारचे कामकाज विनासायस सुरू राहण्यासाठी मदत होते.

शटडाऊन किती काळ चालू शकतो?

अमेरिकन काँग्रेसने ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सरकारी खर्चाला मंजुरी देणाऱ्या विधेयकावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर केले नाही, तर १२.०१ मिनिटांनी सरकार शटडाऊन झाल्याचे जाहीर होईल. शटडाऊन नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. त्यासाठी अमेरिकन खासदारांना सरकारला निधी प्रदान करणारी योजना तयार करावी लागते. सरकारला आवश्यक निधी प्रदान करण्यासाठी सभागृह आणि संसदेत एकमत व्हावे लागेल, त्यानंतर त्या विधेयकावर राष्ट्राध्यक्ष स्वाक्षरी करून शटडाऊनचा अखेर करतात.

अमेरिकन काँग्रेस दोन सभागृहात विभागलेली आहे. त्यापैकी अमेरिकन सिनेटमध्ये (United States Senate) डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे, तर प्रतिनिधी सभागृहात (House of Representative) रिपब्लिकनचा वरचष्मा आहे. प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष केव्हिन मॅककर्थी हे कट्टर उजव्या विचारसरणीचे असून सरकारच्या खर्चात कपात करण्यासाठी ते शटडाऊनचा वापर करू पाहत आहेत. त्यामुळे हे शटडाऊन अनेक आठवडे टिकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अमेरिकेत याआधी कितीवेळा शटडाऊन झाले?

शटडाऊनची ही समस्या अमेरिकेत पहिल्यांदा उद्भवलेली नाही. १९८१ पासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळापर्यंत १४ वेळा शटडाऊन करण्यात आलेले आहे. २०१८ आणि २०१९ सालीदेखील शटडाऊन झाले होते. २०१९ मध्ये तब्बल ३५ दिवस शटडाऊन चालले होते. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३ मध्येही अशी वेळ होती. २०१३ मध्ये दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे आठ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले. त्याचप्रमाणे १९८१, १९८२, १९९०, १९९५ आणि १९९६ या वर्षांमध्येही अमेरिकेवर शटडाऊनची नामुष्की ओढवली होती. शटडाऊनचा नागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही. ते कर्मचारी काम करतील. मात्र, निधीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना पगार दिला जाणार नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us govt faces shutdown on october 1 what does it mean who gets affected kvg

First published on: 25-09-2023 at 19:15 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×