संतोष प्रधान उत्तर प्रदेशातील सातव्या व अंतिम टप्प्यात ५४ विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान होत आहे. या अखेरच्या टप्प्यात साऱ्या नजरा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांतील आठ विधानसभा मतदारसंघांवर लागल्या आहेत. गेल्या वेळी जिंकलेल्या आठही जागा कायम राखण्यासाठी स्वत: मोदी यांनी तीन दिवस वाराणसीमध्ये मुक्काम ठोकला होता. वाराणसीमध्ये समाजवादी पार्टी, काँग्रेसनेही जोर लावला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वाराणसीमध्ये मोदी, अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे रोड शो झाले. सर्वांनीच वातावरणनिर्मिती केली आहे. या टप्प्यातच मतदान होत असलेल्या आझमगडमध्ये अखिलेश यादव आणि सपाचा मुस्लीम चेहरा व सध्या तुरुंगात असलेले आझम खान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: अखिलेश हे आझमगड मतदारसंघातून अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. यामुळेच मोदी यांच्याप्रमाणेच अखिलेश यांना स्वत:च्या मतदारसंघातून अधिक यश मिळविण्याचे आव्हान असेल. गत वेळी ५४ पैकी ३६ जागा या भाजप वा मित्र पक्षांनी जिंकल्या होत्या. समाजवादी पार्टीने ११ , बसपा पाच तर एक जागा अन्य पक्षाने जिंकली होती. अखेरच्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांत मतदान होत आहे ? सातव्या व अखेरच्या टप्प्यात वाराणसी, आझमगड, मऊ, गाझीपूर, जौनपूर, मिर्झापूर, चंदौली, सोनभद्र, बधौई या नऊ जिल्ह्यांतील ५४ मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात ६१३ उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी प्रतिष्ठेचे का केले ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ. वाराणसी जिल्ह्यातून आठ आमदार निवडून येतात. २०१७ मध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी आठही जागा जिंकल्या होत्या. यंदाही आठही मतदारसंघांत विजय मिळविण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. कारण पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघात एक किंवा दोन मतदारसंघात जरी पराभव झाला तरी त्याचीच राष्ट्रीय पातळीवर चर्चा अधिक होईल. हे मोदी व भाजपला टाळायचे आहे. म्हणूनच मोदी यांनी स्वत:च या मतदारसंघांची जबाबदारी घेतली. तीन दिवस ते वारासणीत प्रचार करीत होते. शुक्रवारी त्यांचा रोड शो झाला. त्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हा रोड शो तीन विधानसभा मतदारसंघातून झाला. वाराणसीच्या विकासावर मोदी यांनी भर दिला आहे. काशी विश्वनाथ मंदिर व आसपासच्या परिसराच्या नूतनीकरणाच्या कामात मोदी यांनी लक्ष घातले होते. नूतनीकरणानंतर त्याचे मोदी यांनी अलीकडेच उद्घाटन केले. काशी काॅरिडोरच्या विकासामुळे शहराचा कायापालट झाला. तसेच तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला शहरात पाच लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. त्यातून शहरातील व्यापारी वर्गाचा फायदा झाला. आर्थिक उलाढाल वाढल्याने स्थानिकांचा फायदा होतो याकडे भाजप प्रचारात लक्ष वेधत आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर हा दोन विधानसभा मतदारसंघात मोडतो. यामुळेच या दोन्ही जागा भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेच्या आहेत. वाराणसी हा मोदी यांचा मतदारसंघ असला तरी स्थानिक पातळीवर राज्य सरकारच्या विरोधातील नाराजीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो हे भाजपच्या धुरिणांच्या निदर्शनास आले होते. यामुळेच मोदी यांनी गल्लोगल्ली प्रचार केला. मोदी यांचा करिष्मा उपयोगी येईल हे भाजपचे गणित आहे. २०१७ मध्ये मोदी यांनी अशाच पद्धतीने वाराणसीत प्रचार करून वातावरण ढवळून काढले होते व त्याचा भाजपला फायदा झाला आणि आठही जागा जिंकल्या होत्या. त्याचीच यंदाही पुनरावृत्ती होईल, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतो. विश्लेषण : सबकुछ नवीनबाबू! ओडिशात बिजू जनता दलाने सर्व जिल्हा परिषदा कशा जिंकल्या? भाजपपुढे आव्हान आहे का ? भाजप तसेच समाजवादी पार्टीने जातीचे समीकरण साधण्यावर भर दिला आहे. वाराणसीमध्ये भाजप १९९०च्या दशकापासून निवडणुका जिंकत आहे. तसा हा भाजपचा बालेकिल्ला. पण यंदा वाराणसी दक्षिण आणि वाराणसी कॅन्टोन्मेंट या दोन जागांवर तरी भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील पटेल वा कुर्मी समाजाची मते लक्षात घेता अपना दलासाठी एक जागा सोडली आहे. सहा जागा सहज जिंकू पण दोन जागांवर कडवे आव्हान असल्याचे भाजपचे स्थानिक पदाधिकारीही मान्य करतात. समाजवादी पार्टीसाठी हा टप्पा महत्त्वाचा का? आझमगड हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षाचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आझम खान यांचे या भागात वर्चस्व. आझम खान व त्यांचा मुलगा गैरव्यवहार, शासकीय जमीन हडप करणे अशा विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत. भाजपने राजकीय सुडबुद्धीने आझम खान यांना तुरुंगात डांबल्याचा आरोप केला जातो. समाजवादी पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अखिलेश यादव हे गेल्या लोकसभा निवडणुकीत आझमगडमधून चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. यामुळेच या टप्प्यात सपाची मदार मुस्लीमबहुल आझमगडवर आहे. गेल्या निवडणुकीत भाजप लाटेतही या भागातून सपाने यश मिळविले होते.