scorecardresearch

विश्लेषण : ‘ट्विटर’मधील दुसरा भारतीय चेहराही अडचणीत… कोण आहेत विजया गाडे?

इलॉन मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

Vijaya Gadde
गाडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली. (फोटो ट्विटर आणि रॉयटर्सवरुन साभार)

– आसिफ बागवान

इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खिशात घातल्यानंतरही मस्क विरुद्ध ‘ट्विटर’ हा वाद शमलेला नाही. ‘ट्विटर’चे सीईओ पराग अगरवाल यांना लक्ष्य केल्यानंतर मस्क यांनी आपला मोर्चा कंपनीच्या विधि, सार्वजनिक धोरण, विश्वास आणि सुरक्षा विभागाच्या प्रमुख विजया गाडे यांच्याकडे वळवला आहे. गाडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर आपल्या टि्वटर खात्यावरूनच नाराजी व्यक्त करणारे मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

नेमके काय घडले?

या प्रकरणाची सुरुवात टि्वटरने एका माध्यम संस्थेचे खाते निलंबित (सस्पेण्ड) केल्याप्रकरणी मस्क यांनी केलेल्या ट्वीटने झाली. सागर एन्जेटी नावाच्या भारतीय वंशाच्या एका अमेरिकन पॉडकास्ट समालोचकाने ‘पॉलिटिको’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली टि्वटर बाबतची बातमी शेअर केली. त्यांचे ट्वीट शेअर करत मस्क यांनी ट्विटरच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे विजया गाडे यांना लक्ष्य केले.

काय म्हणाले मस्क?

‘एखादी सत्य बातमी दाखवल्याबद्दल मोठ्या वृत्त संस्थेचे ट्विटर खाते निलंबित करण्याची कृती अतिशय चुकीची आहे’ अशा आशयाचे ट्विट मस्क यांनी केले. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख ट्विटरच्या विधि आणि सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी) विभागाकडे आणि पर्यायाने विजया गाडे यांच्याकडे होता, हे स्पष्ट झाले आहे. कारण ज्या ट्वीटवरून गदारोळ झाला ती मूळ बातमी गाडे यांच्याबाबतच होती.

बातमी काय ?

सागर एन्जेटी यांनी शेअर केलेली ‘पाॅलिटिको’मधील बातमी मस्क यांच्या टि्वटरखरेदीच्या शक्यतेनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांत असलेल्या अस्वस्थतेबद्दलची आहे. यासंदर्भात गाडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यात त्यांनी टि्वटरसमोर येत्या काळात उभी राहणारी आव्हाने मांडली. मस्क यांच्याकडे कंपनीचे नेतृत्व गेल्यामुळे कंपनीत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच हे सर्व सांगत असताना त्या भावूक झाल्याचेही ‘पॉलिटिको’च्या वृत्तात म्हटले आहे. मस्क यांच्याबद्दल कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगणाऱ्या या बातमीचाच धागा पकडत मस्क यांनी गाडे यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

विजया गाडे आहेत तरी कोण?

कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात विजया गाडे यांची महत्त्वाची भूमिका होती. ट्विटरच्या विधि, सार्वजनिक धोरण, विश्वास आणि सुरक्षा (legal, public policy and trust and safety lead) विभागाच्या प्रमुख असलेल्या विजया गाडे यांचे ट्विटरमध्ये निर्णायक स्थान आहे. २०११मध्ये ट्विटरमध्ये रुजू झालेल्या विजया यांनी ट्विटरवरील मजकुराबाबतच्या नियमावलीला त्यांनी आकार दिला. हे करत असताना सहाजिकच त्यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या, संस्थांशी संबंधित खात्यांवर बंधने आणली. यामध्ये उजव्या विचारसरणीच्या मंडळींचा समावेश अधिक असल्याने विजया या डाव्या विचारमतांच्या असल्याचा शेराही त्यांच्यावर नेहमीच लावला जातो.

भारतात जन्म

विजया यांचा जन्म १९७८ मध्ये भारतातच हैदराबादमध्ये झाला. मात्र, वयाच्या तिसऱ्या वर्षी त्या अमेरिकेत पालकांसह स्थायिक झाल्या. तेथून त्यांचे संपूर्ण शिक्षण अमेरिकेतच झाले. त्यांनी ‘न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून विधिविषयक व्यावसायिक पदवी मिळवली. त्यानंतर काही वर्षे विविध कंपन्यांतील जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्या ट्विटरमध्ये रूजू झाल्या. तेव्हापासून विजया यांचे ट्विटरमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचं राहिले आहे.

मस्क यांच्याकडून लक्ष्य करण्याचे कारण…

ट्विटर ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यापासून मस्क हे सातत्याने कंपनीचे सीईओ पराग अगरवाल यांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. कंपनीचा सर्वात मोठा समभागधारक बनल्यापासूनच त्यांनी ट्विटरमधील सध्याच्या पदसिद्ध अधिकारी आणि धोरणांवर टीका सुरू केली आहे. विजया यांच्यावरील टीका हादेखील याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. ट्विटरवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या आपल्या मोहिमेत कंपनीच्या सध्याच्या शिलेदारांना बाजूला करून आपल्या धोरणाशी सुसंगत व्यक्तींना आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.

‘बायआऊट’ कराराचे उल्लंघन?

मस्क यांनी केलेल्या टीकेनंतर त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर जाहीर टीका करून मस्क यांनी कंपनी खरेदीसंदर्भातील ‘बायआऊट’ कराराचे उल्लंघन केल्याचे मत अनेक कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या करारामध्ये ‘डिस्पॅरेजमेंट क्लॉज’ असतो. त्यानुसार करारातील प्रतिपक्षावर टीका करणे अथवा नकारात्मक टिप्पणी करणे याला मनाई करण्यात आलेली असते. त्यामुळे अगरवाल आणि गाडे यांच्यावर टीका करून मस्क यांनी या कराराचा भंग केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या कराराचे आता काय होणार आणि मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यास ट्विटरमधील सध्याच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे भवितव्य काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijaya gadde the indian legal head of twitter facing musk wrath print exp scsg

ताज्या बातम्या