scorecardresearch

विश्लेषण : हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे यात फरक काय?

आपत्कालीन स्थितीत काय करायला हवे हे जाणून घेण्यासाठी आधी हे विकार समजून घेणे गरजेचे आहे.

heart attack and cardiac arrest
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही वेगवेगळे असून यामागील कारणे, लक्षणे उपाय यांमध्येही फरक आहे

-शैलजा तिवले

हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) किंवा हृदय बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट) हे दोन्ही विकार सारखेच आहेत, असा गैरसमज अनेकदा असतो. परंतु हे दोन्ही वेगवेगळे असून यामागील कारणे, लक्षणे उपाय यांमध्येही फरक आहे. आपत्कालीन स्थितीत काय करायला हवे हे जाणून घेण्यासाठी आधी हे विकार समजून घेणे गरजेचे आहे.

हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नेमके काय होते?

हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण झाल्याने रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबतो. हृदयाच्या स्नायूंना इजा होते आणि स्नायूमधून विशिष्ट रसायने स्रवतात. यामुळे आपल्याला वेदना होतात. याचा परिणाम शरीराच्या अन्य भागांवरही होतो. जसे रक्तदाब कमी जास्त होणे, नाडीच्या ठोक्यांचा वेग कमी जास्त होतो. हृदयविकार हा रक्ताभिसरणाच्या दोषामुळे उद्भवणारा आजार आहे.

हृदयविकाराचा झटक्याची लक्षणे काय?

हृदयविकाराचा झटक्याची लक्षणे विविध स्वरूपात दिसून येतात उदाहणार्थ साध्या छातीत दुखण्यापासून ते श्वास घेण्यास खूप त्रास होण्यापर्यंत अनेक लक्षणे दिसतात. तातडीने कृत्रिम श्वसनयंत्रणा लावावी लागते तर काही वेळेस रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर अचानक कोसळतात आणि त्यांचा मृत्यूदेखील होतो. तीव्र झटक्यामुळे काही रुग्ण झोपेतही दगावतात. छातीत दुखणे, दम लागणे, खूप घाम येणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

हदय बंद पडते म्हणजे काय?

कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होणे. हृदयाचे ठोके आवश्यकतेप्रमाणे वाढतात आणि कमीदेखील होतात. अचानक, आवश्यकता नसताना हृदयाचे ठोके २००-२५० पेक्षा जास्त व्हायला लागले म्हणजेच हृदय अतिशय वेगाने काम करत असेल तर हृदयाच्या पंपिंगवरही परिणाम होऊन शरीरातील अवयवांना रक्ताचा पुरवठा करण्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि माणूस बेशुद्ध पडतो. हृदयाची कार्यशक्ती अचानकपणे खुंटते. रक्तदाब खूप कमी होतो, याला कार्डियाक अरेस्ट असे म्हटले जाते, असे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी सांगितले.

हृदय बंद का पडते?

कार्डियाक अरेस्ट हा केवळ हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो असे नाही. काही अन्य कारणांमुळे तो होण्याचा संभव असतो. हृदयाच्या झडपा, स्पंदनांशी निगडित आजार, हृदयातील विच्छेदांचा आजार किंवा जन्मत: असलेले हृदयविकार यामुळे हृदयाचे ठोके खूप कमी होणे किंवा खूप जास्त होणे, रक्तदाब खूप कमी किंवा खूप जास्त होणे यामुळे हृदयाचे स्पंदन बंद पडते, अशी माहिती डॉ. सुरासे यांनी दिली.

कार्डियाक अरेस्टची लक्षणे काय आहेत?

कार्डियाक अरेस्ट हा अचानकपणे होत असल्यामुळे त्याची पूर्वकल्पना रुग्णाला येणे किंवा तशी लक्षणे दिसत नाही. माणूस अचानक बेशुद्ध होतो आणि हृदय बंद पडते. शरीर आपल्याला संकेत देत असते. पण हे संकेत वेळीच ओळखले नाहीत की शरीराला मोठा आघात होतो. काही वेळा शरीर तुम्हाला संकेत देणेही बंद करते अशी स्थिती म्हणजे कार्डियाक अरेस्ट, असे डॉ. सुरासे यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कार्डियाक अरेस्ट येतो का?

हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयाचे स्पंदन आणि श्वास सुरू असतो. परंतु काही वेळेस हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयातील विद्युत क्रिया बंद पडते आणि हृदयाची स्पंदने थांबतात, म्हणजेच कार्डियाक अरेस्ट होतो. अशा व्यक्तीची श्वसनक्रियाही बंद पडते. हृदयविकाराचा झटका आलेल्या सर्व रुग्णांमध्ये कार्डियाक अरेस्ट होतोच असे नाही.

हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध करणे शक्य आहे का?

वयाच्या चाळीशीनंतर कोलेस्टोरॉल, क्रिएटिन, मधुमेह, हिमोग्लोबीन, रक्तदाब याची तपासणी नियमित करावी. ईसीजी, टूडी इको या तपासण्याही नियमित कराव्यात. छातीत वेदना होत असेल्यास डॉक्टरांकडून त्वरित तपासणी करून घ्यावी, शास्त्रोक्त अभ्यास केलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम. आवश्यकता नसताना डॉक्टर उपचार सांगतात, असे काही रुग्णांना वाटते. परंतु हे सत्य नाही. हे उपचार आवश्यक असल्यामुळेच सांगितले जातात. प्रत्येकाला बायपास किंवा अॅन्जियोप्लास्टी करायचा सल्ला दिला जात नाही. वेळेत निदान झाल्यास औषधांनीही हृदयविकाराचा झटका येणे टाळता येते, असे डॉ. सुरासे यांनी स्पष्ट केले.

कार्डियाक अरेस्ट प्रतिबंधासाठी काय करता येईल?

जन्मत: हृदयविकार असलेल्या रुग्णांनी काही काळानंतर ईसीजी, टू डी इको आणि कधीकधी अॅन्जियोग्राफी यासारख्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. हृदयातील बिघाडाचे वेळेत निदान करून औषधोपचार केल्यास कार्डियाक अरेस्टला प्रतिबंध करणे शक्य आहे. तसेच हृदयविकार असलेल्या किंवा हृदयविकाराचा झटका आल्यावरही या चाचण्या करणे आवश्यक आहे. कारण हृदयविकाराच्या झटक्यामुळेही कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता असते. अलीकडे अनेक औषधे कार्डियाक अरेस्ट प्रतिबंधासाठी उपलब्ध आहेत.

कार्डियाक अरेस्टनंतर काही रुग्णांमध्ये हृद्याचा वेग अतिशय कमी होतो. वारंवार रुग्ण बेशुद्ध पडतो. अशा रुग्णांमध्ये वेळेत निदान करून हा वेग संतुलित ठेवण्यासाठी पेसमेकर यंत्रही बसविले जाते. जेणेकरून भविष्यात पुन्हा कार्डियाक अरेस्ट होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्यास यामुळे मदत होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is difference between heart attack and cardiac arrest print exp scsg

ताज्या बातम्या