अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील खेड मधील तीन भूखंडांचा येत्या ४ नोव्हेंबर रोजी लिलाव केला जाणार आहे. दाऊद इब्राहिम याचे कोकण कनेक्शन नेमक काय आहे. याचा थोडक्यात आढावा…
झाले काय?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांवर केंद्र सरकारने कारवाई कायम ठेवली आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दाऊदच्या तीन भूखंडांचा लिलाव ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या लिलावात समाविष्ट असलेल्या मालमत्तांमध्ये तीन प्लॉटचा, तर शेतजमिनीचा एक तुकडा आणि दोन इतर भूखंडांचा समावेश आहे.
कुठल्या कायद्या अंतर्गत कारवाई ?
या सर्व मालमत्ता स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट अर्थात तस्करी आणि परकीय चलन अफरातफर अधिनियम (SAFEMA) या केंद्र सरकारच्या कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्तांचा आता टप्प्याटप्प्याने लिलाव केला जात आहे. या पूर्वी मुंबई, गुजरात मधील दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांची लिलावाव्दारे विक्री करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये दाऊद इब्राहिम याच्या, खेड तालुक्यातील मुमके गावातील चार मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. या मालमत्तांवर अनेक इच्छुकांनी बोली लावली होती, मात्र काही जमिनींच्या वादांमुळे अंतिम हस्तांतर प्रक्रियेला उशीर झाला होता. त्यामुळे नव्याने लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लिलाव कसा होणार?
या मालमत्तांच्या लिलावासाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष बोली प्रक्रियेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मालमत्ता संपूर्णपणे कायदेशीररित्या जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी व्यवहाराशी संबंध राहिलेला नाही, असे स्पष्टीकरण केंद्र शासनाने यापूर्वीच केले आहे. त्यामुळे या लिलावांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही स्थानिक गुंतवणूकदार आणि उद्योगपतींनी या जमिनींबद्दल रस दाखवला आहे. दाऊद इब्राहिमविरुद्ध केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये अनेक मालमत्तांची जप्ती आणि लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे.
दाऊदच्या मालमत्ता किती?
दाऊद इब्राहिमच्या आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित अनेक मालमत्ता केंद्र सरकारने जप्त केल्या आहेत. यात मुंबई, गुजरात आणि कोकणातील मालमत्तांचा समावेश आहे. यातील २१ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला असून, कोकणातील चार मालमत्तांचा पुन्हा नव्याने लिलाव केला जाणार आहे. यात तीन विकसित भूखंड तर एका शेतजमिनीचा समावेश आहे. यापूर्वी २००७, २०२० आणि २०२४ मध्ये दाऊद आणि त्यांच्या नातेवाईकांशी निगडित मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होतात ज्यात रेस्टॉरंट, सदनिका, गेस्ट हाऊसचा समावेश होता. रत्नागिरीतील दोन भूखंड आणि बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेचा सव्वा दोन कोटी रुपयांना लिलाव २०२० मध्ये करण्यात आला होता. या जागा दाऊदची बहीण हसिना पारकर यांच्याशी निगडित होत्या.
दाऊद इब्राहिमचा कोकणाशी संबंध कसा?
दाऊद इब्राहिम कासकर याचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावातील मुंमईके गावात कोकणी मुस्लिम कुटुंबात २६ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्याचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. तर आई अमिना बी या गृहिणी होत्या. दाऊद आणि त्याच्या भावंडांचे लहानपण खेड तालुक्यातच गेले. नंतर मात्र ते मुंबईत डोंगरी येथे स्थलांतरित झाले. १९७० च्या आसपास त्याने आणि त्याच्या भावाने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. यानंतर सोने तस्करी, अमली पदार्थ तस्करी, खंडणी, संघटित गुन्हेगारीसारख्या कारवायांना सुरुवात केली.
बॉम्बस्फोट आणि कोकण संबंध कसा?
मुंबईत १९९३ साली दाऊद इब्राहिमने साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले ज्यात अडीचशेहून अधिक लोकांचा हकनाक बळी गेला. या बॉम्बस्फोटांच्या कटाची आखणी कोकणातूनच करण्यात आली. अलिबाग येथे या स्फोटांचा कट रचला गेला. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी येथे स्फोटांसाठी लागणारी स्फोटके उतरवण्यात आली. नंतर ही स्फोटके वाहनामधून मुंबईत नेऊन, स्फोट घडविण्यात आले होते. तस्करीच्या नावाखाली स्फोटके आणली गेली होती. मच्छीमारांना काळे सोने उतरवायचे आहे असे सांगून शेखाडी येथे आरडीएक्स उतरविण्यात आले होते.
