scorecardresearch

Premium

भारत की इंडिया? देशाला नाव कसे मिळाले? संविधान सभेत काय चर्चा झाली होती? जाणून घ्या …

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे नाव काय असावे, या प्रश्नावर तेव्हा संविधान सभेत वादळी चर्चा झाली होती.

CONSTITUENT ASSEMBLY
संविधान सभा

जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठे वादंग माजले आहेत. मोदी सरकारकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीला भाजपा पक्ष घाबरला आहे, असा दावा विरोधक करीत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांकडून तुम्हाला भारत या नावात काय अडचण आहे, असा सवाल विरोधकांना केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन नेत्यांनी आपल्या देशाला इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे कशी दिली? ही नावे देताना संसदेत काय चर्चा झाली? तेव्हा देशासाठी कोणकोणती नावे सुचवण्यात आली होती? हे जाणून घेऊ या …

देशाच्या नावावर झाली होती सखोल चर्चा

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे नाव काय असावे, या प्रश्नावर तेव्हा संविधान सभेत वादळी चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये तेव्हा अनेक नेत्यांनी देशासाठी वेगवेगळी नावे सुचवली होती. भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात ‘इंडिया म्हणजेच भारत, हा राज्यांचा संघ असेल’, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र, या एका ओळीतही स्वल्पविराम (क्वामा) किती असावेत, भारत शब्द अगोदर असावा की इंडिया? अशा अतिशय छोट्या-छोट्या बाबींवरही संविधान सभेत चर्चा करण्यात आली होती.

Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण
arvind_kejriwal
पंजाबमध्ये आप-काँग्रेस यांच्यात संघर्ष, अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले ‘आम्ही इंडिया आघाडीत…’
congress chief mallikarjun kharge vows to amend women bill if congress comes to power
सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा -खरगे
JP nadda rahul gandhi Uddhav thackrey
सनातनबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी -नड्डा; सुनियोजित रणनीती असल्याचा आरोप

१७ सप्टेंबर १९४९ रोजी प्रत्यक्ष चर्चा

संविधानातील अनुच्छेद १ मध्ये देशाच्या नावाबद्दल भाष्य करण्यात आलेले आहे. याच पहिल्या अनुच्छेदावर संविधान सभेत १७ नोव्हेंबर १९४८ रोजी चर्चा होणार होती; मात्र गोविंद वल्लभ पंत यांच्या विनंतीनंतर ही चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर १७ सप्टेंबर १९४९ रोजी या विषयावर प्रत्यक्ष चर्चा झाली. यावेळी चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद १ मधील तरतुदी संविधान सभेसमोर मांडल्या. यावेळी अनुच्छेद १ मध्ये भारत आणि इंडिया अशा दोन्ही नावांचा समावेश होता.

इंडिया नावावर अनेकांनी घेतला होता आक्षेप

देशाचे नाव आणि अनुच्छेद १ मधील तरतूद याबद्दल प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ‘इंडिया’ या नावावर आक्षेप व्यक्त केला होता. या नावामुळे वसाहतवादी भूतकाळाची आठवण होते, असे मत या नावाला विरोध करणाऱ्या नेत्यांनी मांडले होते. जबलपूर येथील शेठ गोविंद दास यांनी इंडियाऐवजी देशाचे नाव भारत असावे, अशी भूमिका मांडली. तर काही नेत्यांनी भारत या नावासाठी इंग्रजी भाषेत इंडिया हे नाव पर्याय आहे, असा उल्लेख असावा, अशी भूमिका मांडली. ‘इंडिया म्हणजेच भारत (इंडिया दॅट इज भारत)’ हे शब्द देशाच्या नावासाठी योग्य नाहीत. त्याऐवजी ‘भारत देशाला परदेशात इंडिया म्हटले जाते’, असा उल्लेख करावा, अशी भूमिका शेठ गोविंद दास यांनी घेतली होती.

कामथ यांनी दिला आयर्लंड देशाचा संदर्भ

हरी विष्णू कामथ यांनीदेखील इंडिया या नावाला विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी आयर्लंडच्या संविधानाचा दाखला दिला होता. इंडिया हा शब्द भारत या शब्दाचे फक्त इंग्रजी भाषांतर आहे, असे ते म्हणाले होते. “आयर्लंडने १९३७ साली संविधानाचा स्वीकार केलेला आहे. या संविधानाचा अभ्यास केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. सभागृहातील सदस्यांनी या संविधानाचा संदर्भ घेण्याची तसदी घ्यावी. आधुनिक जगात आयर्लंड हा असा देश आहे की, ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वत:चे नाव बदलले आहे. या संविधानाच्या चौथ्या अनुच्छेदात या बदलाचा संदर्भ आहे. ‘या राज्याचे नाव आयर (Eire) आहे किंवा इंग्रजी भाषेत हे नाव आयर्लंड असे आहे,’ असे आयर्लंडच्या संविधानात नमूद आहे,” असे तेव्हा कामथ म्हणाले होते.

“देशाचे नाव ‘भारतवर्ष’ असावे”

हरगोविंद पंत यांनी तर देशाला थेट भारतवर्ष नाव द्यावे, अशी मागणी केली होती. “काही सदस्यांना या नावाबद्दल एवढी आत्मीयता का आहे? हे मला समजत नाही. उत्तर भारतातील लोकांना देशाचे नाव ‘भारतवर्ष’ आसावे, असे वाटते,” असे पंत म्हणाले होते. “इंडिया हे नाव आपल्याला परदेशी लोकांनी दिले आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. या परदेशी लोकांनी भारताच्या श्रीमंतीविषयी ऐकले. ते आपल्या मोहात पडले. पुढे त्यांनी आपल्याला लुटले. आपली संपत्ती लुटण्यासाठी आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले. असे असूनदेखील आपण ‘इंडिया’ या शब्दावर कायम असू, तर परकीयांनी लादलेल्या या शब्दाचे आपल्याला काहीही वाटत नाही, हेच स्पष्ट होईल,” असेही तेव्हा पंत म्हणाले होते.

संविधान सभेत दिले गेले प्राचीन संदर्भ

देशाचे नाव भारत असावे की इंडिया या चर्चेदरम्यान वेगवेगळे दावे करण्यात आले, वेगवेगळे संदर्भ देण्यात आले. संविधान सभेतील काही सदस्यांनी प्राचीन भारताचे काही संदर्भ दिले होते. शेठ गोविंद दास यांनी देशाचे नाव भारत असावे, असे सांगत विष्णूपुराण आणि ब्रह्मपुरणाचा संदर्भ दिला होता. तर अन्य एका सदस्याने सातव्या शतकातील ह्युएन त्सांग या चिनी प्रवाशाचा संदर्भ दिला होता. त्सांग या प्रवाशाने आपल्या देशाचा उल्लेख भारत असा केलेला आहे, असे या सदस्याने संविधान सभेत सांगितले होते.

“संस्कृतीला साजेसे नाव द्यायला हवे”

“आपण आपल्या देशाचे नाव भारत ठेवल्यास काहीही बदल होणार नाही. आपल्याला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपण आपल्या देशाचा इतिहास, संस्कृतीला साजेसे नाव द्यायला हवे,” असे दास म्हणाले होते. दास यांनी यावेळी संविधान सभेत एक पत्रक दाखवले होते. या पत्रकाचा आधार घेत इंडिया हे नाव भारतापेक्षा प्राचीन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इंडिया हे नाव भारत या नावापेक्षा प्राचीन नाही, असे ते म्हणाले होते. त्यांनी वेगवेगळ्या धर्मग्रंथांत असलेली भारत, भारतवर्ष, भारतभूमी अशी वेगवेगळी नावे सुचवली होती.

“भारत या नावाच्या उगमाबद्दल सर्वांचे एकमत नाही”

“आपल्या देशाचे नाव काय होते, याचा शोध घेण्यासाठी इतिहासतज्ज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांनी खूप अभ्यास केलेला आहे. विशेष म्हणजे भारत या नावाच्या उगमाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न झाला; मात्र भारत या नावाच्या उगमाबद्दल सर्वांचे एकमत नाही. अनेक जण भारत हे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचे नाव आहे, असे म्हणतात. या दोघांच्या पुत्राला सर्वदामना, असेही म्हटले जाते. याच पुत्राच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत पडले असावे,” असा दावा तेव्हा दास यांनी केला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका मांडली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मात्र काहीशी वेगळी होती. भारत या नावाला सदस्यांचा विरोध नसल्यामुळे सभ्यताविषयक वादविवाद अनावश्यक असल्याची आठवण डॉ. आंबेडकर यांनी सभागृहाला अनेकदा करून दिली होती. तसेच कामथ यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना “आता आपण फक्त इंडिया या शब्दानंतर भारत हा शब्द यावा का? यावर चर्चा करीत आहोत,” असेही आंबेडकर म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who india and bharat name given to nation discussion of constituent assembly prd

First published on: 06-09-2023 at 14:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×