Jane Goodaal chimpanzees चिंपांझी आणि माणसाच्या आचार- विचार- कृतींतील साम्यभेदावर डॉ. जेन गुडल यांनी केलेले संशोधन जगभर गाजले. लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल असलेले आकर्षणच नंतर त्यांना त्यांच्या करिअरच्या दिशेने घेऊन गेले. १९६० साली कोणतीही औपचारिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्या टांझानियातील Gombe Stream राष्ट्रीय उद्यानात गेल्या आणि तिथे चिंपांझींचे जंगलातील प्रत्यक्ष निरीक्षण सुरू केले. एरवी प्राण्यांना ओळखण्यासाठी संख्यांचा वापर केला जातो. पण त्यांनी मात्र प्रयोगातील प्रत्येक चिंपांझीला स्वतंत्रपणे नाव दिले. जगभरातील प्राणी संशोधनाला एक वेगळा आयाम देणाऱ्या आणि प्राणी संशोधनाची दिशा बदलणाऱ्या डॉ. जेन गुडल यांचे काल निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरावे.

जेन गुडल इन्स्टिट्यूटने बुधवारी (१ ऑक्टोबर) त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केल्यानंतर जगभरातील संशोधक आणि पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. ९१ वर्षीय जेन गुडल अमेरिकेतील व्याख्यान मालिकेसाठी कॅलिफोर्नियात पोहोचल्या होत्या.

कोण होत्या डॉ. जेन गुडल?

डॉ. जेन गुडल यांनी चिंपांझींवरील संशोधनादरम्यान अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली, त्यामुळेच हे सिद्ध झाले की, चिंपांझींमध्येही सामाजिक संबंध, भावनात्मक क्षमतेचे संकेत, आनंद आणि दु:ख यांसारख्या मानवी भावभावना असतात. त्यामुळे चिंपांझी हा मानवाच्या सर्वाधिक जवळचा प्राणी हेही सिद्ध झाले. या संशोधनामुळे निसर्गेतिहासाला आणि प्राणी अभ्यासाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

Jane Goodall
बार्बी डॉलसह डॉ. जेन गुडल

प्राण्यांना असते व्यक्तिमत्व, तर्कशक्ती आणि भावनाही

“माणसाशिवाय इतर प्राण्यांमध्येदेखील व्यक्तिमत्व, तर्कशक्ती आणि भावना सक्षमपणे कार्यरत असतात.” या त्यांच्या विधानामुळे प्राणीशास्त्रातील अनेक तत्कालीन पूर्वग्रहांना थेट आव्हान मिळाले आणि नंतर संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक पूर्वग्रह खोडूनही काढले.

AI in Operation Sindoor युद्धभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कसा केला AI चा वापर ?

प्राणीशास्त्राचे धडे बदलले

१९६२ मध्ये, कोणतीही पदवी नसताना, केंब्रीज विद्यापीठाने त्यांना प्राणिशास्त्रातील (Ethology) पीएचडी अभ्यासासाठी प्रवेश दिला. १९६६ साली त्यांनी Behaviour of free‑living chimpanzees हा त्यांचा शोधप्रबंध सादर केला. Gombe मधील प्रयोगांदरम्यानच्या त्यांच्या सर्व नोंदीचा समावेश या प्रबंधामध्ये होता. या संशोधनाने प्राणीशास्त्राचे धडे आणि मानव–प्राणी संबंध याबाबतचे अनेक दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

Dr. Jane Goodall
Dr. Jane Goodall (Photot- AP)

जेन गुडल इन्स्टिट्यूट आणि सामाजिक कार्य

१९७७ साली, जेन गुडल यांनी जेन गुडल इन्स्टिट्यूटची (JGI) स्थापन केली. ही जागतिक स्तरावरील वन्यजीव व पर्यावरणरक्षण संस्था आहे. JGI चे ध्येय चिंपांझी व इतर प्राण्यांचे संरक्षण, जीवनशिक्षण आणि संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देणे हा आहे. अभयारण्ये तयार करणे, त्यासाठीची कायदेशीर संरक्षण धोरणे निश्चित करणे आणि शालेय व सार्वजनिक शिक्षणाद्वारे या विषयासंबंधीची जागरूकता वाढवणे अशा अनेक उपक्रमांमध्ये ही संस्था सक्रिय आहे.

विश्लेषण : भारतीयांच्या वांशिक शुद्धतेच्या चाचणीवरून वाद कशासाठी? 

शांतीदूत आणि संयुक्त राष्ट्रांचा सन्मानही

संयुक्त राष्ट्र संघटनेने गुडल यांची शांतीदूत म्हणून नियुक्ती केली होती आणि शिवाय त्यांना वर्ल्ड फ्यूचर काऊन्सिलचे मानद सदस्य म्हणून देखील सन्मानित केले होते.

गुडल यांच्या नावे बार्बी डॉल

लहान मुलांमध्ये खास करून मुलांमध्ये बार्बी डॉल विशेष प्रिय असते. २०२२ साली, गुडल यांच्यावर प्रेरित एक बार्बी डॉल जगभरात सादर झाली. ही विशेष आवृत्ती “Inspiring Women” मालिकेतील होती आणि वर्ल्ड चिंपांझी डे च्या निमित्ताने ती सादर करण्यात आली. या बार्बी डॉलची निर्मिती सुमारे ७५ टक्के समुद्रातील प्लास्टिकचा पुनर्वापर करून या बार्बी डॉलची निर्मिती करण्यात आली होती, हे विशेष. अर्थात हे देखील गुडल यांच्या पर्यावरणरक्षणाच्या ध्येयाशी सुसंगतच होते.

ही बार्बी डॉल जंगलभ्रमंती दरम्यानची गुडल यांची वेशभूषा, हाती binoculars आणि नोंदवही या रूपातच साकारण्यात आली होती. त्या मॉडेलसोबत डेव्हिड ग्रेबीयर्ड नावाचा गुडल यांचा लाडका चिंपांझीही होता. महत्त्वाचे म्हणझे गुडल यांनी Gombe Stream मध्ये १९६० साली सर्वप्रथम याच चिंपांझीशी संवाद साधला होता.

विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?

मुलींनाही प्राणी अभ्यासायचे असतात!

गुडल यांनी बार्बी डॉलचे स्वागत करताना म्हटले होते की, “मुलींना फक्त चित्रपट नायिकाच व्हायचे नसते; तर अनेक मुलींप्रमाणे माझ्याप्रमाणेच निसर्गात जाऊन प्राणी अभ्यासायचे असतात. त्यामुळे जेन गुडलची बार्बी डॉल हे उत्तम कल्पनाच आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “एकदा का आपण निसर्गात प्रवेश केला की, भारावून जातो आणि मग तिथूनच त्याचे रक्षण करण्याची प्रेरणाही आपल्याला मिळते.”

डॉ. गुडल यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • डॉ. जेन गुडल यांना त्यांच्या कार्यासाठी जगभरातील असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • १) Order of the British Empire (DBE)
  • २) Kyoto Prize for Basic Sciences
  • ३) UNESCO Gold Medal
  • ४) Templeton Prize (2021) – विज्ञान आणि अध्यात्म यांतील दुवा अधोरेखित करणाऱ्या कार्यासाठी
  • ५) तसेच, जगभरातील ४० हून अधिक विद्यापीठांकडून सन्मान्य डॉक्टरेट पदवी प्राप्त
  • ६) निसर्गाच्या सेवा करणाऱ्या युनेस्कोच्या ‘शांतीदूत’

डॉ. गुडल यांचे आयुष्य म्हणजे एका संयमी, जिज्ञासू आणि सजग संशोधकाचे प्रेरणादायी उदाहरणच होय. विज्ञानाच्या माध्यमातून प्राणी आणि मानव यांच्यातील नाते समजून घेण्याची आणि त्यातून निसर्ग संवर्धनाची प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले, त्यांना भावपूर्ण आदरांजली!त्यांच्या जाण्याने संपूर्ण पर्यावरण चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे, मात्र त्यांचे विचार, कार्य आणि वारसा अजून अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील!