अंहिसा हे जैन धर्माचे महत्त्वाचे तत्व. वैयक्तिक मागण्या असो किंवा समाजाचे प्रश्न असो, आजवर कधीही जैन धर्मीय समाज आक्रमक झाला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध शहरांमध्ये जैन समाजाची अस्वस्थता बाहेर पडत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (रविवारी) दिल्ली आणि मुंबईच्या रस्त्यांवर जैन समाज उतरला. दिल्लीमध्ये तर समाजाच्या लोकांकडून आमरण उपोषणाची घोषणा देण्यात आली आहे. झारखंडमधील जैन समाजाचे पवित्र मंदिर श्री सम्मेद शिखर आणि गुजरातमधील पलीताना मंदिराशी संबंधित विषयामुळे देशभरातील जैन समाजामध्ये असंतोष पसरला असून जैन समाजाच्या आंदोलनामागे ही दोन कारणे आहेत. शांतताप्रिय जैन समाजाला रस्त्यावर उतरण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे दोन नेमके काय आहेत, हे पाहुया.

झारखंडमध्ये उंच शिखरावर असलेले श्री सम्मेद शिखर जैनांसाठी पवित्र मानले जाते. या मंदिराला झारखंड सरकार पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणार असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर जैन समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. झारखंड सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी जैन समुदायाची मागणी आहे. हे विषय चर्चेत असतानाच तिकडे गुजरातमधील पालीताना मंदिरात तोडफोड झाल्यामुळे जैन समाजाच्या नाराजीत आणखीनच भर पडली. यानंतर जैन समाजाकडून विविध शहरांमध्ये आंदोलने होत आहेत.

श्री सम्मेद शिखरजी वाद काय आहे?

झारखंड मधील गिरीडीह जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतावर असलेल्या श्री सम्मेद शिखरजी क्षेत्राला इको-सेंसिटिव्ह झोन घोषित केला जावा, अशी शिफारस राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये केली. केंद्र सरकारने २०१९ मध्ये या क्षेत्राला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर केले. त्यानंतर आता झारखंड सरकारकडून हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पर्यटन स्थळाची घोषणा झाल्यानंतर याठिकाणी एका मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली. जैन समाजाचे म्हणणे आहे की, पर्यटन स्थळ जाहीर झाल्यामुळे येथील पावित्र्य भंग होईल. ज्यांना जैन धर्माची आस्था नाही, ते लोक देखील याठिकाणी येतील आणि मंदिराचे पर्यटन स्थळ होऊन जाईल. मंदिराच्या ठिकाणी मांस-मद्य प्राशन केले जाईल, अशी भीती जैन समुदायामध्ये आहे.

पलीताना मंदिराचा विवाद काय आहे?

श्री सम्मेद शिखर मंदिराचा वाद सुरु असतानाच जैन समाजासाठी आणखी एक पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पलीताना मंदिरात एक धक्कादायक गोष्ट घडली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला. पलीताना च्या गिरीराज पर्वतावर जैन देरासर मंदिर आणि नीलकंठ महादेव मंदिर आहे. या परिसरात झालेली तोडफोड आणि सुरु असलेले उत्खनन तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. पलीताना येथे चाललेल्या उत्खनना विरोधात जैन धर्मीयांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच याठिकाणी सुरु असलेली अवैध मद्यविक्री बंद व्हावी, ही देखील मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत जैन समाजाचा विशाल मोर्चा

धार्मिकस्थळांना धक्का पोहोचत असल्याचा आरोप करत दिल्ली, मुंबईत जैन समाज रस्त्यावर उतरत आहे. मुंबईत जैन धर्मीयांनी एकत्र येत हजारो लोकांची विशाल रॅली काढली. मुंबईच्या रस्त्यांवर पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करुन आलेल्या जैन धर्मीयांमुळे रस्त्यावर पांढरा रंगाची चादर पसरल्यासारखा भास होत होता. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येऊनही शांततेच्या मार्गाचा अवलंब लोकांनी केला. डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी छोट्या छोट्या स्वरुपात रस्त्यावर एकत्र येऊन जैन समाजाने निषेध व्यक्त केलेला आहे.