जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूवैज्ञानिकांमार्फत कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात दरडप्रवण गावांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. काय आहेत या मागची कारणे आणि काय होऊ शकतात याचे परिणाम याचा थोडक्यात आढावा…
भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणात काय आढळले?
तळीये आणि इरशाळवाडी येथील दरड दुर्घटना आणि त्यात झालेली जीवितहानी आणि वित्तहानी लक्षात घेऊन दरडप्रवण गावांचा नव्याने शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेच्या भूवैज्ञानिकांवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वाड्या वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. संस्थेच्या भूवैज्ञानिकांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील गावांचे सर्वेक्षण केले. यात दरडप्रवण गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले. दरडप्रवण गावांचे अतिधोकादायक ते कमी धोकादायक अशा पाच वर्गात वर्गीकरण करण्यात आले.
दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ किती?

रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडप्रवण गावांची संख्या दुपटीने वाढल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. तर रत्नागिरीतील दरडप्रवण गावांची संख्याही वाढली असल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी १८३ दरडप्रवण गावे होती आता ती ३९२ वर पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० दरडप्रवण गावे होती. ही संख्या आता ६३ वर पोहोचली आहे. रत्नागिरीमधील दरडप्रवण गावांची संख्या वाढून १८१ वर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक १४० गावांना दरडींचा धोका असल्याचा निष्कर्ष ज्यातील ७१ गावे ही अतिधोकादायक श्रेणीतील आहेत. अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरड कोसळण्यामागची नैसर्गिक कारणे कोणती?

दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात. नैसर्गिक कारणात येथील भौगोलिक स्थिती आणि अतिवृष्टी यांचा समावेश होतो. कोकणातील बराचसा भूभाग हा पर्वतीय प्रदेशात मोडतो. या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना ही दरडी कोसळण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रदेश भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे दरडींचा धोका संभवतो.

मानवनिर्मित कारणे कोणती?

कोकणातील बहुतेक गावे ही एक तर नदीकिनारी अथवा डोंगराच्या कुशीत वसलेली असतात. या गावांचा, वाड्यांचा विस्तार ज्यावेळी होतो, त्यावेळी काही प्रमाणात उत्खनन केले जाते. अथवा सपाटीकरण केले जाते. हे घटक कालांतराने दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय डोंगरावर चर खणणे, वणवे लावणे हे घटकही सहाय्यभूत ठरतात. कोकणात दगडखाणी आणि बॉक्साईट खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणींमधून दगड काढण्यासाठी सुरुंग लावले जातात. त्यामुळे ही दरडींचा धोका संभवतो. कोकणातील रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग हे डोंगरमाथ्यावरून जातात. यासाठी डोंगर पोखरले जातात. कालांतराने या परिसरातील सैल झालेले दगड, माती दरडीच्या स्वरूपात कोसळत राहतात.

घातक परिणाम कसे?

ज्यावेळी कमी वेळात ३०० मिलीमीटर अथवा त्याहून अधिक पाऊस पडतो त्यावेळी दरडी कोसळतात. या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी होते. जुलै २००५ मध्ये महाड तालुक्यातील जुई, दासगाव, कोंडीवते, रोहण पोलादपूर मधील कोतवाल खूर्द येथे दरडी कोसळल्या, ज्यात २१० जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये तळीये गावावर मोठी दरड कोसळली यात ८४ जणांचा मृत्यू झाला. चाळीस घरे दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. जुलै २०२३ मध्ये खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर दरड कोसळली, या दुर्घटनेतही ८४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दरड दुर्घटना जीवघेण्या ठरतात. कोकणातील या घटनांप्रमाणेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळली होती. ज्यात १५१ जणांचा मृत्यू झाला होता.

उपाययोजना कोणत्या?

दरडी कोसळण्याच्या घटना थांबवणे अशक्य आहे. मानवी हस्तक्षेपांचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो रोखता येऊ शकतो.  दरडी कोसळण्याच्या घटना घडतच राहणार. मात्र त्यापासून होणारे नुकसान कमी करता येऊ शकते.  दरडींचा धोका असलेल्या गावांलगतच्या खाणकामे तातडीने बंद करणे, दरडींचा धोका कमी करण्यासाठी वस्तीलगतच्या परिसरात संरक्षक भिंतींची उभारणी करणे, या परिसरातील वृक्षतोडीवर निर्बंध घालणे, नवीन वृक्षारोपण करणे यासारख्या उपाययोजना करता येऊ शकतात. अतिधोकादायक गावांमधील लोकांचे पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतरण केल्यास जीवितहानी रोखता येऊ शकते. याशिवाय डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसावर लक्ष ठेवले आणि परिस्थितीचे नियमित अवलोकन केले तर दरडींच्या धोक्याची पूर्व कल्पना येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

harshad.kashalkar@expressindia.com