When and How Did HIV AIDS Started: कधीही बरा न होणारा, अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरलेला आजार म्हटला की समोर येणाऱ्या नावांच्या यादीत HIV एड्सचं नाव सुद्धा असतंच. UNAIDS तर्फे सादर केलेल्या HIV बाधितांच्या सर्वात नवीन आकडेवारीनुसार, जगभरात एचआयव्ही ग्रस्त रुग्णांची संख्या (२०२२) पर्यंत ३९ दशलक्ष इतकी होती. यापैकी ३७.५ दशलक्ष रुग्ण हे प्रौढ वयोगटातील तर १.५ दशलक्ष रुग्ण हे वयवर्षे १५ च्या खालील पुरुष होते. याव्यतिरिक्त ५३% महिला आणि मुली सुद्धा या आजाराने ग्रस्त असल्याचे आकडेवारीत सांगण्यात आले आहे.
कोणत्याही अन्य आजाराप्रमाणेच प्रतिकारशक्ती कमी करून शरीर क्षीण करणारी अशी ही स्थिती असली तरी त्याला जोडून येणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनामुळे याबाबत अनेकदा मौन बाळगले जाते, परिणामी या आजाराविषयी गैरसमजुती वाढण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. ही स्थिती लक्षात घेता दरवर्षी जगभरात १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस पाळला जातो. यानिमित्त सामान्य नागरिकांना एड्सचा प्रसार, लक्षणे व उपचार याविषयी माहिती दिली जाते.
HIV ची सुरुवात कशी व कधी झाली?
एचआयव्ही हा एक प्रकारचा लेन्टीव्हायरस आहे, याचा अर्थ तो रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. एसआयव्हीचा विषाणू माकड आणि वानर यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अगदी सारख्याच प्रकारे हल्ला करतो. हे लक्षण सूचित करते की, एचआयव्ही आणि एसआयव्हीचा जवळचा संबंध आहे. एचआयव्हीच्या काही प्राचीन ज्ञात नमुन्यांचा अभ्यास हा आजार मानवांमध्ये पहिल्यांदा केव्हा दिसला आणि तो कसा विकसित झाला याबद्दल माहिती देतो. एचआयव्हीच्या पहिल्या रुग्णाविषयी अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे दाखले दिले आहेत.
उदाहरणार्थ, ‘द गार्डियन’वर प्रकाशित लेखात अमेरिकेतील क्विनिपियाक विद्यापीठातील प्रा. विल्यम डनलॅप सांगतात, १९८० च्या दशकात HIV साथीच्या रोगाप्रमाणे पसरण्यास मुख्य कारण ठरलेली व्यक्ती म्हणजे एका कॅनेडियन विमानसेवेचा कर्मचारी गेटन ड्युगास. या इसमाने जाणून बुजून २५० हुन अधिक पुरुषांमध्ये हे संक्रमण पसरवल्याचा दावा केला जातो, मात्र याबाबतचे ठोस दावे आढळत नाहीत.
पोलिओचा उपचार व एड्स
ज्येष्ठ पत्रकार व HIV एड्स विषयाचे अभ्यासक शेखर देशमुख यांच्या ‘पॉझिटिव्हज माणसं’ या पुस्तकातील माहितीनुसार, १९५० च्या दशकात आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये एकाच प्लास्टिक सिरिंजचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला होता यामुळेच एचआयव्हीचा प्रसार झाल्याचे सांगितले जाते. यावेळी बेल्जीयन कांगो, रवांडा, उरूंडी या देशातील लोकांवर चाट नावाच्या पोलिओ लसीचा प्रयोग करण्यात आला होता. ही लस तयार करण्यासाठी त्यावेळी एसआयव्ही असलेल्या स्थानिक चिंपांझी माकडाच्या किडनीच्या जिवंत पेशींचा वापर करण्यात आला होता. यामुळे ‘झुनोसिस’चा परिणाम होऊन एचआयव्ही मानवी शरीरात शिरल्याचे म्हटले जाते.
वसाहतवाद व एड्स
एड्स रिसोर्स अँड ह्युमन रेट्रोव्हायरसेस या जर्नलमध्ये प्रकाशित ‘कलोनिअलिझम थेअरी’नुसार जीम मूर नावाच्या एका अमेरिकन तज्ज्ञाने एचआयव्ही मानवी शरीरात पोहोचण्याबाबत आणखी एक संभाव्यता मांडली होती. त्यानुसार, २० व्या शतकाच्या प्रारंभी, गोऱ्या फ्रेंच वसाहतवाद्यांनी मजूर म्हणून आणलेल्या निग्रोंना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ठेवण्यात आलं होतं पुरेसं अन्न दिलं जात नव्हतं जे काही दिलं गेलं ते चिंपांझीच्या मांसाच्या रूपातच दिलं जात होतं. प्रतिकार शक्तीवर क्षीण येत असताना त्यांना अक्षरशः ढोरमेहनत करायला लागत होती. अशात आजारी पडल्यास एकाच सिरिंजने सर्वांना लस दिली जात होती. हेच कारण एचआयव्हीचा प्रसार होण्यासाठी पुरेसे होते.
HIV चा पहिला रुग्ण
उपलब्ध कागदपत्रांनुसार, १९५९ ला काँगो लोकशाही प्रजासत्ताकमधील किन्शासा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या रक्तातील प्लाज्मामध्ये हा विषाणू आढळून आला. हे विषाणू मानव व चिंपांझी यांच्यातील अनैसर्गिक लैंगिक संबंधामुळे पसरले असावेत, असाही प्राथमिक अंदाज आहे. तर पुढे सिमियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एसआयव्ही) वाहणारे चिंपांजीचे मांस खाल्ल्यानंतर एचआयव्ही झाला असावा असेही मत काही तज्ज्ञांनी नोंदवले होते.
१९५९ मध्ये जरी पहिले प्रकरण आढळले असले तरी हा आढळलेला प्रकार नेमका काय आहे व त्याचे कारण काय हे समजेपर्यंत अनेक वर्षे गेली. परिणामी जेव्हा पहिल्यांदा एचआयव्हीची जाणीव झाली तेव्हापासूनच एचआयव्हीला नवीन विकार म्हणून अधिकृतपणे ओळख मिळाली. म्हणूनच काही अहवालांमध्ये अमेरिकेत १९८० साली एड्सची सुरुवात झाली असेही दाखले आढळून येतात.
समलैंगिक संबध व एड्स
१९८१ मध्ये, न्यू यॉर्क आणि कॅलिफोर्नियामधील समलिंगी पुरुषांमध्ये कपोसी सारकोमा (एक दुर्मिळ कर्करोग) आणि PCP नावाचा फुफ्फुसाचा संसर्ग यासारखे दुर्मिळ आजार नोंदवले जात होते. याबाबत अनेक शास्त्रज्ञ व अभ्यासकांना संशय वाटत होता. सुरुवातीला हे आजार केवळ ,समलैंगिक व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकतात असाही समज होता. पण १९८२ च्या मध्यापर्यंत शास्त्रज्ञांना हे समजले की, या विषाणूचा प्रसार अन्य लोकांमध्ये देखील होत आहे, यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी HIV पासून होणाऱ्या आजाराला ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) असे नाव दिले.
१९८३ मध्ये, फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी एड्सशी संबंधित विषाणू ओळखले, ज्याला त्यांनी लिम्फॅडेनोपॅथी-असोसिएटेड व्हायरस (LAV) म्हटले. यूएसए नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी हा विषाणू एड्सचे कारण असल्याची पुष्टी केली आणि त्याला HTLV-III म्हटले. LAV आणि HTLV-III नंतर सारखेच असल्याचे मान्य करण्यात आले. काही वर्षांनंतर, विषाणूचे नाव बदलून एचआयव्ही असे ठेवण्यात आले.
भारतात HIV कधी आला?
शेखर देशमुख यांच्या ‘पॉझिटिव्हज माणसं’ या पुस्तकात नमूद केलेल्या नोंदींनुसार, १९८६ साली चेन्नईमध्ये एका छाप्यात ताब्यात घेतलेल्या शरीरविक्री करणाऱ्या एका मालिकेच्या रक्तात एचआयव्ही आढळून आला होता. रक्त चाचणी दरम्यान हा विषाणू आढळून आल्यावर डॉ. सुनीती सॉलोमन यांनी या महिलेच्या रक्ताच्या नमुने त्यावेळी अमेरिकेत परीक्षणासाठी पाठवले होते. याच वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नॅशनल एड्स काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती.