अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील युद्ध (१८४६ ते १८४८), अमेरिकी गृहयुद्ध (१८६१ ते १८६५) आणि त्याच दरम्यान अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये असलेली अनागोंदी (अमेरिकन वाइल्ड वेस्ट) हे तिन्ही संघर्ष सॅम्युएल कोल्ट यांच्या पथ्यावरच पडले होते. हा काळ कोल्ट यांच्या विविध उत्पादनांनी गाजवला. मेक्सिकोबरोबरील युद्धात अमेरिकेचे पारडे वरचढ ठरण्यात कोल्ट यांच्या वॉकर आणि त्यानंतरच्या ड्रगून या रिव्हॉल्व्हरनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ड्रगून रिव्हॉल्व्हरचे नाव अमेरिकी सैन्यातील ड्रगून रेजिमेंट्सच्या (Dragoon) नावावरून घेतले होते. पूर्वीच्या वॉकर मॉडेलमधील त्रुटी ड्रगूनमध्ये सुधारण्यात आल्या होत्या. ते अधिक शक्तिशाली होते. १८४८ ते १८६० या काळात म्हणजे अमेरिका-मेक्सिको युद्ध आणि अमेरिकी गृहयुद्ध या काळात त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर झाला. मेक्सिकोबरोबरील युद्धात अमेरिकेने आता त्यांच्याकडे असलेली दक्षिणेकडील टेक्सास आदी राज्ये जिंकून घेतली. मेक्सिकोने त्यांच्या एकूण प्रदेशापैकी एकतृतीयांश प्रदेश गमावला. यातील बराचसा प्रताप कोल्ट रिव्हॉल्व्हर्सचा होता. त्याच काळात ‘कोल्ट १८५१ नेव्ही’ हे रिव्हॉल्व्हरही चांगलेच गाजले.

कोल्ट जसे एक उत्तम संशोधक होते तसेच त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी वापरलेली तंत्रेही त्या काळात नवी होती. कोल्ट यांनी १८३६ आणि १८३६ साली त्यांच्या रिव्हॉल्व्हरचे  इंग्लंड, फ्रान्स, प्रशिया आणि अमेरिकेत पेटंट नोंदवले होते. तसेच ग्राहकांच्या प्रतिसादाचा विचार करून उत्पादनांमध्ये सतत बदल करणे व त्यांचा दर्जा उंचावणे हेही ते कायम करीत असत. त्यांनी कामगार कल्याणालाही खूप महत्त्व दिले होते. कोल्ट यांनी प्रभावशाली वक्तींना खास नक्षीकाम केलेल्या बंदुका भेट दिल्या. आजच्या पब्लिक रिलेशन्सचे ते प्राथमिक रूप होते. आपल्या हयातीत सॅम्युएल कोल्ट अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात होते. मात्र त्यांचा मृत्यू काहीसा लवकर म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी (१८६२) झाला. त्या वेळी त्यांनी १५ दशलक्ष डॉलरचे (आजच्या हिशेबाने सुमारे ३५० दशलक्ष डॉलर) उद्योग साम्राज्य आपल्या मागे सोडले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी एलिझाबेथ कोल्ट यांनी हे साम्राज्य केवळ सांभाळलेच नाही तर वाढवले. कोल्ट यांचा कारखाना एकदा आगीत भस्मसात झाला. एलिझाबेथ यांनी तो पुन्हा उभा केला. कोल्ट यांनी त्यांच्या हयातीत ज्यावर काम केले होते, त्या सिंगल अ‍ॅक्शन आर्मी या मॉडेलचे उत्पादन एलिझाबेथ यांनी केले. हे रिव्हॉल्व्हर कोल्ट कंपनीच्या सर्वोत्तम उत्पादनांपैकी एक होते. ते रिव्हॉल्व्हर ‘पीसमेकर’ या नावाने अधिक गाजले. ‘द गन दॅट वन द वेस्ट’ म्हणून त्याची ख्याती आहे. काऊ बॉइज आणि टेक्सासच्या अनेक हॉलीवूड चित्रपटांतून ते आपल्या परिचयाचे झाले आहे. ‘अमेरिकन वाइल्ड वेस्ट’च्या काळात कोल्ट पीसमेकरबद्दल एक म्हण प्रचारात होती. ‘ही वॉज ट्राइड, सेन्टेन्स्ड, अ‍ॅण्ड द सेन्टेन्स वॉज कॅरिड आऊट बाय जज कोल्ट अ‍ॅण्ड हिज ज्युरी ऑफ सिक्स.’

सचिन दिवाण: sachin.diwan@expressindia.com