भक्तिगीतांऐवजी उडत्या चालीच्या गाण्यांना अधिक मागणी; सजावटीचाही नुसताच चकचकाट

तेव्हा आणि आता

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात लावण्यासाठीची भक्तिगीते, गणपतीची गाणी अशा गाण्यांची जागा आता शांताबाई आणि बाबुरावने घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातून काही वर्षांपूर्वी ऐकू येणाऱ्या सुश्राव्य आवाजाची जागा दणदणाटाने घेतली आहे. त्याचप्रमाणे पानाफुलांच्या साध्याशा पण पर्यावरणपूरक सजावटीची जागा आता झगमगाटी आणि पर्यावरणाला धोकादायक मानण्यात येणाऱ्या सजावटीने घेतली आहे. एकीकडे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी लोकप्रबोधनाच्या मोहिमा राबवण्यात येत असताना सार्वजनिक मंडळे मात्र सर्रास थर्माकोल, गुलाल, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करत असताना दिसत आहेत.

गणेशोत्सवाची सजावट हे कायमच उत्सवातील प्रमुख अंग राहिले. आपल्या मंडळाच्या गणपतीचे मखर चांगले दिसावे या प्रयत्नात मंडळे पूर्वीपासूनच असतात. मात्र मखरांच्या पलिकडे जाऊन वेगवेगळे पौराणिक, सामाजिक विषय सजावटीमध्ये मंडळांकडून हाताळण्यात येऊ लागले. या विषयांमध्ये, सजावटीच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेला. उत्सवाच्या काळातील गाण्यांची एक स्वतंत्र बाजारपेठ गेल्या काही वर्षांत तयार झाली. साधारण उत्सवासाठी गाण्यांच्या कॅसेट आणि नंतर सीडीज काही कंपन्या प्रसिद्ध करत होत्या. आता त्याऐवजी        समाजमाध्यमांवर गाणी प्रसिद्ध होतात. गाणी प्रसिद्ध करण्याचे माध्यम बदलले तसाच गाण्यांचा बाजही आता बदलला आहे.

गाण्यांचा बदलेला बाज आणि धागडधिंगा

साधेपणाने नटलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या दोन दशकांमध्ये अधिकाधिक झगमगाटी झाले. एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जागृती करण्यात येत असताना प्रत्यक्षात सार्वजनिक गणेश मंडळांकडूनच उत्सवाचे स्वरूप हे पर्यावरणाला हानी पोहोचवणारे झाले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलचा वापर करून मोठी आरास मंडळे करतात. उत्सव संपल्यानंतर काहीच मंडळांची मखरे ही पुन्हा विक्रीला जातात. मात्र बहुतेक मंडळांची प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलची मखरे ही रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून येतात. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकाला त्रास व्हावा अशा एलईडी लाइट्सचा वापर करून सजावट करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत दिसतो. बीम लाइट्सना परवानगी नसतानाही त्यांचा वापर उत्सवात सर्रास करण्यात येतो. संगीताच्या तालावर बदलणारी विद्युत रोषणाई हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ट्रेंड. या रोषणाईच्या निमित्ताने चित्रपटातील ठेका असलेल्या गाण्यांनी उत्सवाच्या मंडपात प्रवेश केला. या बदलाने उत्सवातील गाण्यांच्या बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलला. चित्रपटांमध्ये ‘आयटम साँग’ हा प्रकार गेल्या दशकात प्रचलित झाला आणि या ‘आयटम साँग’ना गणेशोत्सव मंडपात हक्काचे स्थान मिळाले. ‘मुन्नी’, ‘शीला’, ‘दाजिबा’ यांसारखी गाणी मंडळप्रिय ठरली. आता तर गणेशोत्सवानंतर काही काळातच प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपटांतील आयटम साँग हे उत्सवात प्रसिद्ध करण्याचे तंत्र निर्मात्यांनी गेल्या दोन वर्षांत अवलंबल्याचे दिसते. उत्सवासाठी अशी खास गाणी आताही तयार होतात. मात्र आता भक्तिगीते किंवा भावगीतांना मागणी नसल्याचे सीडींचे विक्रेते सांगतात. यंदा उत्सवात शांताबाई, बाबुराव, बाई वाडय़ावर या, झिंगाट, मी तुझा परशा या गाण्यांची चलती असल्याचे दिसते आहे.

उत्सवातील साधेपणा हरवला

सार्वजनिक उत्सव सुरू झाला, तेव्हा गणपतीच्या मूर्ती भोवती मखर, साधीशी आरास करणे इतपतच सजावटीला महत्त्व होते. केळीचे, कर्दळी खांब आणि फुले वापरून मखर करण्यात येत असे. त्यानंतर स्थिर पुतळ्यांनी सजावटीत स्थान मिळवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मधील गणेशोत्सवात नेत्यांचे पुतळे, नकाशा, राष्ट्रीय चिन्हे वापरून सजावट करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात पौराणिक, ऐतिहासिक विषय या सजावटीतून हाताळण्यात येत होते. त्यानंतर हालचाल करणारे पुतळे, चक्राकार फिरणाऱ्या सजावटी असे बदल सजावटीच्या स्वरूपात होत गेले. गणेशोत्सवाच्या मंडपाजवळून जाताना अगदी नव्वदच्या दशकापर्यंत भक्तिगीते, प्रसिद्ध प्रचलित भावगीते कानावर पडत. कॅसेटच्या जमान्यात खास गणेशोत्सवासाठी तयार होणाऱ्या गाण्यांची एक मोठी बाजारपेठ ऐंशीच्या दशकात तयार झाली. नंतरच्या काळात कॅसेटची जागा सीडीने घेतली, तरीही ही उत्सवी गाण्यांची बाजारपेठ कायम होती. आता या गाण्यांचा बाज बदलला आणि कालांतराने कोळीगीतांच्या ढाच्यावरील गाण्यांना मागणी वाढू लागली.