क्रिकेटच्या शुद्धीकरणाचे वारे वाहात असतानाच अद्याप खेळावर भ्रष्टाचाराचे सावट असल्याचे स्पष्ट होत आहे. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे बदनाम झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत अजूनही सामने फिक्सिंग करण्याचे प्रयत्न होत असल्याचे उघडकीस आले आहे. सामने निश्चित करण्यासाठी गेल्या महिन्यात आमच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला, अशी धक्कादायक कबुली राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूने दिली आहे.
‘‘स्पॉट-फिक्सिंगपासून खेळाडूंना दूर राखण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रयत्न यशस्वी ठरत आहेत, हे त्या खेळाडूच्या कृतीतून दिसून आले आहे,’’ असे मत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
‘‘एका खेळाडूपुढे स्पॉट-फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु त्याने त्वरित बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समितीला त्याबाबत माहिती दिली. बीसीसीआयच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याच्या धोरणाला सकारात्मक यश मिळाल्याचा आनंद होत आहे,’’ असे ठाकूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
ठाकूर यांनी मुंबईस्थित या खेळाडूचे नाव मात्र गुलदस्त्यात राखले. राजस्थान रॉयल्स संघाकडून अजिंक्य रहाणे, प्रवीण तांबे, दिनेश साळुंखे, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर असे पाच मुंबईचे क्रिकेटपटू खेळतात. २०१३च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स केंद्रस्थानी होते.
‘‘राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूला महिन्याभरापूर्वी २०१५च्या आयपीएल सामन्यांसंदर्भात या लीगमध्ये न खेळणाऱ्या एका खेळाडूने फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवला होता,’’ असे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघू अय्यर यांनी सांगितले.
भ्रष्टाचारमुक्त स्पर्धेची राजीव शुक्ला यांची हमी
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूपुढे सामना निश्चितीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे वृत्त आल्यावर पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का बसला. पण आम्ही आयपीएल भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचा विश्वास आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. ‘‘बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समितीने जी काही पावले उचलली त्याचे हे यश आहे. त्यामुळेच राजस्थान संघातील ‘त्या’ खेळाडूने त्वरित सर्व माहिती लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समितीच्या अधिकाऱ्यांना दिली.,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समितीच नसल्याने चौकशी लांबणीवर
नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी राजस्थान रॉयल्सला सहकारी खेळाडूने फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त प्रकाशात आले असले तरी याबाबतच्या चौकशी लांबणीवर पडणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चार दिवसांपूर्वी आपल्या विविध समित्यांची घोषणा केली. परंतु लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समिती ही उपसमितीच जाहीर केली नाही. याबाबत आयपीएल प्रशासकीय समितीच्या सदस्याने सांगितले की, ‘‘आयपीएल सुरू झाले तरी लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा समिती निश्चित करण्यात आलेली नाही, ही हास्यास्पद गोष्ट आहे. याचे उत्तर फक्त जगमोहन दालमियाच देऊ शकतील.’’

राजस्थानकडील पाच मुंबईकर खेळाडू
१. अजिंक्य रहाणे<br />२. प्रवीण तांबे
३. दिनेश साळुंखे
४. धवल कुलकर्णी
५. अभिषेक नायर