चौकार व षटकारांच्या आतषबाजीच्या आनंदापासून एक वर्ष वंचित राहिलेल्या पुणेकर क्रिकेट चाहत्यांना शुक्रवारपासून पुन्हा आयपीएल स्पर्धेचा धमाका पाहण्याची संधी मिळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला शुक्रवारी राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे गहुंजेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेल्या वर्षी आयपीएलचा एकही सामना झाला नव्हता. पण किंग्ज इलेव्हनच्या मदतीमुळे यंदा तीन सामने का होईना पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.    विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील शेन वॉटसन हा राजस्थानचे कर्णधारपद भूषवत आहे, तर स्टीव्हन स्मिथ व जेम्स फॉकनर हेदेखील राजस्थानकडूनच खेळत आहेत. कांगारूंच्या विजयाचा शिलेदार ग्लेन मॅक्सवेल हा किंग्ज इलेव्हनकडून खेळत आहे. त्याचाच सहकारी जॉर्ज बेली हा किंग्ज संघाचे नेतृत्व करीत आहे.  
दोन्ही संघांचा पहिलाच सामना असल्यामुळे विजयाची बोहनी करण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. किंग्ज संघाच्या फलंदाजीची मुख्य मदार कर्णधार बेली, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, मुरली विजय यांच्यावर आहे. थिसारा परेरा, मिचेल जॉन्सन, अक्षर पटेल यांच्याकडूनही अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जॉन्सन, मॅक्सवेल, पटेल, परविंदर अवाना, शार्दूल ठाकूर यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान संघाने यंदा आपल्या संघात ख्रिस मॉरिस याला तब्बल एक कोटी ४० लाख रुपयांच्या बोलीवर विकत घेतले आहे. त्याच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीतच कर्णधार वॉटसन, स्मिथ, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन,  स्टुअर्ट बिन्नी यांच्यावरही त्यांची मदार आहे. गोलंदाजीत वॉटसन, बिन्नी, धवल कुलकर्णी, टीम साउदी, रजत भाटिया  यांच्यावर लक्ष असेल.

आमच्यासाठी हे घरचे मैदानच आहे. गेले पाच-सहा दिवस आम्ही येथे सराव करीत आहोत. आमच्याकडे ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉन्सन, डेव्हिड मिलर आदी अनुभवी खेळाडूंची फळी असल्यामुळे विजयी सलामी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.  
– जॉर्ज बेली (कर्णधार, किंग्ज इलेव्हन)

विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील स्टिव्हन स्मिथ, जेम्स फॉल्कनर यांच्याबरोबरच ख्रिस मॉरिस, टीम साउदी, अजिंक्य रहाणे, केन रिचर्ड्सन आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे आम्हाला विजयाची अधिक संधी आहे.
– शेन वॉटसन (कर्णधार, राजस्थान रॉयल्स)

प्रतिस्पर्धी संघ
किंग्स इलेव्हन पंजाब- जॉर्ज बेली (कर्णधार), अनुरीत सिंग, परविंदर अवाना, रिशी धवन, योगेश गोळवलकर, गुरकीरत सिंग मान, ब्युआन हेन्ड्रिंक्स, मिचेल जॉन्सन, करनवीर सिंग, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, निखील नाईक, अक्षर पटेल, थिसारा परेरा, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.
राजस्थान रॉयल्स- शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.

सामन्याची वेळ : ८ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स