कोलकातापुढे पुण्याची आज कसोटी

काही वेळा कागदावरतीच संघ बलाढय़ मानले जातात, प्रत्यक्षात मात्र मैदानावर उतरल्यानंतर त्यांची कामगिरी सिंहाऐवजी एखाद्या  बकरीसारखीच असते. असेच काहीसे पुणे वॉरियर्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्याबाबत दिसून आले आहे. गुरुवारी येथे या दोन संघांमध्ये उत्कंठापूर्ण लढत होणार आहे.

सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही दुबळ्या संघांमध्ये कोण विजयी ठरतो हीच उत्सुकता आहे. गतविजेत्या कोलकाता संघाने आतापर्यंत १२ सामन्यांपैकी केवळ चारच सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे, तर आठ सामने त्यांनी गमावले आहे. त्यामुळे बाद फेरीच्या त्यांच्या आशा दुरावल्याच आहेत. पुण्याने आतापर्यंत १२ सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत तर उर्वरित सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.

दोन्ही संघांमधील खेळाडूंचा विचार करता हे दोन्ही संघ कागदावरच बलाढय़ राहिले आहेत. कोलकाता संघात कर्णधार गौतम गंभीर, जॅक कॅलीस, युसुफ पठाण, ब्रेट ली, मनविंदर बिस्ला, सुनील नरेन, मनोज तिवारी, इऑन मोर्गन या खेळाडूंची मांदियाळी आहे, तरीही यंदा त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सिनेअभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या या संघाने गतविजेतेपदास साजेशी कामगिरी केलेली नाही. सांघिक कौशल्य दाखविण्यात त्यांना अपयश आले आहे. फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव तर गोलंदाजीत धावा रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अचूकतेचा अभाव हेच त्यांच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले आहे.

पुण्याचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. कर्णधार एरॉन फिंच, युवराजसिंग, अँजेलो मॅथ्युज, मिचेल मार्श, अजंथा मेंडीस, भुवनेश्वरकुमार, ल्युक राईट, रॉबिन उथप्पा, अशोक िदडा, वेन पार्नेल, अभिषेक नायर आदी हुकमी एक्के असतानाही पुण्याने अनेक वेळा हातातोंडाशी आलेली विजयाची संधी घालविली आहे. कधी फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली तर गोलंदाज त्यावेळी दिशाहीन गोलंदाजी करीत त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवितात. गोलंदाजांनी कमावले पण फलंदाजांनी घालविले असा विरोधाभास यंदा अनेक वेळा दिसून आला आहे. एक मात्र नक्की आपल्या खेळाडूंचे अपयश होत असले तरी पुण्यातील क्रिकेट चाहते भरघोस प्रतिसाद देत या सामन्यास उपस्थित राहतात. गुरुवारीही हेच चित्र पाहावयास मिळणार आहे.

स्थळ :सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम, पुणे

वेळ : दुपारी ८ वाजल्यापासून.