आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजस्थान रॉयल्स संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने न्यूझीलंडमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. आपला सराव करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

बेन स्टोक्सच्या वडिलांवर न्यूझीलंडमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु आहे. स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचा आजार आहे. यासाठी आपल्या परिवारासोबत राहता यावं यासाठी स्टोक्स पाकिस्तानविरुद्धचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतला होता. आयपीएलमध्ये राजस्थानचं प्रतिनिधीत्व करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ठोस माहिती मिळत नव्हती. राजस्थानच्या संघ व्यवस्थापनानेही स्टोक्सने सध्या त्याच्या वडिलांसोबत असणं गरजेचं आहे. आम्ही त्याला वेळ देणार असून त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचं सांगितलं होतं. परंतू पुन्हा एकदा सरावाला सुरुवात करुन स्टोक्सने आयपीएलमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

बेन स्टोक्सने आपल्याला सरावासाठी सर्व सुविधा निर्माण करुन दिल्याबद्दल आभार मानले आहेत. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान संघात जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, डेव्हिड मिलर असे अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे आगामी काळात स्टोक्स आयपीएलमध्ये सहभागी होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.