IPL चा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी चांगला गेलेला नाही. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन चेन्नईने धडाकेबाज सुरुवात केली. परंतू यानंतर चेन्नईची गाडी रुळावरुन घसरत गेली. रविवारी शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ५ गडी राखून मात केली. ९ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ६ पराभव यांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा साखळी फेरीतूनच बाहेर फेकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधीही चेन्नईच्या संघाने अशाच परिस्थितीवर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत गाठण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जकडे अजुनही संधी आहे. परंतू यासाठी चेन्नईला आपल्या उर्वरित पाचही सामन्यांमध्ये करो या मरो अशा पद्धतीने खेळावं लागणार आहे. उर्वरित पाचही सामने चेन्नईने जिंकले तर चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. १६ गुण मिळवलेल्या संघाला आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये संधी मिळते. परंतू चेन्नईला यासाठी एकाही सामन्यात पराभव स्विकारून चालणार नाही.

उर्वरित पाच सामन्यांपैकी एका सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तरीही चेन्नईला प्ले-ऑफची संधी आहे. परंतू यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. उर्वरित पाच सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव झाल्यास धोनीच्या संघासाठी नेट रनरेट कामी येऊ शकतो. गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादने १४ गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर प्ले-ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवलं होतं. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सोमवारी चेन्नईचा सामना अबु धाबीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : धोनीला आत्मपरिक्षण करण्याची गरज – जावेद मियाँदाद