Dream11 IPL 2020 DC vs KKR: कोलकाताविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. शारजाच्या मैदानावरील सामन्यात आधी पृथ्वी शॉ, त्यानंतर ऋषभ पंत आणि अखेरीस श्रेयर अय्यर अशा तिहेरी तडाख्याने कोलकाताच्या गोलंदाजांना अक्षरश: नाकीनऊ आणले. श्रेयस अय्यरने अवघ्या ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा कुटल्या. तर पृथ्वीने ६६ आणि पंतने ३८ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने २२८ धावांचा डोंगर उभारला.

कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने तो निर्णय चुकीचा ठरवला. श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त ३८ चेंडूत नाबाद ८८ धावा ठोकल्या. त्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होते. या फटकेबाजीच्या रावर दिल्लीने २० षटकात ४ बाद २२८ धावा केल्या. श्रेयस अय्यरचे हे IPLमधील १४ वे अर्धशतक ठरले. या खेळीसह त्याने फाफ डु प्लेसिस, जेपी ड्युमिनी आणि आरोन फिंच या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं.

त्याआधी, सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. चांगली सुरूवात मिळाल्यानंतर धवन २६(१६) धावांवर बाद झाला. पण पृथ्वी शॉने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने फटकेबाजी सुरूच ठेवली. पृथ्वीने आपले अर्धशतक झळकावले, पण मोठा फटका खेळताना तो ६६(४१) धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. पृथ्वी बाद झाल्यावर ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी केली. तो ५ चौकार आणि एका षटकारासह ३८(१७) धावांवर बाद झाला.