News Flash

IPL 2020 Playoff : काय आहेत दोन्ही संघांसमोरची आव्हानं??

जाणून घ्या कोणत्या संघाचं पारडं आहे जड

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे निर्माण झालेलं अनिश्चीततेचं वातावरण यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला. तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या टप्प्यात प्ले-ऑफमध्ये ४ संघ निश्चीत झाले. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज कामगिरी करत पहिलं स्थान पटकावलं तर दिल्लीने RCB वर मात करत दुसरं स्थान पटकावलं. रनरेटचं गणित साधल्यामुळे सलग ४ पराभवांनंतरही RCB ला तिसरं स्थान मिळालं तर बंगळुरुने मुंबईवर मात करत कोलकाता नाईट रायडर्सचा स्वप्नभंग केला आणि चौथ्या स्थानावर आपला हक्क सांगितलं.

आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार असून पराभूत संघ आणखी एक सामना खेळले. महत्वाच्या सामन्यात दोन्ही संघांसमोर नेमकी काय आव्हानं आहेत याचा आपण आज आढावा घेणार आहोत.

१) रोहितचा फॉर्म आणि फिटनेस –

पंजाबविरुद्ध सामन्यात सुपरओव्हरच्या थरारनाट्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. यामुळे त्याला संघातलं आपलं स्थानही गमवावं लागलं. परंतू साखळी फेरीत हैदराबादविरुद्ध सामन्यात रोहितने पुनरागमन करत आपण फिट असल्याचं जाहीर केलं. परंतू या सामन्यात रोहित आपला लौकिका साजेसा खेळ करु शकला नाही. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये रोहितच्या नावावर फक्त दोन अर्धशतकं जमा आहेत. हैदराबादविरुद्ध सामन्यात रोहित फक्त ४ धावा करु शकला. त्यामुळे रोहितने फॉर्मात येऊन पुन्हा एकदा बहारदार खेळ करणं हे संघासाठी गरजेचं बनलं आहे

२) मधल्या फळीत दिल्लीला हवाय भक्कम आधार –

साखळी फेरीत गेल्या काही सामन्यांपासून दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची खराब कामगिरी हा चिंतेचा विषय राहिला आहे. RCB विरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला. परंतू मधल्या फळीतले फलंदाज अपेक्षित खेळी करु शकत नाहीयेत. संघाला गरज असताना ऋषभ पंत, स्टॉयनिस, हेटमायर यांच्याकडून निराशाजनक कामगिरी होतेय. मुंबईकडे कायरन पोलार्ड, पांड्या बंधू यांसारखे भक्कम फलंदाज असताना दिल्लीची मधली फळी कमकुवत असणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

३) पृथ्वी शॉचं करायचं तरी काय??

युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा ढासळलेला फॉर्म हा दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक चिंतेचा विषय बनला आहे. साखळी फेरीत वारंवार आलेल्या अपयशामुळे दिल्लीने अजिंक्य रहाणेला संधी दिली. परंतू अजिंक्यनेही निराशाच केली. करो या मरोच्या सामन्यात प्रशिक्षक रिकी पाँटीगने शॉ आणि रहाणे या दोघांनाही खेळवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने पृथ्वी शॉ या सामन्यातही स्वस्तात माघारी परतला. त्यात मुंबई इंडियन्सचा फॉर्मात असलेला डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्ट सध्या चांगलाचा फॉर्मात आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला मुंबईविरुद्ध सामन्यात सांभाळून खेळ करावा लागेल.

४) दव आणि दुबईचं मैदान –

गेल्या काही सामन्यांपासून आयपीएलमध्ये रात्री मैदानावर पडणारं दव लक्षात घेता नाणेफेक जिंकलेला संघ पहिल्यांदा गोलंदाजी करुन धावसंख्येचा पाठलाग करणं पसंत करतोय. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी दुबईचं मैदान फारसं लकी ठरलेलं नाहीये. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांमध्ये मुंबई दुबईच्या मैदानावर फक्त एक सामना जिंकू शकलेलं आहे आणि हा विजय मुंबईने दिल्लीविरुद्ध मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:02 pm

Web Title: ipl qualifier 1 preview rohit sharmas form dcs middle order a worry psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!
2 दुखापतीतून पूर्णपणे बरा झालोय – रोहित
3 Women’s T20 : वेलॉसिटीची सुपरनोव्हाजवर ५ विकेट राखून मात
Just Now!
X