आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली. RCB ने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १७१ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबविरुद्ध सामन्यात RCB च्या संघ व्यवस्थापनाने एबी डिव्हीलियर्सला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. यावरुन सोशल मीडियासर, समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

पंजाबविरुद्धचा सामना शारजाच्या छोट्या मैदानात खेळवण्यात येत असल्यामुळे या मैदानावर डिव्हीलियर्स फटकेबाजी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारु शकला असता. परंतू RCB ने वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांना पहिल्यांदा संधी देत डिव्हीलियर्सला मागे ठेवलं. ज्याचा फटका RCB ला बसला. अखेरच्या षटकांमध्ये डिव्हीलियर्स फलंदाजीसाठी आला त्यावेळी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो स्वस्तात माघारी परतला. विराट कोहलीने डिव्हीलियर्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का आला याचं कारण सांगितलं.

“डिव्हीलियर्स कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल याबद्दल आमची चर्चा झाली. ड्रेसिंग रुममधून मला असा मेसेज मिळाला की लेफ्ट हँड – राईट हँड कॉम्बिनेशन सुरु ठेवायचं आहे. कधीकधी तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरत नाही, पण तरीही आम्ही हा प्रयोग केला आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल मी खुश आहे. कधीकधी तुमच्या मनासारखं होत नाही.” सामना संपल्यानंतर विराटने डिव्हीलियर्स उशीरा फलंदाजीसाठी येण्याचं कारण सांगितलं. शारजाच्या मैदानावर पंजाबच्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला खरा…पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.