IPL 2020 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाची स्पर्धा युएईत होत असल्यामुळे सर्व संघांना विजेतेपदाची समान संधी आहे असा जाणकारांचा अंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु यांना कधीही विजेतेपदावर मोहर उमटवता आलेली नाही. त्यामुळे यंदा हे संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पण याच दरम्यान एका माजी खेळाडूने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स हा यंदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी ऱ्होड्सने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने नाव कमावलं. निवृत्तीनंतरही जॉन्टी ऱ्होड्स तेवढ्याच जोशात मैदानात वावरतो. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सोशल मीडिया हँडलवर जॉन्टी ऱ्होड्स संघातील खेळाडूंना कॅच घेण्याचं तंत्र शिकवताना एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात जॉन्टीने एक सुरेख झेल घेतला.

जॉन्टी ऱ्होड्सच्या या भन्नाट कॅचचे चहुबाजूंनी कौतुक केले जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून इतके वर्षे दूर असणारा खेळाडू अजूनही चपळ आहे अशी त्याची स्तुती केली आहे. तसेच नेटिझन्सदेखील त्याच्यावर फिदा झाले आहेत.

दरम्यान, आयपीएलनंतर जॉन्टी ऱ्होड्स स्वीडन क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वीडन क्रिकेट फेडरेशनसोबत त्याचा करार झाला असून आयपीएल संपल्यानंतर तो आपल्या परिवारासोबत स्वीडनला रवाना होणार आहे.