News Flash

IPL 2020: विराटची धमाकेदार कामगिरी; गौतम गंभीरला टाकलं मागे

IPLच्या इतिहासात गाठला महत्त्वाचा टप्पा

विराट कोहली (फोटो- IPL.com)

कर्णधार विराट कोहलीने केलेल्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला पराभवाची चव चाखायला लावली. महिपाल लोमरोरच्या झुंजार खेळीमुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने ८ गडी आणि ५ चेंडू राखत राजस्थानवर सहज विजय मिळवला. विराटव्यतिरिक्त देवदत्त पडीकलनेही ६३ धावांची दमदार खेळी केली. गोलंदाजीत युजवेंद्र चहलने चमक दाखवत ३ बळी टिपले. या विजयासह बंगळुरूने गुणतक्त्यात अव्वलस्थानी झेप घेतली.

बंगळुरूला दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फिंच अपयशी ठरला. पण देवदत्त पडीकलने ४५ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर विराटने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या बळावर ५३ चेंडूत ७२ धावा केल्या. हे विराटचे IPLमधील ३७वे अर्धशतक ठरले. त्याने ३६ IPL अर्धशतके नावावर असलेल्या माजी फलंदाज गौतम गंभीरला मागे टाकले. तर सहकारी शिखर धवनच्या (३७ अर्धशतक) कामगिरीशी बरोबरी साधली.

विराटने याच सामन्यात आणखी एक दमदार कामगिरी केली. IPLमध्ये सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहेतच पण आज त्याने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. विराटने ७२ धावांची खेळी करत ५,५०० धावांचा टप्पा पार केला. राजस्थानविरूद्धच्या सामन्यानंतर आता विराटच्या नावावर ५,५०२ धावा आहेत. या यादीत सुरेश रैना ५,३६८ धावांसह दुसरा, तर रोहित शर्मा ५,०६८ धावांसह तिसरा आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोस बटलर हे स्वस्तात बाद झाले. रॉबिन उथप्पा आणि महिमाल लोमरोर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उथप्पा १७ धावांवर माघारी परतला. महिपाल लोमरोरने मात्र एक बाजू लावून धरत उत्तम कामगिरी केली. त्याने ३९ चेंडूत ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. तर राहुल तेवातियाने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत १२ चेंडूत ३ षटकारांसह २४ धावा केल्या. परंतु युजवेंद्र चहलने सर्वाधिक ३ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 8:19 pm

Web Title: virat kohli surpasses gautam gambhir record of most fifties in ipl completes 5500 runs mark ipl 2020 rcb vs rr vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ‘चतूर चहल’च्या जाळ्यात अडकले फलंदाज, UAE मध्ये विक्रमी कामगिरी
2 Video : तेवतिया को दर्द नही होता! सैनीचा बिमर छातीवर आदळूनही राहुलची फटकेबाजी
3 IPL 2020: संजू सॅमसन OUT की NOT OUT? चहलच्या कॅचवरून सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X