दयानंद लिपारे

पावसाचे सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा संकट येण्याच्या भीतीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सावरून शिवारकामात गुंतला. पीक हाताशी आले असताना नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने हजारो एकरांतील उभ्या पिकांची धूळदाण उडाली आहे. शासनाने आर्थिक मदत करावी या मागणीचा रेटा वाढला असताना प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. तर पालकमंत्र्यांनी शासन मदतीत कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले आहे. या मुद्दय़ावरून राजकीय वादाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीच्या महापुराने उद्ध्वस्त झालेला शेतकरी सावरत असताना करोनाच्या संकटामुळे रब्बी पिकाला योग्य भाव मिळाला नसल्याने ढेपाळला होता. या दोन संकटांशी मुकाबला करीत शेतकऱ्यांनी खरीपाची चांगली तयारी केली.

पावसानेच पिकवले आणि हिरावलेही

दसऱ्याच्या सुमाराला कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी ठरलेली असते. पण गेल्या आठवडय़ात सलग तीन-चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे नगदी उसासह भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला या पिकांचे मातेरे झाले. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आर्थिक बेगामीवर बोळा फिरवला गेला.

सुमारे दहा हजार एकरांतील उभे पीक पावसाने गिळंकृत केले. चारशेहनू अधिक गावांतील २५ हजार शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. तलाठी, ग्राम सेवक, कृषी सहायक या कामात आहेत. आठवडाभरात नुकसानीचा अंदाज येईल,’ असे कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले. मात्र, गतवेळचे कटू अनुभव गाठीला असलेले शेतकरी वास्तविक पंचनामे व्हावेत, कार्यालयात बसून कागदपत्रे रंगवू नयेत , अशी मागणी करीत आहेत.

शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी करतानाच शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पाऊस पथ्यावर?

या अति पर्जन्यवृष्टीचे काही फायदे असून ते नजरेआड करता येणार नाहीत, असे कृषी अभ्यासक सांगतात. ऑक्टोबरअखेरीस पाऊस झाल्याने उसाला पुढच्या काळात पाण्याची चांगली उपलब्धता राहते. उसाचे वजन आणि सरासरी वाढते. रब्बीचे पीक घेत असताना या पावसाने निर्माण झालेला जमिनीतील ओलावा लाभदायक ठरणार आहे.

पाणीपातळीत वाढ झाल्याने मे-जूनपर्यंत जलसंचय राहून रब्बी पिकासाठी त्याचाही फायदा होणार आहे. तथापि, या निमित्ताने हवामान बदलाचे नेमके काय परिणाम होऊ लागले आहेत याचाही कृषी, पर्यावरण या विभागातील अभ्यासकांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निर्माण झाली आहे’,असे कृषी अभ्यासक रावसाहेब पुजारी यांनी सांगितले.

शासकीय सक्रियता

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाल्याने शासनाला दखल घेणे भाग पडले आहे. पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बाधित पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असा दिलासा देतानाच त्यांनी पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे. गतवर्षी महापुराच्या वेळी पात्र लाभार्थी बाजूला राहिले आणि अपात्र लोकांचे खिसे भरले गेले; तेही तलाठी , ग्रामसेवक, मंडल अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने. आता याची चौकशी सुरू आहे. असे गरव्यवहार यावेळी टाळले जावेत, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

मदतीची मागणी

* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. आम आदमी पक्षाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

* भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी खरीप पिकांचे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली