कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणाईतील नाटय़जाणिवा समृद्ध करणाऱ्या आणि त्यांच्या अनुभवाला नवा अवकाश मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी उद्या मंगळवारी कोल्हापुरात निनादणार आहे. कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृहात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या महाविद्यालयांचे संघ या स्पर्धेत उतरले असल्याने रंगत वाढणार आहे.

गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेने पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयीन तरुणाईवर गारुड घातले आहे. स्पर्धा कधी सुरु होते याचे वेध दोन महिने आधीपासून लागलेले असतात. यंदाही असाच उत्साहजनक अनुभव येतो आहे. महिनाभर या स्पर्धेसाठीची नोंदणी, त्यानंतर संहिता निवडून तालमी पूर्ण करून तयारीत असलेले तरुण नाटयम्कर्मी ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण आता त्यांच्यासमोर येऊ न ठेपला आहे. अनेक नामवंत महाविद्यालयांनी आपल्या संघाची नोंदणी केली आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापुरातील नाटय़प्रेमींना सुखावणारा ठरला आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उद्या मंगळवार पासून सुरुवात होत आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या कोल्हापुरातील तिसऱ्या पर्वाला या वर्षी दणक्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या सहभागामुळे महाविद्यालयीन स्पर्धकांमध्येही विश्वास निर्माण केला आहे. विविधरंगी नाटयकौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात आपले कलागुण सादर करण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत. याच मंचावरून पुढे आलेले अनेक कलाकार आज नाटक—चित्रपट—मालिकाविश्वात स्थिरावले आहेत. याचा अनुभव असल्याने आपले सादरीकरण उत्तम करण्याची चढाओढ त्यांच्यात दिसत आहे. चौकटीपलीकडचा विचार करण्याची प्रेरणा त्यांच्यात रुजवणारी असल्याचा अभिप्राय नाटय़ समीक्षकांनी नोंदवला आहे. या स्पर्धेच्या सर्वसाधारण स्वरूपाप्रमाणे राज्यभरातील आठ विभागांमधील स्पर्धा केंद्रातून पहिल्यांदा प्राथमिक फेरी, त्यानंतर विभागीय अंतिम फेरी आणि सर्वात शेवटी महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान स्पर्धकांना जिंकता येणार आहे.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.