कोविड केंद्राचे लोकार्पण
कोल्हापूर : निवडणुकीतील पराभवामुळे खचून जाणाऱ्यांपैकी महाडिक नाहीत.समाजसेवेचे व्रत जोपासलेल्या धनंजय महाडिक यांनी अद्ययावत कोविड केंद्र सुरू करून सामान्य रुग्णांची मोठी सोय केली आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.येथील हॉकी स्टेडियमजवळ सुरू केलेल्या कोविड केंद्राच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते.
भाजप— ताराराणी आघाडीच्या सहकार्याने पाच मजली इमारतीत १२५ खाटांचे अद्ययावत कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. संकल्पक महाडिक म्हणाले,की राज्यात बहुतांश जिल्हयात करोनाची लाट ओसरत असली तरी कोल्हापुरात अजूनही करोना संसर्गाचा जोर कायम आहे. प्रचंड रुग्ण वाढल्याने जिल्हा रुग्णालयावर ताण आला आहे.खाजगी रुग्णालयातील उपचार सामान्यांना परवडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन, हे सुसज्ज कोविड केंद्र सुरू केले.प्राणवायू, खाट मिळाला नाही म्हणून एकाही रूग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात कोल्हापूरच्या नागरिकांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी महाडिकांनी सुसज्ज हॉस्पिटल सुरू करावे, त्याला मदत करू, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते.