प्रवीण दरेकर यांचा राजू शेट्टी यांना टोला

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा करू नये. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतीसाठी ५० हजार रुपये देण्याच्या वचनाचे काय झाले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या, असा सणसणीत टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज शेट्टी यांना लगावला.

रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चातर्फे चंदूर (ता. हातकणगले) येथे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत देरकर यांनी खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. या प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, माजी आमदर सुरेश हळवाणकर उपस्थित होते.

शरद जोशी नेहमी सांगायचे, ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पायातील बेडय़ा निघतील, त्या दिवशी शेतकरी सुखी होईल. तेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अबलंबिले आहे, असे नमूद करून दरेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गोष्टी आम्हाला करतात, पण अख्खा भाजप बांधावर जाऊन संवाद साधत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भीती नाही, शेतकरी आमचा आहे. जे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते व नंतर आपलेच वचन विसरले, त्यांना आधी विचारा असा सवाल दरेकर यांनी केला.