कोल्हापूर : शेतीमालावरील आयात शुल्क मोठय़ा प्रमाणात वाढवावे, जेणेकरून असा माल हा देशांतर्गत खरेदी करणे कुणालाही व्यवहार्य ठरेल आणि आयातीला प्रतिबंध बसेल, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. शेतीमाल आयात धोरण निश्चित करण्यासाठी वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यापक बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही त्यांनी केली.

देशांतर्गत साखरेचे साठे मोठय़ा प्रमाणात शिल्लक असतानाही नुकतीच पाकिस्तानातून साखर आयात केल्याचे उघडकीस आले आहे. ही साखर जरी खासगीरीत्या आयात केली असली तरी देशांतर्गत साठे मोठय़ा प्रमाणात शिल्लक असताना ती केल्याने त्यावर टीका होत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी शेतीमालावरील आयात शुल्कात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले, की असे आयात शुल्क वाढवल्यावर आपोआपच देशांतर्गत शेतीमालाला उठाव मिळेल. त्याचा बाजारभाव वाढण्यासही मदत होईल. सध्या साखरेबरोबर देशांतर्गत डाळींचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे, पण असे असतानाही डाळींची मोठय़ा प्रमाणात आयात झाली आहे. हे सगळे रोखण्यासाठी शेतीमालावरील आयात शुल्क वाढवणे गरजेचे आहे. या बाबतचा गोंधळ संपुष्टात यावा तसेच शेतीमाल आयात धोरण निश्चित करण्यासाठी वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी फेरविचार केला पाहिजे . त्यासाठी त्यांनी बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही शेट्टी यांनी केली.

 कर्नाटकात लोकशाहीचा खून

भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी लोकशाही संकेत धुडकावले जात आहेत. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नसताना सरकार स्थापनेसाठी केला जाणारा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी टीका शेट्टी यांनी कर्नाटकातील घडामोडीवर केली. गोवा, मणिपूर, मेघालय येथे एक भूमिका घेणारी भाजप कर्नाटकात दुसरेच नाटक करत असल्याचा टोमणा मारला.