तुर्कस्तानमधून ११ हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना खड्डय़ात घालणारा आहे. या निर्णयाने ना ग्राहकांना दिलासा मिळणार ना  शेतकऱ्यांचे हित साधणार. सरकारने निर्णय घेण्यास उशीर केल्याने शेतकऱ्यांची वाट लागणार आहे, असे मत व्यक्त करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कांदा आयातीला शुक्रवारी विरोध दर्शविला आहे.

शेट्टी म्हणाले, सरकारी काम आणि सहा महिने थांब असा अनुभव जुना आहे. बाजारात कांदा नव्हता तेव्हाच म्हणजे दीड महिन्यापूर्वी कांदा आयातीचा निर्णय घ्यायला हवा होता. आता कांद्याचे भाव वाढून २ महिने झाले आहेत.

सरकारने उशिराने  कांदा आयात करण्याचा घेतलेला निर्णय आत्मघातकी आहे. तो  शेतकऱ्याला खड्डय़ात घालणारा आहे. तुर्कस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर तर कोसळतील. नवा कांदा हळूहळू बाजारात येत असताना आयातीच्या प्रचंड  साठय़ामुळे आपल्याकडील कांद्याचे दर कोसळतील.