बेडग गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभी राहत नाही; तोपर्यंत गावात परतणार नाही, असा निर्धार करीत तेथील  आंबेडकरी समाज बांधवांनी मंगळवारी माणगाव (ता.हातकनंगले)  येथून मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रेस सुरुवात केली.

बेडग (ता. मिरज) या गावातील कमानीचा गेले तीन महिने वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे कमान बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बेडग ग्रामस्थांनी गावात कोणत्याही महापुरुषांच्या नावे कमान उभी करायचे नाही, असा ठराव केल्याने पुन्हा मतभेद सुरू झाले.

हेही वाचा >>> कोल्हापूरातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; कार्यालयाला टाळे ठोकले

लाँग मार्चला प्रतिसाद

त्यावर आता, कमान उभी करण्याच्या मागणीसाठी बेडग मधील आंबेडकरी समाज बांधवांनी आज लाँग मार्च – पदयात्रेला सुरुवात केली.राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक माणगाव परिषद झाली होती. त्यामुळे या गावातून बेडग मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने पदयात्रेला कूच केली असता त्यामध्ये तरुण तरुणी, महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर परिणाम भोगावे लागतील…

यावेळी माजी आमदार राजीव आवळे,माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी आंबेडकर समाजाची मागणी सरकारने मान्य केली नाही तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. आठवले गटाचे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शासनाने सत्वर कमान उभी करावी; कायदेशीर बाब निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा दिला. तेलंगण विभागाचे प्रभारी प्रभारी विनोद निकाळजे, अध्यक्ष अमर कांबळे, नंदकुमार शिंगे आदी उपस्थित होते. एक हजारावर महिला, पुरुषांनी माणगाव येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले. सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार यांनी पदयात्रेस पाठिंबा जाहीर केला.