सतेज पाटील, मुश्रीफांचे पी. एन. पाटलांनाच आव्हान

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या सुपुत्रास अध्यक्ष करण्यासाठी कंबर कसणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांच्या विरोधात राजकीय लढाई सुरू केली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरशीची तिरंगी लढत होत असली तरी त्या निमित्ताने जिल्हय़ाच्या राजकारणाचा रंग बदलतानाच नवी व सोयीची राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. त्यामुळे वादग्रस्त कारभारामुळे चच्रेत असलेल्या या कारखान्याची सत्तासूत्रे कोणाकडे राहणार याविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जवळपास समान सदस्य निवडून आल्याने सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप व मित्रपक्ष यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी जोरदार चुरस सुरू होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी मुश्रीफ व सतेज पाटील या माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले होते. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुत्सद्दी राजनीतीचा प्रत्यय आणून देत मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा फडकावला.

हा इतिहास ताजा असला तरी राजकारणात कोणत्या वेळी, कोणत्या घटना घडतील याचा अंदाज नसतो. पी. एन. पाटील यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारे मुश्रीफ व पाटील हे दोन्ही आमदार अवघ्या पंधरवडय़ातच भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पी. एन. पाटील यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पाटील यांनी काँग्रेसचे पॅनेल िरगणात उतरवले आहे. तर मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या महाआघाडीचा प्रचार सुरू केला आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षांवेळी भाजप विरुद्ध भूमिका घेणाऱ्या मुश्रीफ सहकाराच्या पटलावर भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमवेत एकाच मंचावर दिसू लागले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे, आघाडय़ा किती ठिसूळ असतात याचेही दर्शन घडत आहे. तर सतेज पाटील थेट प्रचारात नसले तरी त्यांचे समर्थक, कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी स्वतंत्र आघाडी उभी करून पी. एन. पाटील यांच्या विरोधात टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीत मतभेद

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना कमी जागा दिल्याने नाराजी व्यक्त केली. ते महाआघाडीच्या प्रचारात उतरले असले तरी त्यांचे कारखान्याचे मावळते अध्यक्ष धर्यशील पाटील यांच्याशी मुळातूनच पटत नाही. धर्यशील पाटील यांचे सासरे माजी आमदार के. पी. पाटील यांच्याऐवजी राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ए. वाय. पाटील यांची इच्छा असल्यानेच ते नाइलाजाने सभांमध्ये दिसत आहेत. यातून राष्ट्रवादीत आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मुश्रीफ-पाटील यांचे पी.एन.ना छुपे सहकार्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुश्रीफ महाआघाडीचे नेतृत्व करीत असले आणि सतेज पाटील यांच्या छायाचित्राचा वापर करून चरापले यांनी प्रचार आरंभला असला तरी हे दोघेही पी. एन. पाटील यांच्या विरोधात कितपत आक्रमक राहणार हा प्रश्नच आहे. या उलट या दोघांचे छुपे सहकार्य राहणार असल्याची चर्चा भोगावती परिसरात आहे. तर गोकुळच्या मधुर संबंधातून माजी आमदार महादेवराव महाडिक हेही पी. एन. पाटील यांना आतून मदतीचा हात देण्याची चिन्हे आहेत.