एकीकडे गाळप हंगाम सुरू करण्याची मुदत संपत आली आहे आणि दुसरीकडे २२० कोटी या ठरलेल्या किमतीला कारखाना विकत घेण्याची कोणाची तयारी नाही, अशा दुहेरी कोंडीमध्ये चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना अडकला आहे. ७ वेळा भाडे तत्त्वावर आणि दोन वेळा विक्रीसाठी निविदा काढूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. आज आणखी एकदा निविदा काढली असता कारखाना विक्रीसाठी भंगाराचा दर आल्याचे पाहून संचालक मंडळाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. शिवशक्ती शुगर्स या कर्नाटकातील खाजगी कारखान्याने अवघी ८० कोटी रुपयांची निविदा भरली आहे. आता याच कारखान्याशी ४० वष्रे मुदतीने दौलत चालवायला घ्यावा , अशी विनंती करण्याची वेळ बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आली आहे.
चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना आíथक अडचणीत आला. कारखाना बंद करण्याची वेळ आली. या कारखान्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज पुरवठा केला होता. कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक जंग जंग पछाडत आहे. भाडे तत्त्व आणि विक्री असे दोन्ही पर्याय आजवर चोखाळण्यात आले. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. ७ वेळा भाडे तत्त्वावर आणि दोन वेळा विक्रीसाठी निविदा काढली गेली. अपेक्षित किंमत मिळत नसल्याने संचालक मंडळ चिंतेत आहे.
गतवेळी कुमुदा शुगर्स कंपनीने कारखाना भाडे तत्त्वावर घेण्यासाठी निविदा भरली. त्यांच्या अटी मान्य होण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा विक्रीची निविदा काढली. ती आज खोलण्यात आली. पण २२९ कोटी रुपये अपेक्षित असताना अवघे ८० कोटी रुपयांचा उल्लेख बेळगाव येथील शिवशक्ती शुगर्स या कर्नाटकातील खासगी कारखान्याने केला आहे. हा दर संचालक व व्यवस्थापन या दोघांना धक्का देणारा होता. जणू भंगाराचाच हा दर त्यांनी भरला की काय असे वाटण्यासारखी स्थिती होती.
पेचात सापडलेल्या संचालकांनी अखेर याच कंपनीला ४० वषार्ंसाठी भाडे तत्वावर कारखाना चालवण्यास घेण्याची विनंती केली आहे. ४० वर्षांसाठी भाडे तत्वावर की २२० कोटी या अपसेट प्राईसला विक्री याचा निर्णय मूल्यांकन अहवाल आल्यानंतर घेतला जाणार असल्याचे आज सांगण्यात आले. दौलत कारखाना गेली ५ हंगाम बंद आहे. ३० सप्टेम्बर पूर्वी साखर हंगाम सुरु झाला नाही तर कायद्यानुसार तेथे दुसरा नवा कारखाना सुरु करता येतो. त्यामुळे दौलत सहकारी साखर कारखाना परवाना अभावी धोक्यात आला आहे .दुहेरी पेच निर्माण झाल्याने व्यवस्थापनाची काळजी वाढली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2016 रोजी प्रकाशित
तिस-या लिलावातही ‘दौलत’ अपेक्षित दरापासून दूर
२२० कोटी अपेक्षित असताना केवळ ८० कोटींची बोली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-03-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daulat sugar factory far from expected rate in third auction