scorecardresearch

एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का

शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी धनुष्यबाणाकडून निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत शिंदे छावणी गाठल्याने तो ठाकरे गटाला धक्का ठरला.

Eknath Shinde, Kolhapur district, Chandradeep Narke
एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दयानंद लिपारे

कोल्हापूर : शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह यावर एकनाथ शिंदे गटाची निवडणूक आयोगाची अधिकृत मोहोर उमटल्या नंतर त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात कोल्हापुरात राजकीय पाठबळ मिळाले. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी धनुष्यबाणाकडून निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत शिंदे छावणी गाठल्याने तो ठाकरे गटाला धक्का ठरला. इचलकरंजीतील राष्ट्रवादीच्या तिघा प्रमुखांनी शिंदे यांच्याशी हातमिळवणी केल्याने घड्याळाचे काटे काहीसे मागे सरकले. भाजप – शिंदे यांची युती अधिक एकजिनसी झाल्याचेही दिसले.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेअंतर्गत राजकीय घडामोडींना गती आली. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अशी शिवसेनेची दुफळी चव्हाट्यावर आली. तेव्हा शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय कोल्हापुरातून संजय मंडलिक, धैर्यशील माने या दोन्ही खासदारांसह आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतला. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव या जिल्हाप्रमुखांसह डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील सरूडकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके या माजी आमदारांनी मातोश्रीची पाठराखण कायम केली.

हेही वाचा… मंत्र्यांच्या वाढदिवसाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

नरकेंची नवी राजकीय वाटचाल

यापैकी नरके यांच्या काही हालचाली तळ्यात मळ्यात होती. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगत होते. त्यामुळे नरके नेमके कोणाचे यावर प्रश्नचिन्ह लागत राहिले. गेल्या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटनांमुळे त्यांची राजकीय भूमिका पुन्हा बदलली. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. यामुळे शिंदे गटाचे पारडे नाही म्हटले तरी जड झाले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलनातून संताप व्यक्त केला. याच वेळी ठाकरे गटाला धक्का बसला तो चंद्रदीप नरके यांच्या बदललेल्या निर्णयामुळे. करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा शिवसेनेकडून विजयी झालेले चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्या वेळी स्वागताला हजेरी लावताना शक्तीप्रदर्शन केले. धनुष्यबाण चिन्हांकडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करीत नरके यांनी आपली नवी राजकीय वाटचाल अधोरेखित केली. शिंदे गटाला मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हाचा लाभ होईल असा त्यांचा राजकीय कयास आहे. कॉंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असा नरके यांचा राजकीय प्रवास आहे. गेल्याच आठवड्यात कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष चंद्रदीप नरके, कुंभी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके या बंधूंनी डी. सी. नरके यांनी स्थापन केलेल्या कारखान्यावर चौथ्यांदा वर्चस्व मिळवले. हे करताना त्यांनी त्यांचे करवीर मधील प्रतिस्पर्धी आमदार पी. एन. पाटील, पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे, चुलते गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, चुलत बंधू डॉ. चेतन नरके यांच्यावर मात केली. कारखाना निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला हे स्पष्ट झाल्यावर नरके यांनी खुलेआम शिंदे गटांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत पी. एन. पाटील – चंद्रदीप नरके यांच्यातील लढाई अधिक टोकदार होणार हे निसंदेह.

हेही वाचा… बच्चू कडू यांचे पुढील लक्ष्य नागपूर

राष्ट्रवादीला फटका

मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रवादीलाही धक्का बसला. इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अनिता कांबळे, बाजीराव कुंभार यांनी हाती धनुष्यबाण घेतले. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य मदन कारंडे गटाला धक्का असल्याचे मानले जाते. पाटील यांचे आर्थिक व्यवहार, कुंभार यांचे सुत व्यवहार, कांबळे यांचे प्रभागातील राजकीय व्यवहार यातून त्यांनी धनुष्यबाण घेतले असल्याची चर्चा इचलकरंजी महापालिका राजकीय वर्तुळात रंगली आहे. या तिघांना शिवसेनेमध्ये प्रवेश मिळाला असला तरी त्यांच्या अपेक्षा कितपत नी कधी सार्थ ठरणार यावरही बरेच अवलंबून आहे. त्यांना दिलेला शब्द पाळला गेला तर आणखी काही अन्य पक्षातील कार्यकर्तेही शिवसेनेच्या वाटेवर येऊ शकतात अशीही शक्यता दिसत आहे. एकंदरीत एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा राजकीय ताकद देणारा ठरला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या