कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहोचली आहे. अवघ्या पाच इंचावर धोका पातळी पोहोचली असल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. तर कोल्हापूर शहरांमध्ये महापालिकेने वॉररूम सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम हटायचे नाव घेत नाही. आजही पावसाने धुमाकूळ घातला. शहरामध्ये पावसाची उघडीप होती. दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्याच्या अन्य भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. करवीर, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पुराचे पाणी येत असल्याने गतीने स्थलांतर होत आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. अनेक ठिकाणी घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा – पुन्हा विधानसभा गाठण्यासाठी सुनील केदारांचा ‘सर्वोच्च’ प्रयत्न, उद्या न्यायालयात जो निर्णय…

पंचगंगा नदी राजाराम बंधारा येथे सायंकाळी सात वाजता पाणी पातळी ४२ फूट ७ इंच होती ती धोका पातळी ४३ फूटजवळ पोहोचली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. राधानगरी धरण ९३ टक्के भरले असून अन्य धरणातील पाणीसाठाही वाढत चालला आहे.

हेही वाचा – बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापुरात वॉर रूम सुरू

पंचगंगा नदी इशारा पातळी गाठत असल्याने कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉररूम आजपासून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी अग्निशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरू केले आहे. पुराच्या कालावधीमध्ये येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.