कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने ‘डिबेंचर’ मध्ये कपात केल्याचा विरोधात गुरुवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळवर जनावरासहित मोर्चा काढला. यावेळी संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळमध्ये थेट घुसखोरी करून व्यवस्थापनाला जाब विचारला. दूध उत्पादक शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. या आंदोलनाचे नेतृत्व विरोधी गटाच्या संचालिका, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. या निमित्ताने गोकुळमध्ये पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील विरुद्ध शौमिका अमल महाडिक यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघामध्ये दीर्घकाळासाठी ठेवी घेतलेल्या आहेत. त्याबद्दल ‘डिबेंचर’ स्वरूपात परतावा दिला जातो. या ‘ डिबेंचर’ मध्ये ४० टक्क्यांहून अधिक कपात गोकुळ दूध संघाने केल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला आहे. यामुळे दूध संघांना शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्येही या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. यातूनच आज गोकुळ दूध संघावर ‘ जवाब दो’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चासाठी दुभती जनावरे आणल्याने त्यास मोर्चात समावेश करण्यास पोलिसांनी विरोध केला. त्यातून आंदोलक कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापटीचा प्रसंग घडला.

आंदोलनाची सुरुवातच अशी वादळी झाली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. यानंतर मोर्चा जोरदार घोषणाबाजी करीत ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात आला. तेथे आंदोलकांना आता जाण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांनी जोरदार धडक देऊन दरवाजा बाजूलाच सारत आत प्रवेश केला. तेथे त्यांनी व्यवस्थापन, संचालकांना धारेवर धरले.

मोर्चा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा असला तरी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार अमर महाडिक यांचाही जयघोष केला जात होता. या घोषणा मोर्चावेळी लक्षवेधी ठरल्या.

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेल्या महिन्यात हा विषय उपस्थित केला होता त्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही , असा उल्लेख करून संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले की, आजच हे आंदोलन गोकुळ संस्थेच्या विरोधात नव्हे तर, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. ‘डिबेंचर’ स्वरूपात कापून घेण्यात आलेली रक्कम तातडीने दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी, ही मुख्य मागणी घेऊन शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला आहे. याची दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन ‘गोकुळ’ प्रशासनाला देण्यात येणार आहे.

दरम्यान,गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संघांना वाटप करावयाच्या ‘ डिबेंचर’ मधील ४० रक्कम कपात करून स्वतः कडे ठेवली आहे. ही रक्कम दूध संस्थांना तातडीने द्यावी अन्यथा संघाला एक थेंब दुधाचा पुरवठा केला जाणार नाही. शिवाय, गोकुळच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा बुधवारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एड. माणिक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यात देण्यात आलेल्या इशारानुसार आज मोर्चा काढण्यात आला.