कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे आणि वर्ष अखेर यांमुळे कोल्हापुर भाविक, पर्यटकांनी फुलले आहे. भाविकांनी श्री महालक्ष्मी दर्शनासाठी गर्दी केली आहे. वाहतूक नियोजनाला अडथळा होत आहे. शनिवार, रविवार, सोमवारी नाताळ अशा सलग तीन दिवसांची सुट्टी आहे. त्यातच वर्ष अखेर आले आहे. यामुळे पर्यटनासाठी राज्यभरातील पर्यटक सहकुटुंब कोल्हापुरात आलेले दिसतात. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागली आहे. शनिवारी दिवसभरात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असल्याचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले. जोतिबा देवस्थान, किल्ले पन्हाळा येथेही भाविक, पर्यटकांची लगबग वाढली आहे.

हेही वाचा : मुंबईहून आलेली व्यक्ती कोल्हापुरात करोनाबाधित; यंत्रणा सतर्क

शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा येथेही पर्यटकांचा वावर वाढला आहे. कोल्हापूरात पर्यटन, भाविकांची संख्या वाढली असल्याने वाहन तळे वाहनांनी भरून गेली आहेत. शहरात इतरत्र वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

हेही वाचा : “भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास असेल तर विरोधकांत फोडाफोडी कशासाठी?”, सतेज पाटील यांची विचारणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय महामार्गावर कोंडी

दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे पुणे -बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या किणी टोल नाका येथे आज वाहनांची रीघ लागली होती. टोल यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. सुट्टींमुळे कोल्हापुरला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथून अनेकांनी कर्नाटक, गोवा, कोकण येथे जाण्याचे नियोजन केलेले दिसते. परिणामी महामार्गावरील धाबे, हॉटेल पर्यटकांनी भरलेले आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने एसटी महामंडळाला चांगला फायदा होताना दिसत आहे.